संपादकीय : कचरा व्यवस्थापनात महाराष्ट्र कुठे? यश टिकविण्याचे आव्हान..

गेल्या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र देशातील सर्वात स्वच्छ राज्य ठरले आहे. नवे वर्ष सुरू होत असताना मिळालेली ही एक चांगली बातमी.
swatchh survekshan
swatchh survekshanesakal

गेल्या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र देशातील सर्वात स्वच्छ राज्य ठरले आहे. नवे वर्ष सुरू होत असताना मिळालेली ही एक चांगली बातमी. सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्राने आता मध्य प्रदेशला मागे टाकले आहे.

एका लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये इंदूर आणि सुरत पाठोपाठ नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकाची विजेती ठरली आहे आणि एका लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये संत ज्ञानेश्‍वरांचे धाकटे बंधू सोपानदेवांचे समाधीस्थान असणाऱ्या सासवडने ह्या सर्वेक्षणात देशात पहिला आणि राज्यातले एक प्रमुख पर्यटन स्थळ असणाऱ्या लोणावळ्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन!

गेल्या कित्येक वर्षांपासून कचरा व्यवस्थापन हा जगाच्या डोकेदुखीचा विषय आहे, हे लक्षात घेतले तर स्वच्छ सर्वेक्षणात राज्याने आणि राज्यातील काही शहरांनी मिळवलेल्या या मानांकनांनी खरंतर आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढवली आहे, असेच म्हणायला हवे.

कारण स्वच्छता हा मुद्दा एखाद्या दिवसासाठी, महिन्यासाठी किंवा वर्षासाठी पाठ थोपटून घेण्याचा नाही याची खूणगाठ आपल्यापैकी प्रत्येकाने बांधावी असे सुचविणारे हे यश आहे.

यशाच्या बाबतीत सर्वच विचारी मंडळी एक सुविचार हमखास सांगतात यश मिळवणे सोपे असते, पण मिळवलेले यश टिकवणे मात्र अत्यंत अवघड असते.

हा सुविचार म्हटले तर घासून अगदी गुळगुळीत झालेला, पण स्वच्छतेच्या बाबतीत तो पुन्हा पुन्हा सांगावा अशीच परिस्थिती आहे. याला कारण गेल्या आठवड्यात वाचनात आलेली आणखी एक बातमी.

swatchh survekshan
2024 Budget : 'बजेट'च्या दिवशीच सर्वसामान्यांना झटका, गॅसचे दर वाढले

मराठी मनोरंजन सृष्टीतील एक अभिनेत्री चित्रीकरणाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्याच एका गिरिस्थानी गेली असताना, तिथले कचऱ्याचे साम्राज्य (हादेखील खरेतर आपल्या अगदी अंगवळणी पडलेला शब्द) पाहिल्यावर तिने समाजमाध्यमांचा आधार घेत त्याविषयी नाराजी नोंदवली.

आणि मग स्थानिक प्रशासनाने त्या मान्यवर अभिनेत्रीच्या नाराजीची नोंद घेत तातडीने पावले उचलली अशा अर्थाची ती बातमी होती. कदाचित राज्यातल्या अन्य काही शहरा-गावांबद्दलचा आपल्यापैकीही अनेकांचा अनुभव असाच असू शकेल.

काही दिवसांच्या अंतराने वाचायला मिळालेल्या या दोन बातम्यांमधून यश टिकवण्यातले काठिण्य अधोरेखित होते.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्याच प्रदूषण महामंडळाचा २०२१-२२ या वर्षाचा अहवाल पाहिला तर त्यावर्षी राज्याच्या शहरी भागांतल्या २७ महापालिका, अ दर्जाच्या १८ नगरपालिका, ब दर्जाच्या ७१ नगरपालिका, क दर्जाच्या १४९ नगरपालिका, १३१ नगरपंचायती आणि सात कॅन्टोन्मेंट बोर्डांमधील सत्तावीस टक्क्यांपेक्षा जास्त घनकचरा प्रक्रियेविना राहिला होता.

