डॉ. दिविज माने
जॉइंट कमिशन इंटरनॅशनल म्हणजेच जेसीआय मानांकन हे कोणत्याही रुग्णालयासाठी विश्वासार्हतेचे आणि गुणवत्तेचे प्रतीक आहे. या मानांकनामुळे वैद्यकीय पर्यटनाच्या विस्ताराबरोबरच रुग्णालयाची जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण होते. रुग्णालयातील रुग्णसेवेची गुणवत्ता आणि रुग्णाची सुरक्षितता याची ठळक मोहोर या मानांकनातून उमटते.
किफायतशीर दरात जागतिक दर्जाची आरोग्यसेवा मिळणारे ठिकाण अशी स्वतःची ओळख निर्माण करून भारताने वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात गरुडझेप घेतली आहे.
नव्याने विकसित होणाऱ्या या क्षेत्राचे दूरदर्शी नेतृत्व आपला देश करत आहे. वैद्यकीय पर्यटनाला चालना देणारी सरकारी धोरणे, कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता आणि अत्याधुनिक सुविधांमुळे आपला देश इतर देशांतील रुग्णांच्या पसंतीस उतरत आहे.
दिल्ली, मुंबई या महानगरांबरोबरच पुणे, हैदराबाद, चेन्नई या शहरांमध्येही दर्जेदार सेवा देणारी रुग्णालये नावारूपाला येत आहेत. ॲलोपॅथीबरोबरच आयुर्वेद, होमिओपॅथी आणि इतर पर्यायी वैद्यकशाखांमध्ये केलेल्या प्रगतीमुळे आपल्या देशाचे नाव वैद्यकीय पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून जगाच्या नकाशावर पुढे येत आहे. त्यामुळे वैद्यकीय चिकित्सेसाठी व उपचारांसाठी युरोप आणि अमेरिकेत जाण्यापेक्षा अनेक देशांतील रुग्ण भारतात येण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत.