

Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai
esakal
जवळचे विमानतळ : हुबळी विमानतळ
जवळचे रेल्वेस्थानक : होस्पेट
जवळचे बसस्थानक : होस्पेट
केव्हा जाल? : ऑक्टोबर ते फेब्रुवारी
वारसास्थळाची वैशिष्ट्ये : होस्पेटपासून १० किलोमीटर अंतरावर असणारे, तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले हे शहर विजयनगर साम्राज्याच्या समृद्ध कलास्थापत्याचे दर्शन घडवते. विजयनगर राजवंशाद्वारे इ.स. १४व्या ते १६व्या शतकात या शहराचा विकास करण्यात आला. हंपीविषयीची माहिती होयसळ वंशाचे शिलालेख तसेच निकोलो दी काँती, नूनीश, डोमिंगो पाएस, अब्दुल रझाक व बार्बोसा या परकीय प्रवाशांच्या प्रवासवृत्तांतून मिळते. हंपीतील प्रमुख आकर्षण म्हणजे विजयनगर राजवंशाचे कुलदैवत असणाऱ्या विरुपाक्ष स्वामींचे मंदिर. ३६ मीटर उंच गोपुर असणारे हे मंदिर द्रविड वास्तुशैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. एका शिलालेखानुसार हे मंदिर इ.स. ११९९मध्ये नागवंशातील कालीदेव राजाच्या कारकिर्दीत कुरुगोडूनामक गृहस्थाने बांधल्याचा उल्लेख आहे. पुढे विजयनगरच्या राजांनी मंदिराचा विस्तार केला व गोपुर बांधले. मंदिराच्या विशिष्ट बांधणीमुळे मंदिरातील एका भिंतीवर गोपुराचे उलटे प्रतिबिंब पाहावयास मिळते. प्राचीन अभियांत्रिकी प्रगल्भतेचा हा उत्तम पुरावा आहे. मंदिराच्या गर्भगृहातील छपरावर सुंदर चित्रे काढली आहेत. त्याबरोबरच हंपीमध्ये विजय विठ्ठल मंदिर आणि त्याच्या भोवताली असलेली ऐतिहासिक बाजारपेठही प्रसिद्ध आहे. विठ्ठल मंदिरातील विजयरथ विख्यात आहे. या मंदिरातील स्तंभांवर विविध पौराणिक कथा कोरल्या आहेत. काही विशिष्ट खांब वाजवल्यास त्यातून संगीतध्वनी ऐकू येतात. या वास्तूंमध्ये वराह, मकर, व्याल या प्राण्यांची अनेक शिल्प दिसतात. याशिवाय राजमहाल, लोटस महाल, अच्युतदेवराय मंदिर, लक्ष्मीनृसिंह मंदिर, कडलेकालू आणि शशिवेकालू गणेश मंदिर, अंजनाद्री पर्वत अशा अनेक आकर्षक वास्तू हंपीची शोभा वाढवतात.