Henri Matisse: ‘आगीशी खेळणारी चित्रं’ रंगवणारा पिकासोच्या तोडीचा महान प्रतिभावंत! कोण होता ‘फॉविझम’चा प्रणेता?

विसाव्या शतकातील पिकासोच्या तोडीचा प्रतिभावंत हेन्री मातीस याच्या एकापेक्षा एक सरस चित्रकृती पाहून माझे डोळे निवले आणि मन एका अपूर्व आनंदानं भरून गेलं..
Henri Matisse was a French visual artist
Henri Matisse was a French visual artistesakal

डॉ. सुहास भास्कर जोशी

न्यू  यॉर्कमधील म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टला काही दिवसांपूर्वी मी अत्यंत उत्सुकतेनं भेट दिली होती. मला उत्सुकता होती ती या म्युझियममधील व्हॅन गॉगचं स्टारी नाईट पाहण्याची.

मला तहान होती ती पिकासोचं दम्वाझेल बघण्याची. मला इच्छा होती ती साल्वादोर दालीचं पर्सिस्टन्स ऑफ मेमरी, फ्रिडा काहलोचं सेल्फपोर्ट्रेट आणि क्लॉद मोनेच्या वॉटर लिलीज् डोळे भरून पाहण्याची.

सुदैवाने ही सगळी महान पेंटिंग मला बघायला मिळाली. म्युझियमच्या पाचव्या मजल्यावरच्या एकेका दालनात शांतपणे या चित्रकृती पाहात पुढे पुढे जात असतानाच मला एकदम हेन्री मातीसचं द डान्स हे पेंटिंग दिसलं आणि मी थांबलोच. मातीसच्या या पेंटिंगविषयी मी बरंच काही ऐकलं होतं. पुस्तकातून ते पाहिलंही होतं.

पण मूळ पेंटिंग या म्युझियममध्ये आहे हे मात्र मी साफ विसरून गेलो होतो. या पेंटिंगच्या पाठोपाठ मातीसचेच जगप्रसिद्ध द रेड स्टुडिओ दिसलं. आणि मग द यलो कर्टन, द ब्ल्यू विंडो, वूमन ऑन अ हाय स्टूल ही मातीसची गाजलेली पेंटिंगदेखील दिसली.

खजिन्याच्या शोधयात्रेत चालत असताना अनपेक्षित असा वेगळाच मोठा धनलाभ व्हावा, तसं मला वाटलं. विसाव्या शतकातील पिकासोच्या तोडीचा प्रतिभावंत हेन्री मातीस याच्या एकापेक्षा एक सरस चित्रकृती पाहून माझे डोळे निवले. आणि मन एका अपूर्व आनंदानं भरून गेलं.

“मी जशी चित्रं रंगवतो, तशी जर रंगवत नसतो, तर मी मातीससारखी चित्रं रंगवली असती,” असे गौरवोद्‍गार साक्षात पिकासोने ज्याच्याविषयी काढले, तो हेन्री मातीस हा फ्रेंच कलावंत विसाव्या शतकातील पिकासोच्या तोडीचा महान प्रतिभावंत म्हणून कला जगतात आदराने संबोधला जातो. मातीस नेहमी म्हणत असे, “माझ्यावर टीका करण्याचा अधिकार फक्त एका व्यक्तीचा आहे – पिकासोचा! पिकासोचा प्रामाणिकपणा निर्विवाद आहे.”

चित्रं रंगवण्यातील आनंद पुरेपूर उपभोगणारा मातीस हा शांत, तृप्त मनाने आयुष्य जगणारा तपस्वी होता. त्याच्या चित्रांमध्ये सुंदर स्त्रिया, रंगीबेरंगी फुलं, देखणा निसर्ग आणि हे सगळं सुरेखपणे व्यक्त करणारे मूळ (Basic) उत्फुल्ल रंग होते. रंग आणि प्रकाश यावर मातीसचं असामान्य प्रभुत्व होतं.

मातीस ज्या कौशल्यानं रंगांचा वापर करतो, त्याचा पिकासोला मनोमन हेवा वाटत असे. क्युबिझमच्या माध्यमातून सुंदर गोष्टींची मोडतोड करून नव्याने मांडणी करणाऱ्या पिकासोच्या कामाविषयी मातीसला नेहमीच कुतूहल आणि आदर वाटत असे. कामाच्या शैलीत व पद्धतीतच नव्हे तर दिसण्या-वागण्यातही दोघेही दोन टोकाचे होते.

