Legal Will : मृत्युपत्र खरे नसल्याचा संशय असल्यास त्याला आव्हान देता येते का?

वडिलांची मिळकत स्वकष्टार्जित किंवा स्वतंत्र असेल तर त्यांना त्यांच्या मिळकतींबाबत इच्छापत्र करण्याचा व इच्छापत्राद्वारे सदर मिळकत त्यांना हव्या त्या व्यक्तीला देण्याचा पूर्ण अधिकार
Legal will
Legal willesakal

अॅड. सायली गानू- दाबके

माझे वय ६८ वर्षे आहे. पत्नी तीन वर्षांपूर्वी वारली. मला एक मुलगा व मुलगी अशी अपत्ये आहेत. मुलीचे लग्न झाले आहे व ती पती, मुलांसमवेत अमेरिकेत राहते.

मी सध्या माझ्या मुलासोबत राहतो. माझा मुलगा व सून माझा सांभाळ करतात. माझ्या मालकीची एक सदनिका आहे.

मी मुलगा व सुनेबरोबर राहत असल्याने सध्या ती वापरात नाही. माझी सदनिका मला माझ्या सुनेच्या नावे करण्याची इच्छा आहे, तर मी हे कसे करू शकतो?

तुम्हाला तुमची सदनिका सुनेला मालकी हक्काने कधी द्यावयाची आहे यानुसार विविध पर्यायांचा विचार करता येतो.

तुम्हाला तुमच्या पश्चात तुमची सदनिका सुनेच्या नावे करायची इच्छा असल्यास तुम्ही तुमचे इच्छापत्र करून त्यात सदरच्या सदनिकेची मालकी तुमच्या सुनेला देऊ शकता. असे केल्यास त्या सदनिकेची मालकी तुमच्या सुनेला तुमच्या पश्चातच मिळेल.

तुमच्या हयातीत तुम्ही या सदनिकेचा तुम्ही हवा तसा उपयोग करू शकाल अथवा विनियोग करू शकाल. कारण तुमच्या हयातीत सदर सदनिकेची मालकी तुमचीच राहील.

परंतु विल न केल्यास मात्र तुमच्या सदनिकेत फक्त तुमचा मुलगा व मुलगी यांना प्रत्येकी ५० टक्के हिस्सा मिळेल आणि सुनेला काहीही हक्क मिळणार नाही. त्यामुळे सुनेला तुमच्या पश्चात सदनिकेची मालकी द्यायची झाल्यास विल करणे गरजेचे ठरेल.

तुम्हाला तुमची सदनिका आत्ताच तुमच्या हयातीतच तुमच्या सुनेच्या नावावर करायची असल्यास तुम्ही बक्षीसपत्र करू शकता.

बक्षीसपत्राने तुमच्या सुनेला सदर सदनिकेची मालकी लगेचच मिळेल. मग तुमची सून या सदनिकेचा हवा तसा उपयोग करू शकते अथवा विक्रीदेखील करू शकते. तुम्ही त्याच्यात आडकाठी करू शकणार नाही कारण बक्षिसपत्र केल्यानंतर सदर सदनिका तुमची मालकीची राहणार नाही.

बक्षीसपत्र करताना त्यावर पडणारा स्टॅम्प आणि नोंदणी फी हा खर्चदेखील तुम्हाला बक्षीसपत्र करतेवेळीच करावा लागेल. हा खर्च त्या सदनिकेच्या बाजारभावाप्रमाणे ठरतो. विल केल्यास त्यावर स्टॅम्प खर्च पडत नाही.

Legal will
Legal Will : तरुणवयातच मृत्युपत्र करावं का?

माझे वडील गेली पाच वर्षे आजारी होते व माझ्याकडेच राहायला होते. माझे पती व मीच त्यांची देखभाल करत होतो, आणि त्यांच्या उपचारांचा खर्चदेखील आम्ही दोघे करत होतो. माझा भाऊ याच शहरात असूनही त्यांच्याकडे लक्ष देत नसे.

नुकतेच माझे वडील गेले. माझ्या भावाच्या ताब्यात असलेल्या त्यांच्या मृत्युपत्रानुसार (तारखेवरून दोन वर्षांपूर्वी केलेले दिसते) त्यांची सर्व मिळकत माझ्या भावाच्या नावे केलेली आहे. माझ्या वडिलांच्या मिळकतीवर मला हक्क कसा सांगता येईल व माझा वाटा कसा मिळवता येईल?

जर तुमच्या वडिलांची मिळकत स्वकष्टार्जित किंवा स्वतंत्र असेल तर त्यांना त्यांच्या मिळकतींबाबत इच्छापत्र करण्याचा व इच्छापत्राद्वारे सदर मिळकत त्यांना हव्या त्या व्यक्तीला देण्याचा पूर्ण अधिकार होता.

अशा अधिकारानुसार त्यांनी विल केले असल्यास तुम्हाला त्यांच्या मिळकतीत तुमचा हिस्सा मागता येणार नाही. तुम्हाला तसा हक्क नाही.

परंतु सदर विलबद्दलच तुम्हाला काही शंका अथवा संशय असल्यास - ते विल भावाने वडिलांकडून बळजबरीने, फसवून, धाक दाखवून किंवा त्यांना घाबरवून करून घेतले आहे ते वाटत असेल किंवा सदरच्या विलच्या खरेपणाबद्दल शंका असल्यास तर त्या बाबतीत सदरचे विल अवैध ठरवण्यासाठी कोर्टात जाऊ शकता. अशा परिस्थितीत वकिलाचा सल्ला घेऊनच पुढची कार्यवाही करावी.

जर तुमच्या वडिलांच्या मिळकती किंवा त्यातील काही हिस्सा हा वडिलोपार्जित असेल तर मात्र तुम्हाला त्यात हक्क सांगता येऊ शकतो. त्यामुळे तपशीलवार सल्ल्यासाठी वकिलांना भेटणे चांगले ठरेल.

महत्त्वाचे : या लेखमालेत प्रश्‍नकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना, त्यांनीच दिलेल्या माहितीच्या आधारावर उत्तरे देण्याचा प्रयत्न आहे. तरी या उत्तरांना कायदेशीर सल्ला समजू नये. या उत्तरांच्या आधाराने कुठलेही कायदेशीर पाऊल उचलू नये. आपले प्रश्न व शंकांबद्दल वकिलांचा सल्ला घेऊनच योग्य ती कृती करावी.

-----------------------

Legal will
Law News: 28 व्या आठवड्यात गर्भपाताला परवानगी; अत्याचार पीडितेसाठी सुप्रीम कोर्टाचं मोठं पाऊल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com