

Homemade Biryani Business
esakal
घरगुती व्यावसायिकाकडून बिर्याणी मागवली की ती मनाप्रमाणे करून मिळते. याशिवाय घरगुती बिर्याणीच्या व्यवसायात ग्राहकांचा आणखी एक फायदा होतो, तो म्हणजे अत्यंत माफक दरामध्ये बिर्याणी उपलब्ध होते. याच दोन गोष्टींमुळे सध्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये, घरगुती पार्टीमध्ये, गेट-टुगेदर, भिशी, संमेलन अशा कार्यक्रमांमध्ये घरगुती बिर्याणीचा बेत हे ठरलेले समीकरण झाले आहे.
‘ते सगळं सोडा... बिर्याणी कुठून मागवायची ते सांगा...!’ कॉर्पोरेट ऑफिसमध्ये, मित्रांच्या पार्टीमध्ये, महिलांच्या किटी पार्टीमध्ये किंवा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये हा प्रश्न हमखास विचारला जातो. कारण बिर्याणी समस्त भारतीयांच्या आणि मराठीजनांच्या जवळचा विषय आहे. कोल्हापूरच्या तांबड्या-पांढऱ्याची, सोलापूरच्या भाजक्या मटणाची, मराठवाड्यातल्या ढवारा मटणाची, खानदेशातल्या तर्रीबाज रश्शाची आणि कोकणातल्या कालवणाची संस्कृती जशी त्या त्या भागात रुजलेली आहे, तशीच बिर्याणीची संस्कृती मूळची नसली, तरी गेल्या दोन-तीन दशकांमध्ये रुजलेली आहे. काही हॉटेलांनी बिर्याणीला मिळवून दिलेले वैभव दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याच संधीचा फायदा घेत अस्सल घरगुती, साजूक तुपातली, वेगवेगळ्या मसाल्यांच्या माफक वापराने युक्त असलेली निरनिराळ्या व्यंजनांच्या सुगंधाने दरवळणारी बिर्याणी आपणही लोकांपर्यंत पोहोचवावी, या विचाराने मीदेखील दोन महिन्यांपूर्वी या व्यवसायात उडी घेतली.