कणखर शरीराचा, धारदार नजरेचा व सतत अस्वस्थ, रंगेल पिकासो, आणि याविरुद्ध उत्तरायुष्यात सततच्या आजारपणामुळे गांजलेला, सौम्य स्वभावाचा आणि पिकासोपेक्षा बारा वर्षांनी मोठा पोक्त-प्रगल्भ मातीस.

परस्परांना ‘स्पर्धक-शत्रू-मित्र’ मानणाऱ्या हेन्री मातीस आणि पिकासो यांच्यामध्ये एक प्रकारची विलक्षण ‘लव्ह-हेट रिलेशनशीप’ होती.

रेखाटन आणि रंगलेपन या दोन्ही गोष्टींनी परिपूर्ण चित्रकला, शिल्पकला, व्यंग्यचित्रं, भित्तिचित्र, वस्तुचित्रं, कोलाज चित्रं अशा अनेक गोष्टीत पारंगत असणारा मातीस उत्तम कला शिक्षक असला, तरी त्याची कलाजगतात ओळख ही ‘फॉविझम’चा प्रणेता आणि मॉडर्न आर्टचा उद्‌गाता अशीच आहे.

विसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीच्या एक-दीड दशकात उभी राहिलेली ‘फॉविझम’ ही एक लक्षवेधी चित्र-चळवळ होती. चळवळीचा कालावधी जरी दहा-वीस वर्षं मानला, तरी खऱ्या अर्थानं १९०५ ते १९०७ हा या चळवळीचा सुवर्णकाळ समजला जातो. हेन्री मातीस, जॉर्ज ब्राक, आंद्रे दरेन हे या चळवळीतील आघाडीचे कलाकार.

फॉविझममधील चित्रं ही आयुष्य किंवा आजूबाजूचा निसर्ग जसा दिसतो तसा न दाखवता भडक, झगझगीत व मूळ रंगात, आणि ओबडधोबड तुटक्या रेषांत- जाडजाड ब्रश स्ट्रोकने दाखवतात. या चित्रांमध्ये कुठेही हळुवारपणा किंवा कोमलता नव्हती, तर जंगली श्वापदांमध्ये असते तशी रानटी निर्भयता होती.

म्हणून त्यांना समीक्षकांनी ‘ले फॉव’ म्हणजे ‘जंगली श्वापदं’ असं म्हटलं. ‘फॉविझम हा साचेबंद पठडीत विचार करणाऱ्या लोकांना दिलेला धक्का आहे’ असं मातीस म्हणत असे. ‘आगीशी खेळणारी चित्रं’ असं या शैलीतील चित्रांना म्हटलं गेलं.

फॉविस्ट चित्रकारांनी १९०५ ते १९०७ या काळात तीन प्रदर्शनं भरवली, पण लवकरच ही चळवळ ओसरत गेली. मातीसने पण काही काळात फॉविझमचा हात सोडून, स्वतंत्र वाट चोखाळली.

अर्थात मातीसच्या आयुष्याचा आणि एकंदर चित्रकारकिर्दीचा विचार केला तर फॉविझम हा एक महत्त्वाचा भाग/ टप्पा होता असं म्हणता येईल.

हेन्री मातीस याचा जन्म ३१ डिसेंबर, १८६९ रोजी उत्तर फ्रान्समधील ले कात्तो काम्ब्रेसी या शहरात झाला. त्याचे वडील श्रीमंत व्यापारी होते. पण हेन्रीने कायद्याचे शिक्षण घ्यावे अशी त्यांची इच्छा होती. हेन्रीने पॅरिसला कायद्याचे शिक्षण घेऊन काही काळ एका लॉ फर्ममध्ये नोकरीदेखील केली.

पण या काळात अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेनंतर घरी बसलेल्या हेन्रीला त्याच्या आईने वेळ घालवण्यासाठी चित्रकलेचे सामान आणून दिले. लवकरच त्याला आपला जन्म चित्रं काढण्यासाठीच झाला आहे, याची जाणीव झाली. आणि त्यानं चित्रकलेचं पद्धतशीर शिक्षण घ्यायला सुरुवात केली.

