Ganpati Chaturthi 2023 : प्रथम तुला वंदितो : श्रीगणेशाची प्रतिष्ठापना कधी करावी?

येत्या मंगळवारी (१९ सप्टेंबर) ब्राह्म मुहूर्तापासून दुपारी दीड वाजेपर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोईने कोणत्याही वेळी ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात श्रीगणेशाची स्थापना करून पूजन करता येईल.
Ganpati Chaturthi 2023
Ganpati Chaturthi 2023Sakal

- पंचांगकर्ते ओंकार दाते

कोणत्याही कार्याच्या प्रारंभी ते कार्य निर्विघ्न पार पडावे यासाठी विघ्नहर्त्या श्रीगजाननाचे स्मरण, पूजन केले जाते. सर्व शुभ कार्यात प्रथम ‘निर्विघ्नता सिद्ध्यर्थम्’ म्हणून गणपतीचेच स्मरण केले जाते. आपल्याकडे लोककलांपासून विवाहादी मंगलकार्यापर्यंत सर्वत्र गणपती व्यापून आहे. 

जुन्या घराच्या मुख्यदारावर गणेश चित्र असे. आता गणपतीची टाईल असते, पण गणपती आहे. शिक्षणाला प्रारंभ होतो तो ‘श्रीगणेशायनमः’ करूनच. आपल्या जीवनात गणपतीचे स्थान इतके महत्त्वाचे आहे. आजही गणेशाचे उपासक जगभर पसरलेले दिसतात त्यामुळेच स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक केलेला हा गणेशोत्सव आता केवळ भारतापुरता मर्यादित न राहता जगभर वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. 

Ganpati Chaturthi 2023
Ukadiche Modak : बाप्पासाठी बनवलेले उकडीचे मोदक २४ तास मऊ लुसलुशीत राहावे यासाठी त्यात घाला हा 1 पदार्थ

‘आविर्भूतंच सृष्ट्यादौ’ असे अथर्वशीर्षातच म्हटले आहे. असा हा सृष्टीच्या आरंभापासून पूजला जाणारा देव आहे. हा सर्वांना प्रिय असणारा विश्ववंद्य गणपती आहे. अशा या गणेशाचा उत्सव, आपल्या सर्वांचा आवडता गणेशोत्सव आता काही दिवसांवर आला आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी या दिवशी म्हणजेच येत्या मंगळवारी (ता. १९) श्रीगणेश चतुर्थी असून या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांकडून पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना व पूजन केले जाणार आहे. 

या दिवशी सूर्योदयापासून दुपारी १:४४ पर्यंत भद्रा आहे तसेच दिवसभर वैधृति योग आहे परंतु ज्या गणेशाचे आपण ‘सुमुहूर्तमस्तु’, अर्थात तू स्वतःच एक सुमुहूर्त आहेस असे म्हणून आवाहन करतो त्या श्रीगणेशाच्या स्थापनेसाठी भद्रा दोष किंवा इतर दोष मानू नयेत. त्यामुळे मंगळवारी ब्राह्म मुहूर्तापासून दुपारी दीड वाजेपर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोईने कोणत्याही वेळी ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात श्रीगणेशाची स्थापना करून पूजन करता येईल.

Ganpati Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023 Recipes : बाप्पासाठी घरच्या घरी तयार करा रवा-खोबऱ्याचे मोदक, पाहा रेसिपी VIDEO

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते. ही चतुर्थी रविवारी किंवा मंगळवारी आल्यास तिचे माहात्म्य अधिकच असते. यंदाच्या वर्षी गणेश चतुर्थी मंगळवारी आलेली असल्याने हा एक विशेष योग आहे.

