‘प्रकाशाचा जादूगार’, 'समुद्रदृश्यांचा बादशहा' ये कौन चित्रकार है?

स्नो स्टॉर्म या पेंटिंगमुळे टर्नरने कलाविश्वात प्रचंड खळबळ माजवली
j m w turner
j m w turnerEsakal

जे.एम.डब्ल्यू. टर्नर या बुद्धिमान, अद्वितीय, यशस्वी प्रतिभावान कलाकाराकडं काम करण्याची जबरदस्त क्षमता आणि अफाट ऊर्जा होती. त्याचं व्यक्तिमत्त्व मात्र दुसऱ्या टोकाचं होतं.

डॉ. सुहास भास्कर जोशी

मुसळधार पाऊस. तुफान बर्फवृष्टी. वादळी वारा. उंच उंच उसळणाऱ्या समुद्राच्या महाकाय लाटा. यात सापडलेलं जहाज प्रचंड हेलकावे खातंय. आणि अशा परिस्थितीत ६७ वर्षांच्या एका म्हाताऱ्यानं या जहाजाच्या डोलकाठीला स्वतःला बांधून घेतलंय. चार तास वाऱ्या-पावसाचे तडाखे खात हा विलक्षण म्हातारा महाभयंकर वादळी थैमान अनुभवत आजूबाजूचं विश्व बारकाईनं न्याहाळतो आहे.

कोण आहे हा म्हातारा? आणि कशासाठी करतोय तो हे सगळं? ...

हा आहे अत्यंत प्रत्ययकारी अस्सल समुद्रदृश्यं साकारणारा महान प्रतिभावंत ब्रिटिश चित्रकार जे.एम.डब्ल्यू. टर्नर. स्टुडिओत बसून समुद्रातील प्रलयंकारी वादळाचं आणि रौद्र भीषण लाटांचं चित्रण करणं शक्य नाही, असं वाटल्यामुळे त्यानं स्वतःला जहाजाच्या डोलकाठीला बांधून घेतलं, आणि यातून साकार झालं हा जिवंत अनुभव दर्शवणारं त्याचं जगद्‌विख्यात पेंटिंग स्नो स्टॉर्म!

ज्या काळात युरोपातील बहुसंख्य चित्रकार येशू ख्रिस्त आणि त्याच्या प्रेषितांची चित्रं रंगविण्यात मग्न होते, त्या काळात एकापेक्षा एक सरस निसर्गदृश्यं -विशेषत: समुद्रदृश्यं -चितारून टर्नरनं युरोपीय कलाविश्वात आपलं स्थान ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ केलं.

जोसेफ मॅलॉर्ड विल्यम टर्नर (Joseph Mallord William Turner, 1775-1851) ‘प्रकाशाचा जादूगार’ म्हणूनही ओळखला जातो. अतिशय वेगात काम करणाऱ्या टर्नरने ७६ वर्षांच्या आपल्या आयुष्यात तैलरंगातील ५५० पेंटिंग, जलरंगातील दोन हजार चित्रं आणि ३ हजार रेखाटनांची निर्मिती केली.

नाट्यमय निसर्गदृश्यं काढण्यासाठी युरोपभर भ्रमंती करणाऱ्या टर्नरची असंख्य स्केचबुके रेखाटनांनी आणि अभ्यासचित्रांनी भरून गेली होती. भलेही टर्नरने बऱ्याचदा इटली आणि तिथल्या स्वच्छ सूर्यप्रकाशाचं तोंड भरून कौतुक केलं असलं, तरी त्यानं खरं प्रेम केलं ते फक्त लंडन आणि थेम्स नदीवरच.

त्यातही शहरातल्या माणसांच्या गोंगाटापेक्षा आणि वाहनांच्या गर्दीपेक्षा त्याला थेम्स नदीचं उसळणारं पाणी, धुकं आणि पावसाची पाठशिवणी, नदीच्या पाण्याच्या पृष्ठभागावरचा सूर्यप्रकाशाचा नाट्यमय खेळ आणि नदीत विहरणाऱ्या बोटी अधिक प्रिय होत्या. आणि या सर्व गोष्टी आयुष्यभर त्याच्या कॅनव्हासवर उत्कटतेनं व्यक्त होत राहिल्या.

j m w turner
j m w turnerEsakal

या बुद्धिमान, अद्वितीय, यशस्वी प्रतिभावान कलाकाराकडं काम करण्याची जबरदस्त क्षमता आणि अफाट ऊर्जा होती. त्याचं व्यक्तिमत्त्व मात्र दुसऱ्या टोकाचं होतं. काहीसा कुरूप म्हणता येईल असा हा टर्नर तरुणपणी जरी सडपातळ असला, तरी नंतर भलताच जाडजूड, अघळपघळ आणि स्थूल बनला होता.

