प्रासंगिक । अनिरुद्ध देशपांडे
(Pune's 81-year-old 'Jyotirvidya Parisanstha', dedicated to amateur astronomers, promotes the study and dissemination of astronomy, aiming to balance ancient astrological wisdom with modern science.)
एखादी संस्था उभी करणे आणि ती स्वतःच्या पदरमोडीवर निष्ठेने चालवणे ही पुणेकरांची खासियतच म्हणावी लागेल. अशाच एका संस्थेने आता आपल्या कार्याच्या ८१व्या वर्षात यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. खगोलशास्त्राचा अभ्यास व प्रसार करण्याच्या उद्दिष्टाने कार्यरत असलेल्या या संस्थेचे नाव आहे ज्योतिर्विद्या परिसंस्था. हौशी खगोल निरीक्षकांसाठी समर्पित असलेली ही संस्था भारतातील अशा प्रकारची सर्वात जुनी संस्था मानली जाते.
आधुनिक पुण्यात राष्ट्रीय रेडिओ खगोलशास्त्र केंद्र (एनसीआरए) आणि आंतरविद्याशाखीय खगोल व खगोलभौतिकशास्त्र केंद्र (आयुका) या खगोलविज्ञानाशी संबंधित आघाडीच्या संशोधन संस्था आज नावाजलेल्या आहेत. परंतु यापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात, सुमारे चार दशके आधी, पुण्यासारख्या ऐतिहासिक आणि बुद्धिजीवी पार्श्वभूमी असणाऱ्या शहरात खगोलशास्त्र व गणित यांची सांगड घालणारी विश्वासार्ह संस्था असावी, जेणेकरून प्राचीन ज्योतिर्विद्या व आधुनिक विज्ञान यांचा समतोल साधता येईल, अशी तळमळ अनेक विज्ञान कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली होती.
याच प्रेरणेतून, शके १८६६च्या गणेश चतुर्थीच्या दिवशी पुण्यात एक अनौपचारिक सभा भरविण्यात आली. या सभेला विज्ञाननिष्ठ असलेल्या १६जणांची उपस्थिती होती. त्यांनी एकत्र येऊन आधुनिक गणिती पद्धती आणि वैज्ञानिक निरीक्षणांद्वारे खगोल व ज्योतिषविषयक अभ्यास जनमानसापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करणाऱ्या संस्थेची स्थापना केली. ३० मे २०२५ रोजी ही संस्था सहस्रचंद्रदर्शन साजरी करत आहे.