जयंतिका कुट्टी
आपापल्या कप्प्यांमध्ये राहून, कप्पेबंद पद्धतीने आपल्या सीमा न ओलांडता आपल्या प्रश्नांवरचे उपाय क्वचितच मिळतात हे आजवरच्या महासाथी, आतापर्यंत लढली गेलेली युद्धे, हवामान बदलांसारख्या आपत्तींनी आपल्याला सातत्याने दाखवून दिले आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय सहकार्याची, एकत्र काम करण्याची आणि भविष्याचा वेध घेत राहण्याची गरज असते.
सरत्या वर्षाचा आढावा घेण्याचा सर्वात सोपा आणि कदाचित सर्वात अवघड मार्ग म्हणजे घडलेल्या घटनांची मनोमन उजळणी करून त्या घटितांची काळजीपूर्वक वर्गवारी करणे, वाईटाशी संबंध असणाऱ्या घटना आणि विशेष करून दिसणाऱ्या थोड्याफार चांगल्या घटनांचा विचार करणे. आणि या साऱ्या बऱ्या-वाईटातून योग्य तो बोध घेणे हा एक रंजक प्रयत्न असतो.