Premium|Glasgow Weightlifting : ग्लासगोतील सुवर्णपदकाचे स्वप्न, वडिलांची कर्करोगाशी झुंज; वांगथोईची भावनिक कहाणी

Glasgow Weightlifting Competition and Indian Athlete : ग्लासगोतील वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदकाचे स्वप्न पाहणारा वांगथोई, पायाच्या दुखापतीची चिंता, प्रशिक्षक व्हिक्टरचे मार्गदर्शन आणि कर्करोगाशी झुंज देणाऱ्या वडिलांची काळजी यांची भावनिक कथा.
Glasgow Weightlifting Competition and Indian Athlete

Glasgow Weightlifting Competition and Indian Athlete

esakal

Updated on: 

दहा दिवसांपूर्वी ग्लासगोवरून वांगथोई बोलताना म्हणाला होता, ‘‘लोई (मित्रा), परवा सरावाच्यावेळी वेटलिफ्टिंग करताना कितीतरी वर्षांनी डाव्या पायात कळ आली होती बघ. पण आता मी एकदम ओके आहे. आमचे इंडियन डॉक्टर व फिजिओथेरपिस्ट माझ्यावर योग्य उपचार करत आहेत आणि स्पर्धेपर्यंत करत राहतील. आय होप, ही डाव्या पायात येणारी वेदना ‘डी-डे’ला माझ्या गोल्ड मेडलच्या आड येणार नाही...’’

जोधपूरच्या एम्स हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्डमध्ये वांगथोईचे वडील पायखोंबा बेडवर अर्धनिद्रिस्त अवस्थेत पहुडले होते. सकाळीच किमोथेरपीचं पाचवं सत्र पूर्ण झालं होतं. एकही दिवस पूर्ण न भागलेली भूक, जगण्याचा अव्याहत संघर्ष आणि कुटुंबाची काळजी यामुळे पायखोंबाचं मन थकलं मन होतं आणि शरीर हाडाचा सापळा होता. त्याला कॅन्सरचा उपचार सहन होत नव्हते. त्यामुळे कॅन्सर विभागातून उपचार घेऊन परतलेल्या पायखोंबानं कसेबसे चार घास खाल्ले आणि डोळे मिटले होते.

वांगथोईमधली क्षमता व्हिक्टरला दिसली होती. त्यामुळे त्यानं वांगला आपल्या पंखांखाली घेतलं होतं व कुशल जोहरीप्रमाणे त्याच्यातील क्रीडा कौशल्याला आकार दिला होता. व्हिक्टरच्या प्रशिक्षणाला व वांगथोईच्या मेहनतीला आज गोमटं फळ आलं होतं. तो ग्लासगो वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदकाचा प्रबळ स्पर्धक होता. बस, त्याच्या व सुवर्णपदकाआड त्याचं पायाचं जुनं वेदना देणारं दुखणं येऊ नये...

ग्लासगो, स्कॉटलंड. पहाटे चारची वेळ.

रात्रीचं काळं-निळं आकाश आता सावकाश रंग बदलत लाल-पित रंग धारण करताना सूर्योदयाच्या आगमनाची सूचना देत होतं. आसमंतात प्रसन्न गारवा ब्ल्यू बगल व पांढऱ्या गुलाबांच्या सुगंधासह दरवळत होता.

वांगथोई रेडिसन रेड हॉटेलमधल्या त्याच्या रूमच्या बाल्कनीत उभा होता. त्याचे आंतरराष्ट्रीय कोच व्हिक्टरनं ठरवून दिलेला त्याचा व्यायाम झाला होता आणि बरोबर साडेपाचला त्यांच्यासोबत वांगथोईला सरावाला जायचं होतं. त्यापूर्वी तासभराचा वेळ त्याच्या हाती होता. त्याला सूर्योदयाच्यावेळी सनमाही देवाची प्रार्थना पेना वाद्य वाजवून करायची होती. त्यानंतर पाच वाजता त्याला चुराचांदपुरहून फ्लोरेन्सचा व्हिडिओ कॉल येणार होता; त्याला आजच्या वेटलिफ्टिंगच्या स्पर्धेसाठी ‘बेस्ट लक’ देण्यासाठी.

त्याच्या हातात पेना हे मैतेईंचं पारंपरिक वाद्य होतं. ते वाजवत व गाणं म्हणत त्याला त्याच्या घराण्याचं कुलदैवत असलेल्या लायनिंगथॉ देवाला जागं करायचं होतं. गेली दहा वर्षं सराव व खेळानिमित्त तो इंफाळपासून दूर होता, पण आईच्या प्रेमळ धाकामुळे तो कुठंही असला, तरी त्यानं कधीही पहाटेचा सूर्योदयाचा ‘यकाईरोल’ विधी (द अवेकनिंग रिच्युअल) चुकवला नव्हता. व्हिक्टरनं त्याला त्याबद्दल छेडलं तेव्हा वांगथोई म्हणाला होता, ‘‘सर, हे माझं केवळ रिलिजियस रिच्युअल नाहीये. एक प्रकारचं मेडिटेशन आहे, मन शांत व सकारात्मक ठेवण्यासाठी. त्याचा मला खेळासाठी फायदा होतो!’’

‘‘तसं असेल तर हरकत नाही. पण प्रॅक्टिसचा वेळ त्यामुळे कमी होणार नाही याची दक्षता घे. पुढे मी तुझा कोच असेन-नसेन, बट डोन्ट फर्गेट माय अ‍ॅडव्हाइस. नो कॉम्प्रमाइज इन युवर डेली प्रॅक्टिस सेशन ऑफ मिनिमम थ्री अवर्स!’’

‘‘मी तुमचा हा स्पोर्ट््स मंत्रा आयुष्यात कधीच विसरणार नाही सर. दररोज पहाटे सनराइजच्यावेळी फक्त पंधरा मिनिटं मी माझ्या या मेडिटेशन रिच्युअलला देतो, टू कीप मायसेल्फ पॉझिटिव्ह ॲण्ड काम!’’

वांगथोईचं पेनावादन आणि त्याच्या संगतीनं पारंपरिक गीतगायन फ्लोरेन्सला नेहमीच मंत्रमुग्ध करायचं. एकदा ती त्याला म्हणालीसुद्धा होती, ‘‘तुझ्या प्रेमात पडण्याचं हे एक कारण होतं वांगू!’’

एव्हाना समोरची प्राची उजळली आणि सूर्याचा तेजःपूंज सोनेरी तांबूस गोळा पूर्वेच्या प्रांगणात अवतरला. वांगथोई डाव्या हातातल्या पेनाच्या तारा चेईझिंग या दोन्ही बाजूला घुंगरू लावलेल्या धनुष्याकृती पट्टीनं प्रथम संथ गतीनं, मग काही वेळानं द्रुतगतीनं छेडत सूर्याकडे पाहत गाऊ लागला,

‘‘हे परमदयाळू सनमाही देवा

प्रभात झाली

ऊर्जावान सूर्यदेवाचं आगमन झालं आहे

आता जागे व्हा

अन् आम्हा भक्तांना दर्शन द्या!’’

Glasgow Weightlifting Competition and Indian Athlete
Premium|Global South Countries : ‘ग्लोबल साऊथ’चा वाढता प्रभाव; जागतिक सत्तासंतुलनात कोणते बदल घडणार?
Loading content, please wait...