प्राची गावस्कर
अगदी काही दिवसांच्या बाळापासून ते मोठ्या मुलामुलींच्या पादत्राणांमध्ये नवनवे प्रकार येत आहेत. आंतरराष्ट्रीय कंपन्यादेखील भारतीय बाजारपेठेतील संधींचा लाभ घेण्यासाठी आपली नावीन्यपूर्ण उत्पादने येथे आणत आहेत. देशातही नवनव्या कंपन्या ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी पुढे सरसावत आहेत.
माझी भाची राधाला नुकतीच दुसरी मुलगी झाली, तिला भेटायला जाताना मला बाळासाठी काही कपडे आणि वस्तू घ्यायच्या होत्या, म्हणून मी एका मोठ्या दुकानात गेले. दुकान फिरून बघत असताना, मला तिथे लहान बाळांसाठीच्या इवल्या इवल्या बुटांचे इतके सुंदर नमुने दिसले, की बस्स! माझी नजरच हटेना. मी लोकरीच्या, मऊ फरच्या आणि कापडाच्या अशा सगळ्या मिळून सहा जोड्या घेतल्या. त्याचवेळी मला आठवले राधाच्या मोठ्या मुलीसाठी, सात-आठ वर्षांच्या पीयूसाठीही काहीतरी घ्यायला हवे. तिच्यासाठीही कपडे बघत असताना दुकानात मोठ्या मुलांसाठी असलेल्या पादत्राणांच्या विभागाने माझे लक्ष वेधून घेतले.
तिथे विविध कंपन्यांच्या चपलांचे इतके सुंदर जोड, बूट, सॅंडल्स, मोजड्या, लाइट लागणारे बूट, आवाज येणारे बूट व सँडल्स असे अनेक प्रकार होते; काय अन् किती घ्यावे हेच कळेना. तरीही मी त्यातून सुंदरशा गुलाबी रंगाचे लाइट लागणारे बूट आणि एक छानशी चप्पल निवडली. राधाच्या घरी गेल्यावर तिच्या बाळासाठी आणि पीयूसाठी आणलेल्या भेटवस्तू दिल्या. पीयू तर ते बूट, चप्पल पाहून इतकी खूश झाली की लगेच तिने ते पायात घातले आणि नाचायलाच लागली. तिच्या पायात ते सुबक, साजरे बूट अगदी शोभून दिसत होते. छोट्या बाळालाही इवलेसे, मऊसूत कापडाचे बूट अगदी छान बसले. नवा ड्रेस अन् त्याला साजेसे मोजडीसारखे बूट घालून बाळ एकदम गोंडस दिसत होते.
राधाला म्हणाले, ‘अगं इतके प्रकार होते या बूट आणि चपलांमध्ये की काय घ्यावे हेच कळेनासे झाले होते.’ त्यावर तिने तिचा अनुभव सांगितला, ‘हो ना, आता लहान मुलांसाठी अगदी काही दिवसांच्या बाळांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत चपला, बुटांचे इतके प्रकार आणि फॅशन्स दिसतात की किती घेऊ अन् किती नको असे होऊन जाते. ही बाजारपेठ फारच मोठी झालीये आता. अनेक रंग, फॅशन्स, विविध प्रकारचे मटेरियल... अगदी रेलचेल असते. खूप छान वाटते खरेदी करताना. मजा येते.’