Indian diamand market
Esakal
प्राची गावसकर
भारतीय हिऱ्यांच्या बाजारपेठेत आज, जनरेशन झेड हा सर्वांत प्रभावशाली ग्राहकवर्ग आहे, त्यानंतर मिलेनियल्सचा क्रमांक लागतो. फॅशन, कार्यसंस्कृती आणि जीवनशैलीमध्ये विशिष्ट कल निर्माण करण्याबरोबरच उंची बाजारपेठेच्या भविष्यातील मार्गदेखील ही पिढी निश्चित करत आहे.
इतिहासात आपण राजेरजवाड्यांकडील हिऱ्यांची, दागदागिन्यांची वर्णने वाचली आहेत. इंग्रजांसह परकीयांनी केलेल्या अनेक आक्रमणांत त्यांनी पळवून नेलेल्या काही दुर्मीळ हिऱ्यांविषयीही माहिती वाचली किंवा ऐकली आहे. त्यातील कोहिनूर हिरा हे प्रसिद्ध उदाहरण. जगाला कोहिनूरसारखे दुर्मीळ हिरे देणारा भारत देश काही हजार वर्षांपूर्वी जगातील नैसर्गिक हिऱ्यांचा एक महत्त्वाचा स्रोत होता. साधारण १७२६पर्यंत भारत जगातील नैसर्गिक हिऱ्यांचा एकमेव स्रोत होता. त्यामुळे भारतीय हिरे केवळ इतिहास नाहीत, तर संस्कृती, परंपरा आणि वैयक्तिक अभिव्यक्तीचे प्रतीक आहेत.
अर्थात, भारतात हिऱ्यांच्या खाणी खूप नसल्याने काळानुरूप हिरे मिळण्याचे प्रमाण कमी झाले. तरी हिऱ्यांवर प्रक्रिया करून, त्यांना पैलू पाडून आणि पॉलिश करून निर्यात करण्यात आणि आकर्षक दागिने घडविण्यात भारताचा जगात मोठा वाटा आहे. त्यामुळे या उद्योगाचे भारतीय अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान आहे.