बघताक्षणी त्याचं पसरट भलं मोठं नाक आणि बटाट्यासारखे डोळे जाणवत असत. स्वस्तातल्या, ढगळ कपड्यांमुळे तो नेहमीच गबाळा दिसत असे. माणूसघाणा स्वभाव आणि तुसडी वृत्ती यांच्या जोडीला स्वतःचं खासगीपण पराकोटीच्या स्वरूपात जपणाऱ्या टर्नरनं स्वतःभोवती एक विचित्र गूढ वलय निर्माण केलं होतं.

पै-पैसाठी भांडणारा टर्नर हा अतिशय कंजूष माणूस होता. आपल्या आणि आपल्या चित्रकलेच्या मधे बायको-मुलं-संसार येऊ नयेत, म्हणून त्यानं आयुष्यभर लग्नच केलं नाही. टर्नरच्या या विक्षिप्त, कलंदर, एकलकोंड्या व्यक्तिमत्त्वाची बीजं त्याच्या कौटुंबिक आयुष्यात दडलेली होती.

टर्नरचा जन्म २३ एप्रिल, १७७५ रोजी इंग्लंडमधील मेडनलेन इथं झाला. त्याचे वडील नाभिक, तर आई एका खाटकाची मुलगी होती. टर्नरची शीघ्रकोपी आई मानसिक असंतुलनाच्या विकाराने ग्रस्त होती. टर्नर पंचवीस वर्षांचा झाला, तेव्हा तिला बेथेलहेम मनोरुग्णालयात ठेवले होते.

चार वर्षांत तिचा मनोरुग्णालयातच मृत्यू झाला. या सगळ्याचा टर्नरच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यानंतर टर्नरने तिच्याविषयी कधीही अवाक्षर काढले नाही. वडिलांशी मात्र त्याचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.

प्रत्यक्ष शब्दात जरी वडिलांनी त्याच्या कलेचे कौतुक केले नाही, तरी टर्नरची चित्रं त्यांनी मोठ्या अभिमानाने आपल्या केशकर्तनालयात लावली होती. अर्थात टर्नरच्या महाकंजूष वडिलांना जोसेफचं जास्त कौतुक जेव्हा तो अर्धा पेनी ‘वाचवून’ घरी येई, तेव्हा वाटे! टर्नरकडं कंजूषपणाचा वारसा असा वडिलांकडून आलेला होता.

नदीकाठीच घर असल्यानं टर्नर लहानपणापासून थेम्स नदीच्या प्रेमात होता. टर्नरच्या बोलण्यातून आणि चित्रातून हे प्रेम आयुष्यभर व्यक्त होत राहिलं. टर्नरनं चित्रकलेचं औपचारिक शिक्षण असं घेतलं नाही.

परंतु अंगभूत नैसर्गिक प्रतिभेच्या जोरावर त्याला वयाच्या १४व्या वर्षीच रॉयल अॅकॅडमी स्कूलमध्ये मोफत शिक्षणासाठी प्रवेश मिळाला. जलरंगातील त्याच्या चित्रांची जाणकारांकडून प्रशंसा होऊ लागली. पण खऱ्या अर्थानं त्यानं कलाविश्वाचं लक्ष स्वतःकडं वेधून घेतलं ते १७९६ साली त्यानं रंगवलेल्या फिशरमेन ॲट सी या तैलरंगातील पेंटिंगने.

वयाच्या २१व्या वर्षी रॉयल अॅकॅडमीत पहिल्यांदाच समाविष्ट केल्या गेलेल्या ९१ X १२२ सेंटिमीटर आकाराच्या या पेंटिंगमध्ये मानवी आयुष्याची क्षणभंगुरता आणि क्षुद्रपणा दाखवण्यासाठी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांवर मिणमिणता कंदिल असलेली छोटी होडी आणि पार्श्वभूमीवर अक्राळ विक्राळ काळ्या ढगांनी व्यापलेलं आभाळ दिसतं. त्यात पुन्हा हे रौद्रभीषण सौंदर्य वाढवणारा चंद्राचा थंडगार प्रकाश आसमंतात पसरलेला जाणवतो.

j m w turner
j m w turnerEsakal

दहा वर्षांच्या अथक परिश्रमांच्या जोरावर कलाशिक्षण घेऊन टर्नर इतका पारंगत झाला की तज्ज्ञ समीक्षक आणि धनिक आश्रयदाते यांचं उत्स्फूर्त कौतुक आणि आर्थिक पाठबळ त्याला लाभलं. १८०० साली टर्नरला भरपूर कामं मिळत असल्यानं तो आर्थिकदृष्ट्या चांगलाच सक्षम झाला होता.

