डॉ. श्रुती पानसे
गंमत म्हणून एखादं खेळणं मुलांच्या हातात द्यावं, तसा मोबाईल देऊ नये. तो बऱ्यापैकी घातक आहे. तो एक विळखा आहे. त्याचं व्यसन लागू शकतं. एकदा ते लागलं की लवकर सुटत नाही. खूप प्रयत्न करावे लागतात. पहिल्या तीन वर्षांत तर मुलांच्या आसपास गप्पा मारणारी, गाणी म्हणणारी खरीखुरी माणसंच हवीत.
साधारणपणे पहिल्या तीनेक वर्षांत मुलांना काय लागतं? त्यांना ज्या गोष्टींची खरीखुरी गरज आहे, ते देतोय का आपण? का आपल्या घरातलं चित्रपण असंच आहे... बाळ मस्तपैकी पाळण्यात पहुडलंय. वरच्या पंख्याकडे बघून हात-पाय हलवतंय. त्या पंख्याशी हूं हूं करत बोलायचा प्रयत्न चालला आहे. त्याला बोलायचं आहे, पण त्याचे आई-बाबा आपापल्या स्क्रीनवर काम करताहेत. बाळ रडलं की ते त्याला घेणार, तोपर्यंत आपापलं काम करणार.