अरविंद रेणापूरकर
जागतिक वाहन कंपन्या अजूनही भारतातील दीर्घकालीन संधीबाबत आशावादी आहेत. म्हणूनच ते उत्पादन श्रेणीचा विस्तार, वितरण जाळ्याची पुनर्रचना, स्थानिक बाजाराच्या आवडीनुसार किंमत धोरण यांसारख्या आधारावर पुन्हा भारतीय बाजारपेठेत मजबूत उपस्थिती नोंदविण्याच्या तयारीत आहेत.
पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत भारतात विकासाची गंगा तुलनेने उशिरा पोहोचल्याने अन्य देश आपल्याकडे बॅकफुटवर राहणारा देश या नजरेतून पाहत. पण आता परिस्थिती बदलली आहे. भारताने बुद्धिमत्ता आणि कष्टाच्या बळावर बहुतांश क्षेत्रांत विकसित देशांशी सामना करण्याचे धैर्य मिळवले आणि २०४७पर्यंत विकसित होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली. विकसित देश होण्यासाठी भारतीय बाजारपेठ ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे.
अर्थात आपल्या बाजारपेठेचे परकीयांना नेहमीच आकर्षण राहिले आहे आणि आजही ते कमी होताना दिसत नाही. म्हणूनच अब्जाधीश एलॉन मस्क यांनाही टेस्ला गाडी भारतीय रस्त्यावर उतरविण्याचा मोह झाला.
भारतीय बाजारपेठेच्या प्रेमात पडणारे मस्क हे पहिलेच उद्योगपती नव्हेत. चारचाकी वाहन क्षेत्राचा विचार केल्यास सात ते आठ दशकांपासून परकी कंपन्यांची वाहने भारतात येऊ लागली, तेव्हाच निर्मात्यांना भारतीय बाजारपेठेची व्याप्ती समजू लागली. म्हणूनच युरोप, अमेरिका, जपान, द. कोरिया, व्हिएतनामच्या वाहन कंपन्यांनी भारतात एंट्री केली आणि पाहता पाहता विक्रीचा ‘टॉप स्पीड’ पकडला.