योगेश परळे
आर्थिक आणि सुरक्षा क्षेत्रांमधील निर्णय घेण्यासाठी व पुढील अंमलबजावणीसाठी लागणारा वेळ आपण कमी करू शकलो, तर बदलत्या काळाच्या वेगाबरोबर आपण जुळवून घेऊ शकू. येणारा काळ हा अनिश्चिततेबरोबरच अनेक संधी देणाराही असणार आहे. त्यासाठीची पूर्वतयारी आपण नीट केली आहे अथवा नाही, याची खातरजमा देशांतर्गत नेतृत्वाने करण्याची मोठी आवश्यकता आहे.
भारतासाठी व्यूहात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या पश्चिम आशियामध्ये गेल्या काही वर्षांत निर्माण झालेल्या आत्यंतिक राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्राईलने अखेर १२ जूनला इराणवर मोठा लष्करी हल्ला केला. बारा दिवस चाललेल्या या युद्धाची परिणती जगभरातील युद्धजन्य परिस्थिती आणखी जटिल व हिंसक होण्यात झाली आहे.
सध्या सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध आणि गेल्याच महिन्यात झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षानंतर पश्चिम आशियातही थेट संघर्ष झाल्यामुळे भारतापुढील राजनैतिक आणि अंतर्गत आव्हाने आणखी प्रखर झाली आहेत. तसेच या युद्धांमधून काही धडेही घेण्यासारखे आहेत. तेव्हा भारतापुढील या आव्हानांचे विश्लेषण करणे हे लेखाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.