प्रतिनिधी
गणेशाचे आगमन आनंद, भक्ती आणि उत्सवाचा संदेश घेऊन येते. दहा दिवसांच्या गणेशोत्सवात सकारात्मक ऊर्जा असते. अनंत चतुर्दशीला विसर्जनाच्यावेळी भक्तांच्या डोळ्यांत अश्रू, तर हृदयात आठवणींचा साठा असतो. गणेश जयंतीला बालगणेशाच्या उत्सवमूर्तीसह भक्तिभावाने साजरा केला जातो. या आवडत्या सणांबद्दल...
गणेश चतुर्थी हा विघ्नहर्त्या गजाननाचा आनंदमय उत्सव आहे. बुद्धी आणि पराक्रमाबरोबरच गणेश कला, ज्ञान आणि समृद्धीचेही प्रतीक आहे. भारतीय परंपरेत गणेशाला विशेष स्थान आहे. तो सुखकर्ता आणि दुःखहर्ता, संकटनाशक आणि मंगलकारी आहे. गणनायक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. त्याचे आगमन चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येते.
गणेशोत्सवाच्या काळात संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारलेले असते. भाद्रपद महिन्यात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, मध्य प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये हा उत्सव अपार उत्साहाने साजरा होतो. ढोल-ताशांच्या निनादात, पारंपरिक रीतिरिवाजांच्या साक्षीने आणि आनंदाच्या उत्स्फूर्त लहरींमध्ये हा सोहळा अवघे वातावरण भारवतो.
गणेशपूजनाची परंपरा भारतासह कंबोडिया, जावा, सुमात्रा आणि इंडोनेशिया यांसारख्या पूर्व आशियातील अनेक देशांमध्येही आढळते. कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात गणेशपूजनानेच केली जाते. महाराष्ट्रात गणपतीची अनेक ऐतिहासिक मंदिरे आहेत. त्यात सर्वाधिक महत्त्व अष्टविनायकांचे आहे. मोरगाव, सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव येथील अष्टविनायक मंदिरे भाविकांना आकर्षित करतात. या पवित्र स्थळांवर वर्षभर भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळते.