गणपती विशेष : सजावट साहित्य व आभुषणे

महाराष्ट्रामध्ये गौरी-गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
decoration
decoration sakal

प्रियांका राऊत

महाराष्ट्रामध्ये गौरी-गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामध्ये गणपतीची सजावट हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. गौरी-गणपतीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या अनेक वस्तूंनी बाजारपेठा आता सजल्या आहेत.

गौरी-गणपतीच्या सजावटीच्या नानाविध वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठा ग्राहकांनी गजबजल्या आहेत. या सजावटीच्या साहित्यामध्ये दरवर्षी नवनवीन गोष्टी समाविष्ट झालेल्या दिसतात. त्यामध्ये सजावटीसाठीची तोरणे, फुलांच्या माळा, जाळीचे पडदे, वॉलपीस, फुले, झुंबर तसेच आवर्जून खरेदी केली जाणारी वस्तू म्हणजे आसन, वेगवेगळ्या प्रकारच्या मखरी! यंदा मखरांमध्ये लाकडी फोल्डिंग मखर उपलब्ध आहेत. थर्माकोलवर बंदी असल्यामुळे आपल्याला विविध प्रकारच्या कागदापासून, प्लॅस्टिकपासून किंवा लाकडापासून तयार केलेली मखरे दिसून येतात. या मखरांची किंमत ₹ ३००पासून ते ₹ २,०००पर्यंत आहे.

यावर्षी सजावटीमध्ये नव्याने काही गोष्टींची भर पडली आहे. जसे की उरली. उरली हे एक प्रकारचे भांडे आहे, त्यामध्ये मधोमध पाणी भरून त्यावर फुले ठेवू शकतो, तसेच त्याला बाजूने दिव्यांचा आकार दिलेला आहे. त्यावर फुलांची सजावट चांगल्या प्रकारे करता येते. याचा वापर आपण गणपतीच्या सजावटीमध्ये तर करू शकतोच, पण एरवीही आपल्या घरात कोणत्याही सणांना वा कार्यक्रमांना त्याचा वापर करू शकतो. या उरलीची किंमत ₹ ६००पासून पुढे १,२००पर्यंत आहे.

स्लाइडर हा प्रकारदेखील यावर्षी नव्याने पाहायला मिळतोय. यामध्ये साधारण दोन फूट उंची व तीन ते पाच फूट लांबी अशाप्रकारे त्याचा आकार आहे. त्यावर विविध पानाफुलांची सजावट आपल्याला करता येते. तसेच त्याचा पुनर्वापरही करू शकतो.

decoration
Ukadiche Modak : बाप्पासाठी बनवलेले उकडीचे मोदक २४ तास मऊ लुसलुशीत राहावे यासाठी त्यात घाला हा 1 पदार्थ

गौरी-गणपतीच्या सजावटीमध्ये लोक विविध प्रकारच्या थीम घेऊन सजावट करतात, उदाहरणार्थ वटपौर्णिमा, वारी, जागतिक तापमानवाढ, हरितवारी वगैरे. त्यासाठी लागणारे नवनवीन साहित्यदेखील बाजारामध्ये उपलब्ध आहे. वारकऱ्यांच्या छोट्या मूर्ती, छोटे उंदीर, छोटे प्राणी, झाडे अशा अनेक वस्तू बाजारामध्ये उपलब्ध आहेत.

गौरी-गणपतीसमोर ठेवण्यासाठी लागणाऱ्या टोपल्यांमध्येही विविध प्रकार पाहायला मिळतात. विविध प्रकारच्या कागदांनी सजवलेल्या, त्यावर वेगवेगळ्या कुंदन-मोत्यांची डिझाईन केलेल्या टोपल्या उपलब्ध आहेत. त्यांची किंमत ₹ ३०पासून २५०पर्यंत आहे.

हल्ली पर्यावरणपूरक पद्धतीने सजावट करण्याकडे लोकांचा जास्त कल आहे. घरात दहा दिवस गणपती बसणार असतील, तर सजावट करताना स्पंजच्या ब्रिक्स पाण्यात भिजवून त्यावर विविध प्रकारची खरीखुरी फुले, तसेच फांद्या खोचता येतील. त्यामुळे दहा दिवस फुले सुकत नाहीत, ताजी राहतात.

गौरींसाठी बाजारात यंदा पाच फुटी उंचीचा साचा पहिल्यांदाच आलेला आहे. त्याचबरोबर नेहमीच्या साच्यांमध्ये काही बदल केलेले आहेत, जसे की गौरीच्या हाता-पायांच्या बोटांमध्ये जागा ठेवली आहे, जेणेकरून हाताच्या बोटांमध्ये अंगठी अथवा पायाच्या बोटांमध्ये जोडवी घालता येतील. गौरीच्या पूर्ण साच्यांची किंमत ₹ १०,०००पासून ते २८ हजारापर्यंत जोडी अशी आहे. गौरीचे प्रसिद्ध अमरावती मुखवटेही उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती ₹ ३,०००च्या पुढे आहेत.

