कवी गुलजार : खुशबू जैसे लोग मिले, फसाने में...

ज्ञानपीठ पुरस्काराच्या निमित्ताने..
Gulzar
Gulzarsakal

खुशबू जैसे लोग मिले,

अफसाने में...

मेरे यारजुलाहे,

इकडचा एक धागा उचलून,

दुसऱ्या धाग्याचं टोक जुळवून

विणत जातोस, तू साफसुथरं वस्त्र,

ना कुठं गाठी, ना खरखरीत पोत.

अज्ञातात लागलेली तुझी नजर,

ओठांवर फलसफा सांगणारे दोहे,

आणि चालणाऱ्या हातांसरशी

उलगडत जाणारा स्वच्छ कापडाचा सणंग.

एक धागा सुखाचा,

शंभर धागे दु:खाचे.

याच कापडाचा पेहनावा

सायकल हाताशी धरुन

किराणा दुकानातून परतणाऱ्या

रज्जोच्या अंगावर दिसतो शोभून,

तेव्हा उन्हाचे चांदणे होते...

ही तरकीब कुठे शिकलास?

बघू, बघू, हात बघू तुझे...

किती खडबडीत झाले आहेत रे,

सुखदु:खाचे धागे बुनता बुनता,

रया गेली बघ तुझ्याच हातांची,

पण असू देत, असू देत,

या हातांना चुल्ह्यावर रटरटणाऱ्या

माँजीच्या हातच्या डाळीची

सौंधी सौंधी खुशबू आहे,

अंगणात दोरीवर नुकत्याच

वाळत पडलेल्या कपड्यांना

येणारा रिठ्याचा गंध आहे,

काल रात्रीच शांतवलेल्या

कोपऱ्यातल्या तंदूरचा उष्मा

आहे, याच तळहातात.

ऐन पौषाच्या गारठ्यात

सरसोंच्या कोवळ्या पानांचे डेख,

आणि बथुआची पाने खुडली होती,

त्याचा जायका अजूनही टिकला आहे.

कोठीच्या डाव्या कोपऱ्याशी,

खांबापास बिलौन्याने

ताक घुसळून झाल्यावर

बीजी तुझ्या हाता-तोंडाला

मख्खनी हात पुसायची,

म्हणून टिकले का तुझे हे हात?

रिश्त्यांची बुनाई तुझ्याकडून शिकावी,

म्हणून दातात पेन्सिल चावत,

हातात वही घेऊन तुझ्या घराच्या

फाटकापाशी उभा असलेला

तो किडकिडीत मुलगा

याद आहे का रे तुला?

- नसेल, असे कितीतरी

होतकरू विद्यार्थी आले असतील

तुझ्या दारात, आणि तू ,

त्यांच्याकडे पाहून किंचित हसत

म्हटलेही असशील कदाचित,

‘‘पुत्तर, फिर कभी आना, अब समय

कहां से लाएं? वैसे भी रिश्ते

सिखाए नहीं जाते...’’

हाथ छूटे भी तो रिश्ते कभी तोडा नहीं करते,

वक्त की शाख से लम्हे कभी तोडा नहीं करते,

जिसकी आवाज में सिलवट हो, निगाहों मे शिकन,

ऐसे तसवीर के टुकडे नहीं जोडा करते...

मेरे यारजुलाहे,

गेले कित्येक पावसाळे,

पाहातो आहे तुला छत्रीच्या शोधात,

किंवा वळचणीला उभे राहून

पाऊस थांबण्याच्या प्रतीक्षेत.

तुझ्या गोऱ्या, लालस चेहऱ्यावरले

पावसाचे ते खोळंबलेले थेंब,

आभाळातल्या जळभरल्या मेघांचे गूज

तुझ्या त्या खर्जातील बोलण्यात

साकळलेले दुरुनच ऐकले आहे,

तुझ्या चेहऱ्यावरल्या तेजस्वी

सुरकुत्यांमध्ये शोधत राहातो मी,

कुठल्या तरी अनामिक दु:खाची

साचलेली जबरदस्त ओल,

तुझ्या स्मितातही डोकावतात

काही चुकार उसासे, निसटून

गेलेले काही क्षण.

