

River conservation
esakal
गुरुदास नूलकर
नदी निसर्गाचा केवळ एक घटक नाही, तर ती पृथ्वीवरील जीवनाचा अखंड प्रवाह आहे. उगमापासून समुद्रापर्यंतचा तिचा प्रवास असंख्य जीवांना पोसतो, शेतीला आधार देतो, हवामान संतुलित ठेवतो आणि मानवी संस्कृतीला आकार देतो. म्हणून नदीकडं केवळ जलस्रोत म्हणून न पाहता, एक सजीव परिसंस्था म्हणून पाहण्याची गरज आहे.
शहरातील धकाधकीच्या जीवनात नदीकडे आपलं लक्ष तरी जातं का? आपलं लक्ष जातं ते कदाचित पूल ओलांडताना किंवा गणपती विसर्जन करताना. पण सामान्यतः नदीकडे दुर्लक्षच केलं जातं. सुखसोयींनी समृद्ध झालेल्या आधुनिक जीवनशैलीत नदीचं महत्त्व अजिबात दिसून येत नाही आणि अर्थव्यवस्थेला त्याची जाणीवही होत नाही. आपलं जीवन, शेती आणि मानवी अर्थव्यवस्था या तीनही गोष्टी नद्यांवरच अवलंबून आहेत, याचा विसर पडत चालला आहे.
दुर्दैवानं आज नदीची ओळख ‘वाहणारं पाणी’ अशी नव्हे, तर ‘वाहणारं सांडपाणी’ इतकीच उरली आहे. पण नदी सतत बदलणारी, जिवंत आणि असंख्य जीवसृष्टींना पोसणारी नैसर्गिक परिसंस्था आहे. पृथ्वीवरच्या मानवी संस्कृतींचा इतिहास पाहिला, तर जवळजवळ सर्व महान संस्कृती नदीकाठावरच फुलल्या, आणि त्याला कारणीभूत होती शेती. टायग्रिस आणि युफ्रेटीसच्या खोऱ्यात मेसोपोटेमिया, नाईलच्या काठी इजिप्तची, यांगत्से आणि पिवळ्या नदीच्या परिसरात चीनची संस्कृती, तर भारताची संस्कृती सिंधू आणि गंगेच्या खोऱ्यात विकसित झाली. त्यामुळं नदी समजून घेणं म्हणजे आपल्या सभ्यतेचं मूळ समजून घेणं होय.