

Modern Indian Theatre
esakal
डॉ. श्रीधर कानिटकर
...पहिल्या पाच-दहा मिनिटांतच नाटकानं पूर्ण पकड घेतली. एकतर पहिलंच तरुणाईचं नाटक होतं. नाटकाचा वेग चक्रावून टाकणारा होता. पटापट दृश्यं बदलत होती. त्याच्यामध्ये खूप छान नाच येत होते, संगीताचे ताल बदलत होते आणि रंगमंचावरच्या हालचाली लयबद्ध होत्या. सगळा महोत्सव सत्कारणी लागला, असं वाटावं इतकं हे नाटक भावलं, आवडलं. हे खरं तरुणाईचं नाटक होतं. नाटकाला उज्ज्वल भविष्य आहे यात काही शंका नाही.
म हाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि लागू फॅमिली यांनी भरवलेला नाट्यमहोत्सव अलीकडेच पाहिला. सात दिवसांत एकूण नऊ नाटकं बघितली. त्यात एकही मराठी नाटक मात्र नव्हतं. प्रथम जाणवलेली गोष्ट म्हणजे, मराठी प्रेक्षकांना जे नाटक अभिप्रेत आहे ते आणि इथं बघायला मिळतं ते, त्यात जमीन-अस्मानाचं अंतर आहे. या नाटकांत संवाद कमीत कमी होते. शारीरिक लवचिकपणाला जास्त महत्त्व होते. दक्षिण भारत, आसाम, ओडिशा येथून आलेल्या नाटकांमध्ये काम करणाऱ्या मुला-मुलींत नृत्य भिनलेलं होतं. त्यांच्या साध्या साध्या हालचालीसुद्धा नृत्यासारख्या वाटत होत्या. ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या आवाजातलं संगीत, मोठ्या प्रमाणात केलेला मल्टिमीडियाचा वापर आणि डोळे दिपवणारी प्रकाशयोजना हे सारं काही वेगळा अनुभव देऊन गेलं. जवळजवळ सात नाटकांत फक्त स्त्रियाच होत्या. नाटकं बसविली होती ती मात्र पुरुषांनी. नाटकातील स्त्रिया ज्या दुःखाविषयी बोलत होत्या, ती बायकांची म्हणून असलेली दुःख होती. पूर्ण समाजावर परिणाम करणाऱ्या असंख्य प्रश्नांकडे साधारणपणे दुर्लक्षच केलेलं होतं. शेतकऱ्यांचं दुःख एका नाटकात मांडलं गेलं, हे त्यातल्या त्यात बरं झालं.