सारा डॅन्बी नावाच्या तरुण विधवा स्त्रीबरोबर त्याचे या काळात संबंध निर्माण झाले. टर्नरने जरी तिच्याशी लग्न केलं नाही, तरी त्याला तिच्यापासून दोन मुलं झाली. (टर्नरने आयुष्यभर अविवाहितच होता.) या काळात टर्नरने अनेक कामुक चित्रं (Erotic Drawings) काढली असली, तरी त्यानं या लैंगिक आकर्षणाचा परिणाम आपल्या चित्रं रंगवण्याच्या कर्तव्यकठोर दिनक्रमावर कधीही होऊ दिला नाही.

१८०२मध्ये वयाच्या २६व्या वर्षी टर्नरची पूर्ण वेळ सदस्य म्हणून रॉयल अॅकॅडमीवर निवड झाली, आणि १८०७मध्ये यथार्थदर्शन (Perspective) विषयाचा प्राध्यापक म्हणून तिथेच त्याची नेमणूक करण्यात आली. सहकाऱ्यांशी मतभेद असले, तरी टर्नरसाठी रॉयल अॅकॅडमी ही कायमच व्यावसायिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत जिव्हाळ्याची खास गोष्ट राहिली.

रॉयल अॅकॅडमीशी आयुष्यभर निष्ठावंत राहणारा आणि आपल्या पेंटिंगना प्राणपणाने जपणारा टर्नर रॉयल अॅकॅडमीला आपली आई आणि पेंटिंगना आपली मुलं समजायचा. जास्तीत जास्त लोकांनी आपली पेंटिंग पाहावीत म्हणून खासगी खरेदीदारांना विकलेली आपली पेंटिंग्ज तो स्वतःच अधिक किमतींना विकत घेऊन रॉयल अॅकॅडमीमध्ये लोकांना पाहायला उपलब्ध करून द्यायचा.

पॅरिस, स्वित्झर्लंड, इटली आणि ग्रेट ब्रिटनमध्ये अनेक भागात टर्नरने विपुल भ्रमंती केली. प्रत्येक ठिकाणी त्याने भरपूर रेखाकृती केल्या. १८१९मध्ये इटलीत त्याने दोन महिने प्रवास केला. रोमच्या आसपास फिरताना त्याने १,५००पेक्षा जास्त रेखाकृती केल्या.

इटलीतील स्वच्छ सूर्यप्रकाशाने तो प्रभावित झाला. काही वर्षांनी पुन्हा इटलीत गेल्यावर त्याने व्हेनिसच्या सोनेरी पाण्याचं आणि काठावरच्या इमारतींचं रंगवलेलं निसर्गदृश्य अप्रतिम आहे.

१८२९ साली त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांबरोबर अत्यंत घनिष्ठ संबंध होते. वृद्ध वडिलांना टर्नरने लहान मुलासारखे सांभाळले होते. वडिलांच्या मृत्यूचा त्याला जबरदस्त धक्का बसला. ‘मी माझ्या अतिशय लाडक्या एकुलत्या एका मुलाला गमावले आहे’, असे उद्‌गार टर्नरने त्यांच्या मृत्यूनंतर काढले होते.

१८३३ साली पुन्हा एकदा सोफिया बूथ नावाच्या तरुण विधवा स्त्रीशी त्याचे संबंध जुळले, पण तिच्याशीही त्याने शेवटपर्यंत लग्न केले नाही. टर्नरच्या वयाची साठी उलटली होती. पण त्याचं चित्रकौशल्य शिखराला पोहोचलं होतं. त्याच्या अनेक थोर पेंटिंगची निर्मिती या काळातच झाली.

j m w turner
Career Options for Arts Stream: कला शाखेचे विद्यार्थी या क्षेत्रात करू शकतात करिअर, दरमहा होईल लाखोंची कमाई

१८३८ साली टर्नरने रंगवलेलं द फायटिंग टेमरेयर हे ९० X १२१ सेंटिमीटर आकाराचं तैलचित्र २००५ साली घेतलेल्या मतदानात ते ब्रिटनमधील सर्वाधिक लोकप्रिय पेंटिंग ठरलं होतं. इतकंच नव्हे तर २०२० साली २० पौंडाच्या बँक नोटेवरही हे चित्र छापले गेले होते.