शहरी भागांमधल्या (यात वाढत्या शहरांनी शिरकाव केलेल्या गावांचाही समावेश करता येईल) घनकचऱ्याच्या हाताळणीबाबत वेगवेगळ्या यंत्रणा करत असलेले, करत नसलेले, करणार असलेले उपाय, त्यांची परिणामकारता याविषयीच्या चर्चा आपल्या अवतीभवती सुरूच असतात. मुद्दा यश टिकवण्याचा आहे, आणि त्यातल्या सर्वांच्या सहभागाचा आहे.

कचरा -तो ओला असेल, सुका असेल, आताच्या काळाने निर्माण केलेला ई-कचरा असेल त्याच्या व्यवस्थापनातील क्लिष्टता कमी करण्यासाठी जेवढे म्हणून हात आणि डोकी एकत्र येतील तेवढे हे यश टिकवण्याच्या शक्यता वाढत जातील.

याबाबतीत इंदूर आणि सुरत या शहरांची उदाहरणे प्रत्येकानेच समजून घ्यावी अशी आहेत. एक लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये सर्वात स्वच्छ शहर असण्याचा मान इंदूरने सलग सातव्या वर्षी टिकवला आहे. स्वच्छता ही जीवनशैली असते, हे मान्य असेल तर स्वच्छतेचे सातत्य टिकवणे अटळ ठरते.

swatchh survekshan
Budget 2024 : टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही; अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

स्वतःच्या घराच्या स्वच्छतेइतकेच परिसराच्या स्वच्छतेला महत्त्व देणे, आपल्यामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे अन्य काही उपाय असतील तर त्याचा अवलंब करणे, सार्वजनिक स्वच्छता राखण्यास मदत करणाऱ्या प्रत्येक घटकाला मदत होईल याची काळजी घेणे यावरच स्वच्छता राखण्यातले सातत्य बव्हंशी अवलंबून असेल.

ओला कचरा, सुका कचरा, सेंद्रिय- असेंद्रिय कचरा, रिफ्यूज-रियूझ-रिड्यूस-रिपेअर-रिसायकल अशा कल्पना समजून घेतल्या तर कचऱ्याच्या समस्येच्या संदर्भातली आपली जबाबदारी आपल्याला आणखी जबाबदारीने सांभाळता येईल. हैदराबादमधल्या एका स्टार्टअपबद्दल नुकतेच वाचले.

तुमचा कचरा दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगाचा असू शकतो, ही या स्टार्टअपमागची एक कल्पना. ही मंडळी लोकांच्या घरी जाऊन त्यांनी टाकण्यासाठी म्हणून काढून ठेवलेल्या वस्तू गोळा करतात.

त्या बदल्यात वस्तू देणाऱ्यांना काही रिवॉर्ड पॉइंट मिळतात. रिवॉर्ड पॉइंट मिळवणाऱ्यांना हे रिवॉर्ड पॉइंट नंतर त्याच स्टार्टअपच्या दुकानात वापरून रोज वापरल्या जाणाऱ्या वस्तू खरेदी करता येतात, असे या उद्योगाचे स्वरूप आहे.

अशा पद्धतीने लोकांच्या घरी जाऊन नको असलेल्या वस्तू गोळा करून त्या वस्तू ज्यांना हव्या आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या अनेक संस्था वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत.

गल्लोगल्ली फिरून नकोशा झालेल्या वस्तू विकत घेणारी, गोळी करणारी मंडळी हे या प्रयत्नांचे पारंपरिक स्वरूप मानले तर अशा प्रयत्नांना नवकल्पना वापरून, प्रसंगी तंत्रज्ञान वापरून बळ देताना त्यात सहभागी असणाऱ्या प्रत्येकाचा आणि अंतिमतः आपल्या गावाचा आणि त्या गावाच्या पर्यावरणाचा फायदाही अधोरेखित करता येईल.

कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वेगवेगळ्या रूपांनी वाढत असताना महाराष्ट्राने आणि महाराष्ट्रातील काही शहरांनी स्वच्छ सर्वेक्षणात यश मिळवून ‘स्वच्छ राहता येते’ असे दाखवून दिले आहे. आता गरज आहे हे यश पुन्हा मिळवण्याची आणि या यशाचे भागीदार वाढवण्याची.

-------------------

swatchh survekshan
Pune Traffic News: विद्यापीठ चौकात मोठा ट्रॅफिक जाम ! नियोजनाचा गोंधळ; नागरिक संतप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com