गौरीच्या साजशृंगारासाठी खूप दागिने उपलब्ध आहेत. त्यामध्ये बोरमाळ (₹ २५०पासून पुढे), मोत्यांचा हार (₹ २०० ते ५००), बुगडी (₹ ६० ते १००), झुमके (₹ ५०पासून पुढे), चोकर (₹ १५० ते २५०), कोल्हापुरी साज (₹ २०० ते ३००) यांसारख्या अनेक दागिन्यांबरोबरच विविध प्रकारच्या खड्यामोत्यांचे डिझाईन असलेल्या बांगड्या उपलब्ध आहेत.

बाजूबंद (₹ १००पासून पुढे), कंबरपट्टा (₹ २५०पासून पुढे), नेकलेस (₹ १००पासून पुढे), वेणी (₹ १५०पासून पुढे), मुकुट (₹ २५०पासून पुढे) इत्यादी आभूषणे पाहून डोळे अगदी दीपून जातात. या व इतर अनेक प्रकारच्या हार व दागिन्यांच्या किमती ₹ १५०पासून १,८००पर्यंत आहे. गौरीच्या मूर्तींसोबत तिच्या बाळांच्या छोट्यांपासून ते मोठ्या आकारापर्यंतच्या मूर्तीदेखील बाजारात उपलब्ध आहेत.

याशिवाय गणपतीच्या हातात देण्यासाठीची शस्त्रेसुद्धा उपलब्ध आहेत. गदा, त्रिशूळ वगैरे शस्त्रांच्या किमती शंभर रुपयांपासून पुढे आहे.

गौरी-गणपती महाराष्ट्रातील प्रमुख उत्सव असून, मोठ्या स्वरूपात साजरा होतो. उत्सव म्हणाला की घरामध्ये नवीन काहीतरी वस्तू, अलंकार आणले जातात. गौरी-गणपतीनिमित्ताने देवपूजेचे साहित्य व देवांचे अलंकार चांदीमध्ये घडवण्याची प्रथा आहे. दूर्वा, केवडा, जास्वंद, मोदक, शमी अशा चांदीच्या पूजेच्या वस्तू घरच्या गणपतीसाठी घडवल्या जातात. यानिमित्त गौरी-गणपतीच्या चांदीच्या अलंकारांना मोठी मागणी असते.

आधुनिक काळात पर्यावरण रक्षणासाठी गणपतीच्या मूर्ती आणि देवीचे चांदीचे मुखवटे यांना मागणी वाढू लागली आहे. मूर्ती, मुखवटे चांदीत घडवून दरवर्षी सणांच्या वेळी त्यांना उजळवून त्यांची पूजा केली जाते. चांदीच्या वाढलेल्या दरांमुळे पोकळ व वजनाने अत्यंत हलके असे सुबक मुखवटे व मूर्ती निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यालाही मोठ्या प्रमाणावर बाजारमध्ये मागणी आहे. चांदीची उपकरणे आणि अलंकारांना गणेशभक्तांकडून वाढती मागणी दिसून येत आहे.

- अमित मोडक, संचालक-सीईओ, पीएनजी सन्स

सजावटीसाठी लागणाऱ्या स्वस्त आणि महाग अशा सगळ्या वस्तू एकाच छताखाली आमच्या दुकानात उपलब्ध आहेत. दरवर्षी येणाऱ्या नवनवीन वस्तू आमच्याकडे मिळतात. त्यामुळे ग्राहकराजा नेहमीच आनंदाने इथून परतत असतो.

-माधुरी नितीन कवडे, विक्रेत्या, मंडई परिसर

गौरीच्या व गणपतीच्या दागिन्यांमध्ये दरवर्षी खूप बदल होत असतात. गौरी तसेच गणपतीचे सौंदर्य अधिक खुलावे यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो. त्यामुळे ग्राहकांना मोहवतील असे दागदागिन्यांचे कलेक्शन आमच्या दुकानात पाहायला मिळते.

- कुमार काळे, दागिने विक्रेते, तुळशीबाग

यंदा आम्ही गणपती-गौरीच्या सजावटीसाठी लागणारी जास्वंद, कमळ, गुलाब अशी नवनवीन फुले तसेच दूर्वा अशा प्रकारच्या विविध वस्तू कागदापासून केल्या आहेत. आम्ही पेपर फ्लॉवर वर्क मेकिंगचे प्रशिक्षणही देतो.

- निवेदिता देशपांडे, क्राफ्ट आर्टिस्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com