ट्राफल्गारच्या युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावलेली ही नौका निरुपयोगी ठरल्यावर भंगारात टाकण्यासाठी तिला थेम्स नदीतून ओढून नेली जात असल्याचे हे चित्र आहे.

काहीशा प्रतीकात्मक अशा या चित्रात पांढऱ्या रंगाच्या युद्धनौकेच्या वैभवशाली कारकिर्दीची अखेर काळ्या रंगाच्या स्टीमबोटकडून होत असताना दर्शविलेला लालभडक रंगाचा सूर्यास्त लक्ष वेधून घेतो.

द स्लेव्ह शिप हे १८४० साली रंगवलेलं आणखी एका सत्य घटनेवर आधारित टर्नरचं गाजलेलं पेंटिंग. समुद्री वादळात सापडलेल्या एका जहाजावर साथीच्या आजाराने ग्रस्त गुलाम होते. विम्याचे पैसे मिळावेत म्हणून जहाजाच्या कॅप्टनने या गुलामांना त्यांच्या सामानासकट समुद्रात ढकलून दिले होते. काळ्या-करड्या व लाल-केशरी रंगातून टर्नरने या पेंटिंगमध्ये समुद्री वादळाचं आणि या भयंकर घटनेचं चित्रण केलं होतं.

या लेखाच्या सुरुवातीला वर्णन केलेल्या स्नो स्टॉर्म या पेंटिंगमुळे टर्नरने कलाविश्वात प्रचंड खळबळ माजवली. १८४२ साली रंगवलेल्या आणि ९१ X १२२ सेंटिमीटर आकाराच्या या पेंटिंगचं कौतुक करताना जॉन रस्कीन या तज्ज्ञ समीक्षकानं म्हटलं होतं, “हे पेंटिंग म्हणजे वादळ, समुद्री उधाण, धुकं आणि प्रकाश यांच्यासंदर्भात कॅनव्हासवर केलेलं सर्वोत्तम विधान आहे.” गोल गोल भोवऱ्यासारखे फिरणारे ब्रश स्ट्रोक्स आणि त्यातून उसळणारी ऊर्जा व गतीमानता हे टर्नरच्या चित्रशैलीचं वैशिष्ट्य पूर्णपणे दर्शवणारं हे पेंटिंग आहे.

ब्राऊन, ग्रे, ग्रीन आणि सिल्व्हर रंगांचा वापर यात केला आहे. चित्रात स्टीमबोटीचं अस्तित्व तिच्या झेंड्यावरून पुसटसं जाणवतंय. बाकी सगळा खेळ उसळणाऱ्या लाटा आणि वादळी वाऱ्याचा आहे. लंडनच्या टेट गॅलरीत सध्या आपल्याला हे चित्र पाहायला मिळतं.

रेन, स्टीम अॅण्ड स्पीड हे १८४४ साली रंगवलेलं आणि ३५ X ४८ इंच या आकाराचं टर्नरचं आणखी एक गाजलेलं पेंटिंग होय. ग्रेट वेस्टर्न रेल्वेची वाफेवर चालणारी ट्रेन पुलावरून वादळी पावसात वेगात चाललीय. खाली नदीच्या पत्रात छोटी होडी दिसतेय. हा अनुभव घेण्यासाठी टर्नरने वादळ सुरू असताना ट्रेनच्या खिडकीतून डोकं बाहेर काढून दहा मिनिटांचा प्रवास केला होता.

आयुष्याच्या अखेरच्या वर्षांत टर्नरने थेम्स नदीच्या तीरावर चेलसिया इथं मोठ्ठं घर बांधून त्याच्या एका भागात आपल्या

पेंटिंगची एक गॅलरी बनवली. १९ डिसेंबर, १८५१ रोजी बेडरूमच्या खिडकीतून आपल्या लाडक्या थेम्स नदीकडं पाहत टर्नरने अखेरचा श्वास घेतला. आपली असंख्य पेंटिंग आणि ड्रॉइंग त्याने राष्ट्राला अर्पण केलीच, पण एक लाख चाळीस हजार पौंडाची रक्कम गरजू आणि उत्तम तरुण चित्रकारांना प्रोत्साहनपर दान केली. अर्थात या सगळ्यांच्या जोडीला टर्नरचे नाव कलाविश्वात कायम लक्षात ठेवलं जातं ते त्याच्या एकापेक्षा एक सरस निसर्गदृश्यं आणि समुद्रदृश्यांसाठी, यात काही शंका नाही.

------------------------

j m w turner
M.F. Husain : कलाकाराचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हेच अंतिम मूल्य मानणाऱ्या एम.एफ. हुसेन यांनी आपली तत्त्वं मात्र सोडली नाहीत..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com