

Warkari tradition
esakal
भागवत धोंडोपंतदादा महाराज शिरवळकर
सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथून सुरू झालेली आणि पंढरपूर,
आळंदी व देहू या संतभूमींमध्ये विस्तारलेली श्रीसद्गुरू गंगुकाका शिरवळकर सांप्रदायिक फडाची परंपरा आज जवळपास तीनशे वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. भजन, कीर्तन, वारी, नामस्मरण आणि संतसेवेच्या माध्यमातून या परंपरेने वारकरी संप्रदायात एक वेगळे आणि मानाचे स्थान प्राप्त केले आहे.
काकांचा थोर अधिकार ।
प्रती शुकाचा अवतार ।।
तया माझा नमस्कार ।
वारंवार असे ।।
अवतार तुम्हा धराया कारणे ।
उद्धराया जन जड जीव ।।
संत तुकाराम महाराजांच्या या वचनांप्रमाणे श्रीसद्गुरू गंगुकाका यांचा अवतार हा सामान्यजनांना भजन, भक्ती आणि नाममार्ग दाखविण्यासाठीच झाला, अशी श्रद्धा वारकरी संप्रदायात आढळते. सातारा जिल्ह्यातील शिरवळ हे श्रीसद्गुरू गंगुकाका यांचे मूळ गाव. त्यांचे वडील बल्लाळपंत हे निष्ठावंत वारकरी होते. पांडुरंगाच्या कृपेने त्यांना आठ अपत्ये झाली. त्यातील सर्वात धाकटे अपत्य म्हणजे गंगाधर, ज्यांना पुढे सर्वजण प्रेमाने ‘गंगुकाका’ या नावाने ओळखू लागले. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची ओढ होती. अवघ्या आठव्या वर्षी त्यांनी भोर येथे श्रीरामजन्माचे कीर्तन केले. त्यांचे कीर्तन इतके प्रभावी आणि रसाळ झाले, की तेथील भाविकांनी त्यांना बिदागी देण्यासाठी धन जमा केले. परंतु ही गोष्ट काकांच्या कानावर येताच त्यांनी ते धन स्वीकारण्यास नकार दिला आणि रातोरात तेथून निघून गेले. कीर्तन हे केवळ भक्तीचे साधन असून, त्यातून कोणताही मोबदला स्वीकारू नये, हा त्यामागील त्यांचा भाव होता.