Indian Recipe : तुमच्या किचनमध्येही बनवा सोप्या पद्धतीचे कर्नाटकी, पंजाबी, केरळी, गुजराती पदार्थ.!

पौष्टिक, रुचकर कर्नाटकी हिट्टमेणसू, पंजाबी रस्सा, गुजराती उंधियो आणि केरळी मिश्र रस्सा भाजी
Indian Food Recipes
Indian Food Recipes Esakal

उमाशशी भालेराव

कर्नाटकी हिट्टमेणसू

साहित्य

बटाटा, बीन्स, गाजर, कच्ची केळी, सुरण, राजगिऱ्याच्या देठी, शेवग्याच्या शेंगा, पडवळ, काकडी, नवलकोल. सुरण, कच्ची केळी व राजगिरा देठी या भाज्या आवश्यक आहेत. वांगी घेऊ नयेत. प्रत्येक भाजीच्या ८-१० फोडी घ्याव्यात.

मसाल्यासाठी दोन चमचे उडदाची डाळ, २ चमचे धने, १ चमचा काळी मिरी, ५-६ लाल सुक्या मिरच्या - हे पदार्थ तुपावर परतून बारीक वाटून घ्यावेत. अर्ध्या नारळाचे घट्ट व पातळ दूध, १ वाटी ताक, फोडणीचे साहित्य, ७-८ कढीपत्ता पाने.

कृती

नारळ वाटून काढलेले घट्ट दूध वेगळे ठेवावे. नारळाच्या पातळ दुधात सर्व भाज्या शिजवून घ्याव्यात. भाज्या शिजल्यावर चवीनुसार मीठ व वाटलेला मसाला घालून पुन्हा एक उकळी आणावी. दुसरीकडे १ चमचा तुपात मोहरी, हिंग व कढीपत्ता घालून फोडणी करावी व ती फोडणी भाजीत घालावी. भाजीला पातळसर रस ठेवावा. भाजी विस्तवावरून खाली उतरवून नंतर त्यात खोबऱ्याचे दाट दूध व ताक घालून सर्व्ह करावे.

पंजाबी रस्सा

साहित्य

प्रत्येकी साधारण मुठभर मटार, फ्लॉवर, बटाटा, बीन्स, २ बारीक चिरलेले कांदे, १ चमचा आले-लसूण पेस्ट, २ तमालपत्र, २ टोमॅटो, २ चमचे दही, तिखट व मीठ चवीनुसार, ४ चमचे पंजाबी मसाला.

पंजाबी मसाल्यासाठी दोन चमचे मिरे, २ चमचे धने, १ चमचा जिरे, ४-५ मसाला वेलदोडे, ४ दालचिनी तुकडे, १०-१२ लवंगा - हे सर्व मसाले एकत्र करून त्याची मिक्सरमधून कच्चीच पूड करून घ्यावी.

कृती

सर्व भाज्या धुऊन त्यांच्या मोठ्या फोडी कराव्यात. ४ चमचे तेलात तमालपत्राची २ पाने व बारीक चिरलेला कांदा घालून कांदा लाल होईपर्यंत परतावे. नंतर त्यात आले-लसूण पेस्ट घालून पुन्हा परतावे. बारीक चिरलेला टोमॅटो व ४ चमचे पंजाबी मसाला घालून पुन्हा तेल सुटेपर्यंत परतावे. नंतर २ चमचे आंबट दही घालून खूप परतावे. मग त्यात भाज्या घालून पुन्हा परतावे. त्यात २ कप आधण पाणी, तिखट, मीठ व चवीला थोडी साखर घालून थोडे शिजवावे. रस्सा तयार झाल्यावर वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

टीप

भाजीचा रस आपल्याला हवा त्याप्रमाणे दाट वा पातळ ठेवावा.

गुजराती उंधियो

साहित्य

सुरती पापडी, वाल पापडी, कच्ची केळी, सुरण लालकंद, छोटे बटाटे, छोटी वांगी, एक जुडी मेथी (या भाजीत फ्लॉवर, बीन्स, गाजर या भाज्या सहसा घालत नाहीत).

मेथी मुटक्यांसाठी : एक वाटी कणीक, अर्धी वाटी बेसन, १ वाटी खवलेले ओले खोबरे, १ चमचा आले-लसूण पेस्ट, २ चमचे धने-जिरे पूड, अर्धा चमचा ओवा, लाल तिखट पूड, आवडीप्रमाणे मीठ, चवीपुरती साखर.

कृती

मेथी निवडून बारीक चिरून घ्यावी. त्यात कणीक, बेसन, चवीनुसार तिखट व मीठ, धने-जिरे पूड घालावी. ४ चमचे तेलाचे मोहन व हिंग, हळद घालून पीठ चांगले कालवावे. त्याचे मुटके तयार करून तेलात तळावेत. पापडी निवडून घ्यावी. इतर भाज्यांच्या मोठ्या फोडी कराव्यात. डाळीच्या पिठामध्ये तिखट, मीठ, धने-जिरे पूड कालवावी. छोट्या वांग्यांना मधे चीर पाडून त्यात हे डाळीचे पीठ भरावे. एका मोठ्या पातेल्यात ४ चमचे तेल गरम करून त्यात प्रथम ओवा व नंतर आले-लसूण पेस्ट घालावी. त्यात प्रथम पापडीच्या शेंगा व नंतर इतर भाज्या घालाव्यात. खोवलेला नारळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, धने-जिरे पूड, तिखट, मीठ व थोडी साखर घालावी. एक वाफ आल्यावर भरलेली वांगी व कच्च्या केळ्याच्या फोडी घालाव्यात. झाकण ठेवून मंद विस्तवावर शिजवावे. सर्वात शेवटी मेथीचे मुटके घालून भाजी पूर्ण शिजवून घ्यावी. ही भाजी खूप रुचकर लागते.