प्रसिद्ध चित्रकार गुस्ताव मोरोच्या हाताखाली कलाशिक्षण घेतानाच हेन्री लुव्र कलासंग्रहालयात जाऊन महान चित्रकृतींच्या प्रतिकृती करत बसे. या काळात पॉल सेझानचं काम त्याला इतकं आवडलं, की स्वतःची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही त्यानं सेझानचं थ्री बेदर्स हे पेंटिंग पंधराशे फ्रँक मोजून विकत घेतलं.

१८९८ साली त्याने अॅमिली या तरुणीशी विवाह केला. दोन मुलांच्या जन्मानंतर त्याची आर्थिक स्थिती आणखीनच बिकट झाली. फावल्या वेळात हेन्रीसमोर मॉडेल म्हणून बसणारी अॅमिली टोप्या विकण्याचं दुकान चालवून पैसे कमवत असे.

१९०५च्या सुमारास अभिजात शैलीला विरोध करणारा चित्रकारांचा एक गट मातीसच्या नेतृत्वाखाली तयार झाला. चेहरे हिरवे आणि पाणी लाल रंगाचे का असू नये, असे प्रश्न विचारत या चित्रकारांनी आपली चित्रं प्रदर्शनात मांडली. या प्रदर्शनात मातीसने अॅमिलीचे पोर्ट्रेट -वूमन विथ अ हॅट सादर केले.

८०.६४ X ५९.६९ सेंटीमीटर आकाराच्या या पेंटिंगने कलाविश्वात प्रचंड खळबळ माजवली. याचं कारण म्हणजे ओबडधोबड ब्रशस्ट्रोक, भडक व उजळ रंगांचा आक्रमक वापर, आणि मुख्य म्हणजे ते हिरवे कपाळ-नाक-गाल असणारे स्त्रीचे पोर्ट्रेट होते. यातूनच ‘फॉविझम’चा जन्म झाला. सध्या हे पेंटिंग सॅनफ्रान्सिस्कोच्या म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टमध्ये पहाण्यासाठी उपलब्ध आहे.

मातीसने १९०६ साली फॉविस्ट शैलीतील आणखी एक पेंटिंग जॉय ऑफ लाइफ सादर केले. १७६ X २४० सेंटीमीटर आकाराच्या या पेंटिंगमध्ये मातीसने उजळ झगझगीत केशरी, लाल, निळा, पिवळा आणि हिरवा या रंगांचा वापर करून, निसर्गाचा आणि आयुष्याचा आनंद उपभोगणाऱ्या नग्न आकृती नृत्य-गायन-वादन करताना दाखवल्या होत्या. पुढच्याच वर्षी म्हणजे १९०७ साली मातीसने ‘फॉविस्ट’ शैलीत रंगवलेलं ब्ल्यू न्यूड हे पेंटिंग हे शिकागोमधील प्रेक्षकांच्या असं काही रोषास कारणीभूत झालं की संतप्त जमावानं हे पेंटिंग जाळून टाकलं.

पुढे १९०८मध्ये मातीसने द हार्मनी इन रेड हे फॉव शैलीतील एक महत्त्वाचे पेंटिंग सादर केले. १८० X २२० सेंटीमीटर आकाराच्या या चित्रात लाल रंगाची भिंत, लाल टेबल, लाल फळं असा एकीकडं लाल रंगाचा प्रभाव, तर दुसरीकडं डाव्या कोपऱ्यात खिडकीबाहेर फिकट निळसर रंगांची फुलं दिसतात.

आणि यातून एक प्रकारची, लाल रंगातील सुसंगत पण निळ्याशी विरोधात्मक रचना लक्ष वेधून घेते. त्यात पुन्हा मातीसने वस्तूंची मांडणी अशी केली आहे, की त्यातून त्रिमितीय अनुभव जाणवत राहातो.

मातीसने १९०८ साली चित्रकलेचे शिक्षण देणारी संस्था स्थापन केली. मातीस उत्तम शिक्षक तर होताच, पण चित्रकलेबाबत तो सतत नवनवीन प्रयोग, संशोधन करत असे.

चित्रकलेबाबतचे आपले विचार त्याने नोट्स ऑफ ए पेंटर या पुस्तिकेत व्यक्त केले आहेत. हळूहळू देशा-परदेशात मातीसची लोकप्रियता वाढू लागली.

