महेश बर्दापूरकर
सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा जगातील सर्वांत मोठा पुतळा, ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ असलेलं गुजरातमधील केवडिया आदर्श पर्यटन स्थळ आहे. पुतळा हे मुख्य आकर्षण ठेवत त्याच्या जोडीला अनेक उद्यानं, साहसी खेळ, जंगलात तंबूमध्ये राहण्याची सुविधा, रिव्हर राफ्टिंग, धरणाचे विहंगम दर्शन, रेल्वेपासून वॉटर प्लेनपर्यंतची दळणवळणाची साधनं अशा अनेक सुविधांमुळं हे ठिकाण आदर्श पर्यटन स्थळ ठरतं.
भारतातील नागरिकांना देशांतर्गत पर्यटनाबद्दल मोठं आकर्षण आहे व कोरोनानंतर ते अधिकच वाढल्याचंही दिसून येतं. देशातील अनेक पर्यटन स्थळं पर्यटकांना साद घालीत असतात. एखादं पर्यटन स्थळ अल्पावधीत विकसित झाल्यानंतर त्याबद्दल पर्यटकांच्या मनात अधिकच उत्सुकता असते व तिथं पोहोचण्यासाठी पर्यटक सर्वतोपरी प्रयत्नशील असतात.
संबंधित ठिकाणाचा इतिहास, भूगोल आणि संस्कृतीचा योग्य वापर करीत, दळणवळणापासून निवासापर्यंतच्या सर्व सुविधा तत्पर आणि अद्ययावत ठेवल्यास पर्यटक अशा स्थळाला भेट देतातच. गुजरातमधील केवडिया हे ठिकाण असं आदर्श पर्यटन स्थळ आहे. पुतळा हे तेथील मुख्य आकर्षण आहे.
त्याचबरोबर अनेक उद्यानं, साहसी खेळ, जंगलात तंबूमध्ये राहण्याची सुविधा, रिव्हर राफ्टिंग, धरणाचे विहंगम दर्शन अशा अनेक सुविधांमुळं हे ठिकाण आदर्श पर्यटन स्थळ ठरतं. पर्यटन मंत्रालयासह पर्यावरण, रेल्वे, रस्ते, पाटबंधारे अशा सर्वच मंत्रालयांनी हातात हात घालून काम केल्यास एखाद्या ठिकाणाचा सर्वांगीण विकास कसा घडतो याचं केवडिया हे उत्तम उदाहरण आहे.