पांढरा रंग आणि विम्बल्डन

विम्बल्डन जितकी खेळासाठी प्रसिद्ध आहे, तितकीच प्रसिद्ध आहे स्पर्धेच्या काटेकोर नियमांसाठी!
championship tennis
championship tennissaptahik

इरावती बारसोडे

टेनिस विश्वातली सर्वाधिक मानाची स्पर्धा, अर्थात ‘विम्बल्डन’ सध्या सुरू आहे. विम्बल्डन म्हणजे टेनिसपटूंची पंढरी! विम्बल्डन जितकी खेळासाठी प्रसिद्ध आहे, तितकीच प्रसिद्ध आहे स्पर्धेच्या काटेकोर नियमांसाठी! नियम सगळ्याच खेळांमध्ये असतात, पण विम्बल्डनमध्ये ड्रेस कोडबाबतचे नियमही अतिशय कडक आहेत, अगदी स्पर्धा सुरू झाली तेव्हापासूनच.

विम्बल्डन टेनिसमधली सर्वात जुनी स्पर्धा. तब्बल १४६ वर्षं झाली विम्बल्डन खेळली जातेय. पण इतक्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘पांढऱ्या’ ड्रेस कोडमध्ये महत्त्वाचा बदल केला गेला आहे. हा बदल खरंतर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच जाहीर केला होता, आणि आत्ता खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेमध्ये तो दिसतोही आहे.

महिला खेळाडूंना आता गडद रंगाच्या अंडरशॉर्ट्‌स घालता येणार आहेत, पण त्याही शॉर्ट्‌स किंवा स्कर्टपेक्षा लांब नसतील तरच. महिला खेळाडूंना मासिक पाळीदरम्यान इतर गोष्टींची चिंता सोडून फक्त खेळावर लक्ष केंद्रित करता यावं यासाठी ड्रेस कोडच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. हा एक बदल वगळता आयोजकांचा पांढऱ्या रंगाचा आग्रह कायम आहे.

पुरुष व महिला खेळाडूंचे स्कर्ट, शॉर्ट्‌स, मोजे, कफ, टोप्या, हेडबॅण्ड, बंडाना, रिस्टबॅण्ड हे सगळं सगळं ‘ऑलमोस्ट व्हाइट’ असलं पाहिजे. आणि ऑलमोस्ट व्हाइटमध्ये ऑफ व्हाइट आणि क्रीम कलर बसत नाही. या सगळ्यावरच्या ट्रिम रंगीत असू शकतात, पण त्याची रुंदी एक सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावी.

एवढंच नाही तर इक्विपमेंट बॅग आणि मेडिकल बॅगसुद्धा पांढरीच हवी. अगदीच आवश्यकता असेल तर आणि तरच रंगीत बॅग वापरता येईल.

पण पांढऱ्या रंगाचाच आग्रह का? या प्रश्नाचं उत्तर शोधताना विम्बल्डनच्या इतिहासात डोकवावं लागेल. विम्बल्डन ही मुळात ‘साहेबां’ची स्पर्धा. ब्रिटिश त्यांचे ‘एटिकेट्स’ आणि ‘मॅनर्स’ यासाठी आजही प्रसिद्ध आहेतच. खेळताना घाम तर येणारच, पण कपड्यांवर घाम दिसणं हे तर असभ्यपणाचं लक्षण.

म्हणून मग खेळताना पांढऱ्या रंगाचाच पोषाख घालायचा, कारण पांढऱ्या रंगामुळे घाम लपतो. घामाचे डाग दिसत नाहीत. हे नियम आजही काटेकोरपणे पाळले जातायत.

विम्बल्डनच्या नियमांची ख्याती असली, तरी खेळाडूंना मात्र कधीकधी हे नियम जाचकच वाटतात. अमेरिकेचा सेलिब्रेटेड खेळाडू आंद्रे आगासीनं १९८८ ते १९९०च्या दरम्यान ड्रेस कोडच्या कडक नियमांमुळे विम्बल्डनकडे पाठ फिरवली होती. पण विम्बल्डनची महतीच अशी की अखेरीस आगासी विम्बल्डन खेळला आणि जिंकलाही.

विम्बल्डनचे नियम अतिकडक आहेत, असं आठ वेळा विम्बल्डन जिंकणारा रॉजर फेडररही म्हणाला होता. २०१३च्या स्पर्धेमध्ये त्याच्या बुटांचे सोल केशरी रंगाचे होते म्हणून आयोजकांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर बुटांचे सोलही पांढरे हवेत असा नियमांमध्ये बदल करण्यात आला होता. तेव्हा नाराज झालेला फेडरर म्हणाला होता, ‘हे नियम अतिकडक आहेत, असं माझं वैयक्तिक मत आहे.’

गेल्या वर्षीच्या स्पर्धेच्यावेळी महिला खेळाडूंना गडद रंगाच्या अंडरशॉर्ट्‌स घालता याव्यात या मागणीसाठी ‘ॲड्रेस द ड्रेस कोड’ ही मोहीम राबविण्यात आली होती. तसंच प्रसिद्ध टेनिसपटू बिली जीन किंग आणि कोच जुडी मरे यांनीही यासंदर्भात आयोजकांवर टिकाही केली होती. या सगळ्याचे पडसाद उमटले आणि नियमात बदल झाला.

हा बदल झाला कारण आयोजकांना ‘विंबल्डन’ हा ब्रँड जपायचा आहे आणि म्हणूनच आयोजक सामाजिक दबावाला झुकले, असं रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोव्हिचचं चरित्र लिहिणारे टेनिस तज्ज्ञ क्रिस बोवर्स यांचं मत आहे. आयोजकांनी हा नियम बदलून एक पाऊल मागं टाकलंय असं त्यांना वाटतं. ‘बीबीसी कल्चर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणतात, ‘ऐंशीच्या दशकानंतर विम्बल्डनचे नियम कडक झाले.

नव्वदीच्या दशकात तर ते अधिकच कडक झाले. गेल्या काही दशकांमध्ये हा काटेकोरपणा काळजीपूर्वक पाळला गेला. पण मग आत्ताच हा बदल का? याचं कारण म्हणजे, काहीही करून आयोजकांना ‘विम्बल्डन’ हा ब्रँड जपायचा आहे.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com