डॉ. आर. टी. पाटील, डॉ. रवींद्र नाईक
भारतामध्ये अन्नप्रक्रिया उद्योग हा आर्थिक विकास, रोजगारनिर्मिती आणि अन्नसुरक्षा यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा उद्योग शेती आणि उत्पादन क्षेत्र यामध्ये दुवा म्हणून कार्य करतो. कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करून त्यात मूल्यवर्धन करणे, साठवणूक व वाहतुकीमधील अपव्यय कमी करणे आणि लाखो लोकांना रोजगार देणे ही या क्षेत्राची वैशिष्ट्ये आहेत. अन्नप्रक्रिया उद्योग निर्यातीला चालना देऊन देशाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) मोठा वाटा उचलत असल्याचे दिसते.
जगाच्या क्षेत्रफळाच्या २.४ टक्के भाग भारताने व्यापला आहे. जगाच्या तुलनेत भारतात गोड्या पाण्याचे स्रोत चार टक्के आहेत आणि जगातील १६.७ टक्के लोकसंख्या एकट्या भारतात राहते, यावरून पृथ्वीवरील भारताचे स्थान अधोरेखित होते. आता जरा अर्थव्यवस्थेवर दृष्टिक्षेप टाकू या. भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात चौथ्या क्रमांकावर आहे.
नुकतेच जपानला मागे टाकून आपण हा क्रमांक पटकावला आहे. प्राथमिक अंदाजानुसार २०३०पर्यंत भारताचा जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन) ७.३ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल. त्यामुळे भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेला देश म्हणून नावलौकीक मिळवेल. या पार्श्वभूमीवर अन्नप्रक्रिया उद्योगाकडे बघितले पाहिजे.
अन्नप्रक्रिया म्हणजे शेती, दुग्धव्यवसाय, पशुपालन, मांसउद्योग, कुक्कुटपालन किंवा मत्स्यव्यवसायातून मिळालेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते. त्यासाठी कामगार, यंत्र, वीज किंवा वित्त यांचा वापर केला जातो. त्यातून कच्च्या मालाच्या मूळ स्वरूपात बदल करून, त्याला बाजारमूल्य प्राप्त करून देणारी प्रक्रिया म्हणजे अन्नप्रक्रिया होय. हे रूपांतर मानवी किंवा प्राण्यांच्या वापरासाठी योग्य अशा स्वरूपात केले जाते.
यात खाद्यपदार्थांचे संरक्षण, अन्न संरक्षक पदार्थांचा वापर, वाळवणे, टिकवणूक इत्यादी तंत्रज्ञानांचा वापर करून मूल्यवर्धन केले जाते. यामुळे अन्नपदार्थांचे शेल्फ लाइफ वाढते, गुणवत्ता सुधारते आणि अन्न सुरक्षाही मजबूत होते. आज सरकार अन्नप्रक्रिया आणि संबंधित क्षेत्रांना मोठे महत्त्व देत आहे. मात्र, शेती उत्पादनाच्या तुलनेत अन्नप्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व विकास संस्था फारच मर्यादित आहेत. त्यामुळे या क्षेत्रात अजून संशोधन, नवोन्मेष आणि प्रयोगशीलतेची मोठी गरज आहे, जेणेकरून ग्रामीण भागातच प्रक्रिया साखळी उभी राहील आणि शाश्वत विकास घडेल.