Premium|Gen Z sleep crisis : जेन-झी आणि झोप...

How Sleep Supports Physical Health : पुरेशी झोप ही केवळ विश्रांती नसून शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. झोपेच्या कमतरतेमुळे मधुमेह, स्थूलत्व, हृदयविकार आणि भावनिक अस्थिरतेचा धोका वाढू शकतो.
How Sleep Supports Physical Health

How Sleep Supports Physical Health

esakal

Updated on

डॉ. वैशाली देशमुख

मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, स्थूलत्व यांसारखे जीवनशैलीचे आजार निद्रेच्या कमतरतेमुळे होतात, असं आढळलं आहे. वजन कमी करायचा प्रयत्न करणारे तरुण मुख्यतः आहारावर आणि व्यायामावर लक्ष केंद्रित करतात. पण झोप पूर्ण झाली नाही, तर या सगळ्याचाच काही उपयोग होत नाही.

अलीकडेच पेपरमध्ये बातमी वाचली. दक्षिण कोरियामधल्या हान नदीकाठी एक वेगळीच स्पर्धा आयोजित केली होती, झोपायची स्पर्धा! कोण किती वेळात आणि किती गाढ झोपी जाऊ शकतं हे मशिन्स लावून तपासलं गेलं. एक बऱ्यापैकी दमलेला तरुण येऊन क्षणात गाढ झोपी गेला आणि त्यानं ती स्पर्धा जिंकली. अशी स्पर्धा का घ्यायला लागत आहे? कारण दक्षिण कोरिया चोवीस तास ‘ऑन’ असतो. तिथली संस्कृती भरपूर काम आणि दणकून अभ्यास करायला उत्तेजना देणारी आहे. त्यामुळे तिथल्या लोकांची सरासरी झोप फक्त ३ ते ४ तास असते म्हणे! झोप म्हणजे आळशीपणा नव्हे, ती शरीराला आवश्यक असणारी चांगली गोष्ट आहे, आणि ती घेतल्यावर किती ताजंतवानं वाटतं हे लोकांना समजावं, म्हणून तिथं अशा प्रकारच्या प्रतिकात्मक स्पर्धा घ्यायची वेळ आलीये!

शरीराची नैसर्गिक लय

सरकॅडिअन ऱ्हिदमविषयी आपण सगळ्यांनी ऐकलं आहे. सरकॅडिअन ऱ्हिदम म्हणजे शरीराची नैसर्गिक लय जोपासणारं चक्र, आपल्या शरीरातलं अंतर्गत घड्याळ. मेंदूच्या हायपोथॅलॅमस या भागात हा पेसमेकर असतो. त्याची आपापली कार्यपद्धती असते. त्यानुसार तो आपल्या चयापचय क्रिया, रक्तदाब, शरीराचं तापमान, पेशींची दुरुस्ती, अन्नपचन या शरीर तग धरणाऱ्या अत्यावश्यक मूलभूत क्रिया नियमितपणे होताहेत ना, हे बघत असतो. त्यावर दिवस आणि रात्र, वातावरणातील प्रकाशाचं प्रमाण, आपली दैनंदिनी, खाणंपिणं अशा काही बाह्यघटकांचा परिणाम होतो. त्यानुसार मेंदूमधल्या ग्रंथी संप्रेरकांच्या स्रवण्याची व शरीरातल्या चयापचय क्रियांची लय ठरवतात. साधारणपणे सूर्य अस्ताला जातो, तशी माणसाची क्रियाशीलता कमी होत जाते. अंधार पडल्यावर मेलॅटोनिन या झोपेच्या संप्रेरकाची पातळी वाढवायला हरकत नाही, असा संदेश संबंधित ग्रंथीकडे पाठवला जातो. हालचाली मंदावतात, माणसं झोपी जातात.

या बाह्य वर्तणूक बदलांबरोबरच अंतर्गत अवयवही आपला वेग कमीजास्त करतात. झोप शरीराची दिवसभरात झालेली झीज, मोडतोड दुरुस्त करते, पचनक्रिया संथ करते. झोपेत श्‍वसनसंस्था, रक्ताभिसरण संस्था सुस्तावतात व अर्धजाणिवेत संथ गतीनं काम करतात. मेंदू मिळालेल्या माहितीची क्रमवारी, प्रतवारी करून स्मरणाच्या वेगवेगळ्या कप्प्यात साठवून ठेवतो. नको असलेल्या माहितीची विल्हेवाट लावतो. संप्रेरक संस्था झोपेत सक्रिय होते. ग्रोथ हार्मोनसारखी संप्रेरकं रात्री मोठ्या प्रमाणात स्रवतात. ‘झोपेत बाळं वाढतात’ असं पूर्वी म्हटलं जायचं ते यामुळेच. भावनिक आणि वैचारिक मेंदूवरही या अंतर्गत लयीचा मोठा प्रभाव पडतो. भावनिक स्थैर्य, विचार करण्याची क्षमता, प्रतिकूलता हाताळणं, मनःस्थिती सुधरवणं अशा मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या घटकांचा समतोल साधण्यासाठी ही लयच कारणीभूत असते. 

झोपेची महती सांगणारी ही सगळी माहिती इतकी विस्तारानं सांगण्याचं कारण म्हणजे, आपल्या जेन-झीची झोप कमी झाली आहे. अर्थातच हे सगळे फायदे त्यांना मिळत नाहीयेत. पूर्वी माणूस आपला दिवस सूर्याच्या वेळापत्रकानुसार चालवायचा. सूर्योदयाबरोबर उठायचं, दिवसभराची कामं करायची, शरीराला अन्नातून ऊर्जा पुरवायची, त्या अन्नाच्या पचनाची व्यवस्था लावायची. हे सगळं वातावरणात भरपूर प्रकाश असताना केलं जायचं. अंधार पडल्यानंतर या क्रियाशीलतेला विराम दिला जायचा. आता मात्र कृत्रिम प्रकाश उपलब्ध असल्यामुळे हे वेळापत्रक कोलमडलं आहे. परिणामस्वरूप ही सगळीच कार्यं विस्कळीत झाली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com