

Fixed Deposit vs SIP vs Gold
esakal
डॉ. अमेय खरे
फिक्स्ड डिपॉझिट, सीप किंवा सोनं यापैकी कोणताही पर्याय पूर्णपणे योग्य किंवा पूर्णपणे चुकीचा नाही. प्रत्येक पर्यायाची भूमिका वेगळी असते. आपण पैसे कुठे गुंतवतो यापेक्षा आपण का गुंतवतो, किती काळासाठी गुंतवतो आणि त्या निर्णयामागे आपली आर्थिक समज किती आहे हे जास्त महत्त्वाचं ठरतं. कारण शेवटी गुंतवणुकीतला सर्वात मोठा धोका बाजार नसतो, अनेकदा तो चुकीच्या अपेक्षा आणि अपुरी आर्थिक समज हा असतो.
‘पैसे कुठे गुंतवायचे?’ हा प्रश्न जवळपास प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबात कधीतरी चर्चेत येतो. काही लोकांना फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) सुरक्षित वाटतं, काहीजण सीपमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात, काहीजण सोन्याकडे सुरक्षित संपत्ती म्हणून बघतात. पण या सगळ्यात एक मोठी समस्या अशी आहे, की अनेक वेळा गुंतवणुकीचे निर्णय माहितीपेक्षा भावना, भीती किंवा इतरांच्या अनुभवांवर जास्त आधारित असतात. कोणी म्हणतं शेअर बाजार धोकादायक आहे, कोणी म्हणतं एफडीमध्ये पैसे ठेवले तर काही फायदा नाही, तर काही लोकांसाठी सोनं हीच सर्वात सुरक्षित गुंतवणूक असते. मात्र अर्थशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं, तर गुंतवणूक हा एकच योग्य पर्याय निवडण्याचा प्रश्न नसतो. तो आपल्या उत्पन्न, जोखीम घेण्याची क्षमता, आर्थिक उद्दिष्टं आणि कालावधी यांच्याशी जोडलेला निर्णय असतो.
मागच्या काही लेखांमध्ये आपण महागाई, बचत आणि आर्थिक नियोजन याबद्दल चर्चा केली. विशेषतः घरगुती अर्थकारणाच्या लेखात (ता. १६ मे) आपण पाहिलं की फक्त पैसे साठवणं पुरेसं नसतं, त्या पैशाची खरी किंमत टिकून राहणं अधिक महत्त्वाचं असतं. इथंच बचत आणि गुंतवणूक यातला खरा फरक समोर येतो.
एफडी सुरक्षित असते, पण ती पुरेशी असते का?
भारतातल्या अनेक कुटुंबांसाठी फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे सर्वात विश्वासार्ह पर्याय. त्यामागचं कारणही स्पष्ट आहे. एफडीमध्ये मूळ रक्कम तुलनेनं सुरक्षित असते आणि ठरावीक व्याज मिळत राहतं. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीनं पाच लाख रुपये एफडीमध्ये सात टक्के वार्षिक व्याजदरानं ठेवले, तर वर्षभरात साधारण ३५ हजार रुपये व्याज मिळू शकतं. पण इथं एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जर त्याच काळात महागाईचा दर सहा टक्के असेल, तर प्रत्यक्षात पैशांची खरी वाढ किती झाली?
समजा एफडीवर सात टक्के परतावा मिळाला आणि महागाई सहा टक्के होती, तर वास्तविक वाढ फक्त एक टक्क्याच्या आसपासच झाली. म्हणजेच एफडी पैसे सुरक्षित ठेवू शकते, पण दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी ती नेहमी पुरेशी ठरेलच असं नाही. याचा अर्थ एफडी वाईट आहे असा नाही. उलट, आपत्कालीन निधी किंवा अल्पकालीन सुरक्षिततेसाठी एफडी अजूनही उपयुक्त पर्याय आहे, पण प्रत्येक आर्थिक उद्दिष्टासाठी फक्त एफडी पुरेशी असेलच असं नाही.