कधी कधी पाहिले आहे तुला,

सरहद्दीवरच्या आता दृष्टिआड

झालेल्या मानवी उकिरड्यांशी

काहीतरी शोधत असतोस,

उचलत असतोस जीर्ण चिंध्या,

फुटक्या काचांचे तुकडे किंवा

फाटके कागद सरळ करुन वाचतोस,

बघतोस निर्ममपणे सरहद्दीपल्याड...

-बहुधा तुझे काहीतरी महत्त्वाचे

हरवले आहे तिथे.

एकदा हटकले तेव्हा म्हणाला होतास,

‘‘हात सुटले पुत्तर, रिश्ते अजूनही असतील,

तिथंच कुठेतरी... कुणास ठाऊक.

काही फुर्सत के रातदिन,

एखाद टुकडा रात पश्मीने की,

कुछ उस शाख के लम्हे,

जो पतझड में गिरे थे,

शायद उडून गेले असतील वाऱ्यावरती...

बांधणी सैल झालेल्या

पुस्तकातली काही गहाळ पाने,

जागरणे करून वाट बघितलेली

ती दारावरची आतुर दस्तक,

काही परिचित चाहुली,

काही अजनबी सावल्या,

बीजीच्या पदराचा गंध,

रज्जोचे मासूम फणकारे,

बरसातीवर खाटेवर पडल्या पडल्या

ओठंगून आलेले, कपाळाचे अवघ्राण

करणारे रत्नखचित नभांगण.

वक्त से गिरे हुए लम्हे

ढूंढा नहीं करते, पुत्तर,

लम्हे की जगह दास्तान

मिला करती है...’’

हजार वाटा शोधल्या तुझ्यासाठी,

मेरे यारजुलाहे, जी वाट अखेर

तुझ्या घरापास येऊन थांबते,

ती नाहीच सापडली अखेरपर्यंत.

शेवटी कागद आणि पेन्सिल

दिले ठेवून आणि तुझ्याच

शब्दांच्या बुनाईत मी शोधत राहिलो,

माझी दास्तान. माझी कहाणी.

झाकून ठेवलेल्या टोकरीतल्या

रोटीसारखा चांद मी पाहातो,

गॅलरीत उभा राहून, तेव्हा

रज्जोचा दुपट्टा वाऱ्यावर वाहात

येऊन लपेटतो माझ्या सर्वांगाला,

सैपाकघरातून बिजीने दिलेला तडका

नाकाशी रुंजी घालून जातो,

बिछान्यातल्या चादरीवरल्या

सुरकुत्या सांगत राहतात

नात्यांमधल्या भल्याबुऱ्या कहाण्या,

अलमारीतली पुस्तकं मौनांचे अनुवाद

सांभाळत रांगेत उभी राहतात.

बल्लीमारांच्या पेचीदा गलीमध्ये

काठी टेकत टेकत चालणारा,

थोडा पाठीत वाकलेला,

उंच टोपीवाला कुणी शायर

मंद पावलांनी चालताना दिसतो,

त्याच्या घरापासून निघालेली

चिरागांची एक रांग निघते,

ती अखेर तुझ्या दाराशी येऊन

थांबताना दिसते...

वाटते, तुझा खरा पत्ता मिळाला!

मग मी न्याहाळतो माझेच तळहात.

आणि प्रेमाने हुंगतो काही काळ.

मेरे यारजुलाहे, तुझी खुशबू अजूनही

बर्करार आहे माझ्या हातात.

हे जाणवून मी उचलतो कोरा कागद,

आणि वाचू लागतो एखादी नज्म,

जी कधीही लिहिली गेलेली नसते.

...कधीही.

-----------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com