भूषण तळवलकर
अबिद यांनी ‘जय हिंद’ हा शब्द शोधून काढला. तो ऐकून सुभाषबाबू हरखून गेले! हा शब्द उपस्थित सर्व साथीदारांना मनापासून आवडला आणि ‘जय हिंद’ ही इंडिश लीजनची अधिकृत घोषणा झाल्याचा आदेश लगेच जारी करण्यात आला!
‘जय हिंद’... देवनागरीत चार अक्षरांनी आणि इंग्रजीत केवळ सात अक्षरांनी तयार होणारे हे शब्द ऐकले, की प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशप्रेमाचे स्फुल्लिंग चेतवते.मनात स्वदेशाप्रति अभिमान जागृत होतो. राष्ट्रऐक्याची भावना बळकट करणारे अवघे दोनच शब्द कदाचित जगातील कोणत्याही देशात अस्तित्वात नसतील! आपल्या देशाचे राष्ट्रपती, कोणत्याही पक्षाच्या सरकारचे प्रमुख, सर्वपक्षीय नेते यांच्यापासून ते स्टॉक मार्केट सल्लागार कुणाल सराओगी यांच्यापर्यंत अनेक व्यक्ती आपल्या भाषणाच्या शेवटी हा शब्द आवर्जून वापरतात.
पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही आपल्या १५ ऑगस्ट १९४७च्या मध्यरात्रीच्या ऐतिहासिक ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ या भाषणाचा समारोप करताना हाच नारा दिला होता. तेव्हापासून ही परंपरा अखंडित चालू आहे. भारतीय लष्करात तर वरिष्ठांपुढे आल्यावर संभाषणाची सुरुवात ‘जय हिंद सर’ या आदरवाचक उद्गाराने केली जाते.
प्रत्येक विशिष्ट शब्दामागे एखादी घटना किंवा व्यक्ती असते तशी या शब्दामागेही आहे. परंतु खंत अशी, की हा शब्द निर्माण करणारी व्यक्ती आज विस्मरणात गेली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबरीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्याची बाजी लावलेल्या, बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या या महान देशभक्ताचे नाव अबिद हसन सफरानी. स्वातंत्र्यपूर्व काळाइतकीच स्वातंत्र्योत्तर काळातही देशसेवा केलेल्या देशाच्या या सुपुत्राचे भारतात कदाचित कुठेही स्मारक नसेल!