१९०९च्या दरम्यान त्याचा रशियन चाहता सर्जी शुकीन याच्याकरिता त्याने डान्स आणि म्युझिक ही मोठ्या आकाराची पेंटिंग केली. यापैकी १९०९ सालचे डान्स हे २५९ X ३९० सेंटीमीटर इतक्या भव्य आकाराचं अभ्यासचित्र या लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे सध्या न्यू यॉर्कच्या म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टमध्ये आहे.

याचं १९१० साली केलेलं अंतिम पेंटिंग रशियातील पिट्सबर्ग इथे आहे. मॉडर्न आर्टची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या पेंटिंगमध्ये निळ्या-हिरव्या रंगांच्या पार्श्वभूमीवर लाल रंगातील पाच नग्न स्त्रिया मुक्तपणे नाचताना दिसत आहेत.

Henri Matisse was a French visual artist
Nashik Child Artist : नाशिकच्या बालकलाकारांची अभिनय क्षेत्रात भरारी!

१९११ साली रंगवलेले तैलचित्र -द रेड स्टुडिओ ही मातीसची आणखी एक महत्त्वपूर्ण कलाकृती होय. १६२ X १३० सेंटीमीटर आकाराचे हे पेंटिंग आपण न्यू यॉर्कच्या म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टमध्ये पाहू शकतो. अत्यंत झगझगीत, उजळ लाल रंगामध्ये मातीसच्या स्टुडिओच्या अंतर्भागाचे चित्रण येथे केलेले दिसून येते.

दर्शक डावीकडे कोपऱ्यात उभं राहून स्टुडिओतील खुर्ची, टेबल, घड्याळ, खिडकी अशा वस्तू पण चित्रकाराच्या लाल रंगाच्या चष्म्यातून पाहतोय असं वाटतं. पेंटिंग रंगवण्याचा शीण आला की मातीस दुसऱ्या कलामाध्यमाकडे वळत असे.

१९२०च्या दरम्यान त्याने शिल्पकलेकडे आपला मोर्चा वळवला. त्याने त्याच्या हयातीत साठ शिल्पे तयार केली. यापैकी १९२५ साली केलेले लार्ज सीटेड न्यूड हे शिल्प प्रसिद्ध आहे. १९३०च्या आसपास त्याने पिट्सबर्ग शहराजवळच्या मेरियम या शहरातील डॉ. बर्नेस वस्तुसंग्रहालयात भव्य म्युरलची उभारणी केली.

१९३५ साली ताहिती बेटाला भेट देऊन आल्यावर त्याने व्यंग्यचित्रं हा कलाप्रकारही समर्थपणे हाताळला. शेवटपर्यंत त्याची कलासाधना चालूच होती. १९४८ साली त्यानं रंगवलेलं लार्ज इंटेरियर इन रेड हे त्याचं शेवटचं तैलरंगातील चित्र.

पोटावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर मात्र त्याच्या चित्रं रंगवण्यावर मर्यादा आल्या. अर्थात पेंटिंग रंगवणं थांबवल्यानंतरही त्याने कोलाज चित्रं करणं चालूच ठेवलं. वयाच्या ८५ व्या वर्षी ३ नोव्हेंबर,१९५४ रोजी वृद्ध मातीसचे हृदयविकाराने निधन झाले.

‘वृद्ध होणं थांबवणं तुमच्या हातात नाही, पण पिकून छान वृद्ध होणं मात्र नक्कीच तुमच्या हातात आहे,’ असं मानणारा मातीस शरीराच्या व्याधींनी भलेही शेवटी शेवटी गांजला असला, तरी मनानं कायम कलासाधनेत मग्न आणि नेहमीच आनंदी राहिला. कारण मातीस नेहमी म्हणत असे, “कला ही नेहमी मन प्रसन्न करणारी असावी.

मला तर वाटतं, कला ही आरामखुर्चीसारखी असावी, की जिच्यायोगे चित्रं बघणाऱ्या रसिकांना विश्रांती घेतल्याचं समाधान आणि आनंद मिळेल.”

बाकी मातीसची चित्रं बघणाऱ्या रसिकांना हा आनंद आणि हे समाधान नेहमीच मिळत असते, यात काही शंका नाही.

-------------------

Henri Matisse was a French visual artist
M.F. Husain : कलाकाराचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हेच अंतिम मूल्य मानणाऱ्या एम.एफ. हुसेन यांनी आपली तत्त्वं मात्र सोडली नाहीत..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com