केरळी मिश्र रस्सा भाजी

साहित्य

बटाटा, फ्लॉवर, मटार, बीन्स, गाजर, कोबी, कच्ची केळी - आवडीप्रमाणे भाज्या घ्याव्यात, बारीक चिरून घ्याव्यात. वांगी अगर पालेभाजी घेऊ नये. १ बारीक चिरलेला कांदा, फोडणीचे साहित्य, ७-८ कढीपत्ता पाने, चवीनुसार मीठ व साखर.

मसाल्यासाठी दोन-तीन हिरव्या मिरच्या, २ चमचे धने, १ चमचा जिरे, इंचभर आले, वाटीभर खोवलेला नारळ - सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.

कृती

सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. स्वच्छ धुऊन घ्याव्यात. २ चमचे तेलात मोहरी, हिंग व ८-१० कढीपत्त्याची पाने घालून फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. नंतर त्यात चिरलेल्या सर्व भाज्या २ कप पाणी घालून शिजवाव्यात. भाज्या शिजल्यावर त्यात वाटलेला मसाला कच्चाच घालावा. अंदाजे मीठ व साखर घालावी. सर्व एकजीव होऊन उकळी आल्यावर रस्सा तयार होतो. हा रस्सा पातळच असतो आणि भाताबरोबर खातात. ब्रेडबरोबरही छान लागतो.

मिश्र कडधान्यांची उसळ

साहित्य

मटकी, मूग, मसूर, चवळी वगैरे कडधान्ये (कडधान्ये समप्रमाणात थोडी थोडी घेऊन एकत्रित सकाळी पाण्यात भिजत घालावीत. संध्याकाळी पाण्यातून उपसून मोड आणायला ठेवावीत.), १ मोठा कांदा, ७-८ लसूण पाकळ्या, १ टोमॅटो, २ चमचे काळा गोडा मसाला, १ चमचा लाल तिखट पूड, आवडीप्रमाणे गूळ, चवीनुसार मीठ, तेल, फोडणीचे साहित्य.

कृती

दोन चमचे तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला लसूण परतावा. नंतर बारीक चिरलेला कांदा परतावा. मोड आलेली कडधान्ये घालावीत. २ कप पाणी घालून शिजवावे. गरज पडल्यास अधिक पाणी घालावे. कडधान्ये शिजल्यावर त्यात काळा मसाला, तिखट, मीठ घालावे. टोमॅटो बारीक चिरून घालावा. हा कडधान्यांचा रस्सा भाताबरोबर आणि ब्रेडबरोबरही छान लागतो.

Indian Food Recipes
Millet: जाणून घ्या कोणती आहेत भरडधान्य आणि त्याचे पदार्थ

काँटिनेंटल मिक्स्ड व्हेज स्ट्यू

साहित्य

बटाटा, फ्लॉवर, गाजर, बीन्स, कोबी, मटार, बेबी कॉर्न, सिमला मिरची, १ कांदा, २ तुकडे दालचिनी.

व्हाइट सॉससाठी चार चमचे मैदा वा कणीक, २ कप दूध, १ वाटी किसलेले चीज, मीठ, मिरपूड, लोणी.

कृती

सर्व भाज्यांचे बेताच्या आकारात तुकडे करून घ्यावेत. बेबी कॉर्नचे एकात दोन तुकडे करावेत. सर्व भाज्या थोडे पाणी घालून शिजवून घ्याव्यात. शिजवतानाच त्या पाण्यात दालचिनीचे २ तुकडे घालावेत, म्हणजे दालचिनीचा वास सर्व भाज्यांना लागतो. दुसरीकडे एका पॅनमध्ये २ चमचे लोणी वितळवून त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. त्यात मैदा अथवा कणीक घालून पुन्हा परतून घ्यावे. त्यात दूध व गरजेप्रमाणे थोडे पाणी घालून पुन्हा थोडे शिजवावे. सतत ढवळावे म्हणजे गाठी होणार नाहीत. ह्या व्हाइट सॉसमध्ये सर्व शिजवलेल्या भाज्या घालाव्यात. चवीनुसार मीठ, मिरपूड घालावी. शेवटी किसलेले चीज घालावे. स्ट्यू फार दाटही नसतो, आणि फार पातळही नसतो. स्ट्यू बेक करायचा झाल्यास बेकिंग डिशमध्ये घालून वरची चीज पसरून ओव्हनमध्ये १८० अंशावर अर्धा तास ठेवावे. पंधरा मिनिटांनी एकदा उघडून पाहावे.

----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com