Ganpati Chaturthi 2023
गणेश चतुर्थीला अस्सल महाराष्ट्रीयन लुक हवा आहे? मग या टिप्स करा फॉलो

या दिवशी गणपतीची मातीची व रंगीत मूर्ती घरी आणून सिद्धिविनायक या नावाने तिची पूजा करतात. पार्थिव गणेश स्थापना करण्याचा भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा एकच दिवस असल्याने त्या दिवशी जमले नाही तर पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येत नाही. एखाद्या वर्षी काही कारणाने लोप झाल्यास गणेश स्थापना करणे शक्य न झाल्यास पुन्हा पुढील वर्षी गणपती पूजन करता येते.

अशी असावी घरगुती मूर्ती

घरातील गणेशमूर्ती जास्तीत जास्त एक वीतभर उंचीची आणि आसनस्थ असावी. प्लास्टिक, फायबरच्या मूर्ती शास्त्राला अभिप्रेत नाहीत, त्यामुळे अशा मूर्ती आणू नयेत. मूर्ती शक्यतो चिकणमाती, शाडूची असावी. वीतभर उंचीची मूर्ती आणणे शक्य नसल्यास मातीची किंवा शाडूची ३/४ इंच उंचीची मूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करून पूजन करता येईल आणि कोणत्याही धातूच्या मोठ्या मूर्तीचे उत्सवमूर्ती म्हणून पूजन करता येईल आणि आरास करता येईल. 

पाण्यात विसर्जन मात्र लहान मूर्तीचे करावे आणि धातूची श्रीगणेश मूर्ती पुन्हा शोकेसमध्ये ठेवून द्यावी. उजव्या सोंडेचा गणपती कडक आणि डाव्या सोंडेचा सौम्य अशी समजूत करून घेणे चुकीचे आहे. ‘सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना’ असे समर्थ रामदासांनी म्हटले आहे.

मूर्तीचे हात, पाय, डोळे, कान सुबक असतील असे पाहावे. हार घालताना, फुले वाहताना अडचण येऊ नये यासाठी मूर्तीचे पाठीमागचे हात व कान यामध्ये अंतर असेल, अशीच मूर्ती आणावी. पूजनाच्या दिवशी सकाळी किंवा आदल्या दिवशी सायंकाळीच मूर्ती घरी आणायला हवी असे नाही आपल्या सोयीनुसार अगदी ८-१५ दिवस आधीदेखील मूर्ती आणून घरात ठेवता येईल.

मात्र या कालावधीत ती भंगणार नाही याची काळजी घ्यावी. आधीच मूर्ती आणून ठेवली म्हणजे सकाळी पूजन करणे सोईचे होईल. मूर्ती घरात आणतेवेळी मूर्ती घेतलेल्या माणसाने डोक्यावर टोपी घालावी, मूर्ती घेऊन येणाऱ्या माणसाच्या पायावर पाणी घालून व मूर्तीसह त्यास आरती ओवाळून घरात घ्यावे. 

पुढे सजविलेल्या मखरात पाटावर किंवा चौरंगावर थोड्या अक्षता घालून त्यावर मूर्ती ठेवावी. मूर्ती ठेवताना मूर्तीचे तोंड पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असणे अधिक चांगले आहे, दक्षिण दिशेला मूर्तीचे तोंड असू नये. ते उत्तरेकडेही चालेल. 

घराच्या प्रवेशद्वाराला फुलांचे तोरण, आंब्याची पाने लावावीत. दारासमोर रांगोळी काढावी. सनई, चौघडा इत्यादी मंगलवाद्ये हळू आवाजात लावावीत. गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेशाच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली जाते. त्यासाठी साधारण खालील क्रमाने पूजा विधी केला जातो.

पूजनाचे महत्त्व 

प्रथम आचमन करून प्राणायाम करून देवांसमोर विडा, नारळ ठेवला जातो मग पूजनापूर्वी घरातील सर्व मोठ्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेऊन पूजेस सुरुवात होते. पूजेच्या सुरुवातीस पंचांगाप्रमाणे स्थल, काल, आकाशस्थ ग्रहस्थितीचा उल्लेख करून पूजनाचा संकल्प केला जातो.

कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी महागणपतीचे स्मरण केले जाते. त्यानंतर कलश, शंख, घंटा यांचे पूजन करून पार्थिव गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. त्यावेळेस ध्यान, आवाहन, आसन, पाद्यपूजा, अर्घ्य, स्नान, पंचामृतस्नान, गंधस्नान, पंचोपचार पूजन, अभिषेक, अत्तर, उष्णोदक स्नान या क्रमाने गणेशाचे षोडशोपचार पूजन केले जाते.

परंपरेने आपल्या घरी येणाऱ्या गुरुजींना बोलावून त्यांच्याकडून समंत्रक हे पूजन करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र व्यग्रता, अंतर आदी काही कारणांनी गुरुजी येऊ शकणार नसतील तर विविध वेबसाइटवरून ऑनलाइन पूजा सांगितली जाते तिचादेखील उपयोग करता येईल.

मात्र गणेश चतुर्थीच्या दिवशीच पूजन होईल याची काळजी घ्यावी. पार्थिव गणेश स्थापना व पूजन करताना दहा नावे गुंफलेला पुढील मंत्र म्हणून त्यास एकवीस दूर्वा अर्पण करतात.

गणाधिप नमस्तेऽस्तु उमापुत्राघनाशन । 

एकदन्तेभवक्त्रे च तथा मूषकवाहन ।।

विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक । 

कुमारगुरवे तुभ्यं पूजयामि प्रयत्नतः ।।

हा उत्सव प्रामुख्याने दीड दिवस असतो. म्हणजे गणेशचतुर्थीच्या दिवशी पूजिलेला गणपती दुसऱ्या दिवशी सायंकाळी विसर्जित करतात. कित्येक घरी पाच, सात, नऊ व दहा दिवसही गणपती ठेवून त्याची पूजा करतात. कित्येक कुटुंबात ज्येष्ठा गौरीच्याबरोबर गणपतीचे विसर्जन होते. 

गौरी विसर्जनाबरोबर गणपती विसर्जन असता तो कितवाही दिवस असताना आणि कोणताही वार असताना त्या दिवशी विसर्जन करता येते. घरामध्ये गर्भवती स्त्री असतानाही गणपती विसर्जन करावे. अशा वेळेस विसर्जन न करण्याची प्रथा चुकीची आहे. ही प्राणप्रतिष्ठा करून बसविलेली मूर्ती उत्तरपूजा करून देव्हाऱ्यातून खाली काढतात व तिचे पाण्यात विसर्जन करतात.

वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नसून पाण्यात विसर्जन करावे असे आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यातसुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी. प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा तत्सम पाण्यात न विरघळणाऱ्या पदार्थांची मूर्ती नसावी.

यंदाचे गणेशोत्सवातील महत्त्वाचे दिवस 

  • मंगळवार - तारीख १९ सप्टेंबर  : श्रीगणेश चतुर्थी

  • या दिवशी पहाटे ४ वाजल्यापासून दुपारी दीड वाजेपर्यंत कधीही घरगुती गणेशाची स्थापना करता येईल.

  • गुरुवार - तारीख २१ सप्टेंबर : गौरी आवाहन

  • सूर्योदयापासून दुपारी ३.५५पर्यंत आपल्या परंपरेप्रमाणे गौरी आवाहन करावे.

  • शुक्रवार - तारीख २२ सप्टेंबर : गौरी पूजन

  • शनिवार- तारीख २३ सप्टेंबर : गौरी विसर्जन

  • सूर्योदयापासून दुपारी २:५६पर्यंत गौरी विसर्जन करावे.

  • गुरुवार - तारीख २८ सप्टेंबर : अनंत चतुर्दशी

पुढील वर्षी श्रीगणेशाचे आगमन १२ दिवस लवकर म्हणजे शनिवारी ७ सप्टेंबर २०२४ रोजी शनिवारी होणार आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com