राहुल दर्डा
मार्केटिंग क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे क्रांती घडविणारे तंत्रज्ञान ठरले आहे. उत्पादनाबद्दल ग्राहकांच्या सातत्याने बदलणाऱ्या अपेक्षा, प्रचंड प्रमाणात निर्माण होणाऱ्या माहितीचे (डेटा) व्यवस्थापन, त्या माहितीच्या विश्लेषणातून पुढे येणारे निष्कर्ष आणि त्याचा प्रभावी वापर करून उत्पादनाचा दर्जा वाढविण्यावर भर दिला आहे.
एआयने मार्केटिंग क्षेत्राला नव्या संधी दिल्या आहेत, पण त्याचबरोबर आव्हानेही पुढे आली आहेत. भविष्यात ग्राहकांच्या गरजा पूर्ण करताना नैतिकता आणि गोपनीयतेचा विचार करणे आवश्यक आहे. यामुळे मार्केटिंग अधिक स्मार्ट, प्रभावी आणि ग्राहककेंद्रित होईल.
एआय आणि ऑटोमेशन यांनी मार्केटिंग क्षेत्राचा चेहरामोहराच बदलला आहे. मार्केटिंग क्षेत्रातील प्रत्येकजण स्वतःचा अनुभव आणि उद्योगांमध्ये प्रचंड वेगाने होणारे बदल यांची सांगड घालत आहे.
उत्पादनाबद्दलचा ग्राहकांना आलेला अनुभव अधिक पर्सनलाइज्ड करणे, संकलित केलेल्या डेटाच्या आधारावर ग्राहकांची सखोल माहिती मिळविणे, डेटा विश्लेषणातून आलेली निरीक्षणे, निष्कर्ष यातून ग्राहक (कस्टमर) आणि लक्ष्य (टार्गेट) अधिक स्पष्टपणे निश्चित करता येऊ लागले आहे. या सर्व गोष्टींमुळे मार्केटिंग अधिक प्रभावी आणि कार्यक्षम होण्यास मदत मिळत आहे.