india 2036 olympics
Esakal
मिलिंद ढमढेरे
भारताने २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या संयोजन पदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. भारताने यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यामुळेच भारताला ऑलिंपिकचे संयोजन पद मिळाले, तर नवल वाटणार नाही. हे संयोजन पद म्हणजे भारतीय क्रीडा संघटक यांच्या दृष्टीने मोठेच सीमोल्लंघन असेल.
ऑलिंपिक पदक हे भारतासाठी मृगजळच आहे, असे अनेक क्रीडा तज्ज्ञ एकेकाळी म्हणत असत. पण गेल्या दोन ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवलेले यश लक्षात घेतले, तर नजीकच्या काळात भारत क्रीडा क्षेत्रातील महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही. भारत खऱ्या अर्थाने ऑलिंपिक आणि अन्य स्पर्धांच्या बाबत सोनेरी सीमोल्लंघन करील असे खात्रीने सांगता येईल.
ऑलिंपिक किंवा अन्य तत्सम प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये यश मिळवायचे असेल, तर आपल्या देशात क्रीडा संस्कृती रुजली पाहिजे, असे आपण आजपर्यंत अनेक वेळा म्हणत आलो आहोत. गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतीय खेळाडूंनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये यशाची परिसीमा ओलांडली आहे, ती लक्षात घेतली तर भारतासाठी ऑलिंपिक पदक मृगजळ राहिलेले नाही असे विश्वासाने म्हणता येईल.
शासकीय स्तरावर दिसणारे सकारात्मक बदल व वातावरण, पायाभूत क्रीडा सुविधांमध्ये झालेली वाढ, खेळाडूंना मिळणाऱ्या आर्थिक फायद्यांबाबत झालेले लक्षणीय बदल, अर्थार्जनाची हमी, आपल्या पाल्यांना खेळामध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पालकांमध्ये झालेले सकारात्मक बदल अशा अनेक कारणांमुळे गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये क्रीडा क्षेत्रात अतिशय आश्वासक आणि आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे कबड्डी, खो खो, मल्लखांब यांसारख्या पारंपरिक भारतीय खेळांनी जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळविली आहे.