भावेश ब्राह्मणकर
गुजरातमध्ये आशियाई सिंहांची संख्या ८९१पर्यंत वाढल्याचे समोर आले आहे. पाच वर्षांपूर्वी गुजरातमध्ये ६७४ सिंह होते. म्हणजेच, अर्धदशकात २१७ सिंह वाढले आहेत. ही वाढीव संख्या आनंद साजरा करण्यासारखी आहे की चिंताजनक आहे? प्रत्यक्षात सिंहगर्जना नक्की वाढेल का? या सगळ्याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
स न २०२०मध्ये देशाचा ७४वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंहांच्या दीर्घकालीन संवर्धन आणि संरक्षणावर लक्ष केंद्रित करणारा सिंह प्रकल्प (प्रोजेक्ट लायन) सुरू केला. त्यासाठी दोन हजार ९२७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. सिंहांची संख्या वाढत असल्याचा दावा गुजरात सरकारने केला आहे.
गुजरात सरकारच्या नोंदीनुसार, पहिली सिंहगणना १९३६मध्ये जुनागढच्या नवाबाने केली होती. १९६५मध्ये सिंहांसाठीच्या स्वतंत्र गीर अभयारण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आशियाई सिंहांची कमी होणारी संख्या लक्षात घेता दर पाच वर्षांनी सिंहगणना करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार ती नेमाने केली जाते. यंदाची गणना सोळावी आहे.
सिंहांच्या संख्येत झालेली वाढ केवळ अनुकूल भौगोलिक आणि हवामान परिस्थितीमुळे झालेली नाही, तर ती वन्यजीव संवर्धनासाठी राज्य सरकारच्या सातत्यपूर्ण आणि समर्पित प्रयत्नांमुळेदेखील झाली आहे.
- भूपेंद्र पटेल, मुख्यमंत्री, गुजरात