Musical Water instrument
Esakal
मिलिंद तुळाणकर
सर्वात लहान वाटीपासून मोठ्या वाटीपर्यंत सर्व वाट्या अर्धवर्तुळाकार कक्षेत आपल्यासमोर मांडून त्यात गरजेइतकं पाणी ओतून त्यावर काठ्यांनी विशिष्ट प्रकारे आघात केल्यास सूर उमटतात. हेच ‘जलतरंग’!
‘जलतरंग घेऊन ताबडतोब साताऱ्याला निघून ये’, असं आजोबांचं पत्र आलं... सन १९९२-९३ची गोष्ट असावी... त्या काळात मोबाईल नव्हते आणि लँडलाइन फोनही काही मोजक्याच घरी असत.
त्याचं झालं असं होतं, की मी आजोबांकडे जलतरंग शिकत होतो आणि मला असं वाटायला लागलं होतं की मी आता रेडिओची ऑडिशन देण्याइतका तयार झालो आहे. पण आजोबांचं म्हणणं होतं, की अजून तुझी तयारी व्हायची आहे. मग मी आजोबांना न सांगताच रेडिओच्या ऑडिशनचा फॉर्म भरला. पहिली लोकल ऑडिशन पास झालो, असं त्यांचं पत्र आलं. ते पत्र आल्यावर मग मी आजोबांना सांगितलं. त्यानंतर आजोबांनी मला ताबडतोब जलतरंग घेऊन साताऱ्याला बोलावलं. मी तिथं गेल्यानंतर त्यांनी माझा अफाट रियाज करून घेतला. मी आज जो काही आहे, ते त्याचंच फळ आहे, असं मला आजही वाटतं.
मागच्या पिढीतील अनेक कलाकारांनी जलतरंग वाद्य जपलं.
पं. दत्तोपंत मंगळवेढेकर, पं. रामराव परसतवार, पं. बाबा पटवर्धन, पं. दुलाल रॉय, पं. अयम्पट्टी एस. गणेशन, रंजना प्रधान, मास्टर मनहर बर्वे, पं. अनंतराव चौधरी, माझे आजोबा पं. शंकर विष्णू कान्हेरे ही त्यातील काही उल्लेख करावा अशी नावं. जलतरंग या वाद्यावर उपलब्ध एकमेव पुस्तकदेखील माझ्या आजोबांनी लिहिलेलं आहे. पण नंतरच्या काळात हे वाद्य दुर्लक्षिलं गेलं.