
शितल मुरांजन
कटाची आमटी
वाढप
५ ते ६ व्यक्तींसाठी
साहित्य
पाव टीस्पून जिरे, ४ मिरे, २ लवंगा, अर्धा इंच दालचिनी, पाव कप सुके खोबरे, १ टीस्पून बेडगी मिरची पावडर, १ टीस्पून चिंचेचा कोळ, १ टीस्पून गूळ, १ टीस्पून गोडा मसाला, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून राई, चिमूटभर हिंग पावडर, १० ते १२ कढीपत्ता पाने, कोथिंबीर, २ टीस्पून (फोडणीसाठी) तेल, चवीपुरते मीठ, शिजवलेल्या डाळीचा कट (पुरणपोळीसाठी चणा डाळ शिजवल्यावर चाळणीतून डाळ काढल्यानंतर जे पाणी उरते, ते म्हणजे डाळीचा कट)
कृती
सर्वप्रथम नॉनस्टिक पॅनमध्ये जिरे, मिरे, लवंगा, दालचिनी, सुके खोबरे आणि चार-पाच कढीपत्त्याची पाने खमंग भाजून घ्यावीत. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. यानंतर एका पातेल्यात तेल गरम करून त्यात राई, हिंग, हळद आणि कढीपत्ता तडतडू द्यावा. त्यात तयार केलेले सुके वाटण घालून छान परतून घ्यावे. नंतर त्यात डाळीचा कट घालून चांगले ढवळावे. मग त्यात बेडगी मिरची पावडर, चिंचेचा कोळ, गूळ आणि गोडा मसाला घालून मिश्रण एकसंध करावे व मिश्रणाला उकळी येऊ द्यावी. शेवटी वरून कोथिंबीर भुरभुरून गरमागरम पुरणपोळीसोबत चविष्ट कटाची आमटी सर्व्ह करावी.