Premium|Karanji Recipe: खुसखुशीत करंजी; सणाचा गोडवा वाढवणारा पदार्थ

Diwali Karanji authentic Indian Recipe: करंजीशिवाय फराळ अपूर्णच ठरतो. चंद्रकोरीसारखा आकार असणाऱ्या करंजीला दिवाळीच्या ताटात नेहमीच मानाचे स्थान असते
karaji

karaji

Esakal

Updated on

राजश्री बिनायकिया

करंजीशिवाय फराळ अपूर्णच ठरतो. चंद्रकोरीसारखा आकार असणाऱ्या करंजीला दिवाळीच्या ताटात नेहमीच मानाचे स्थान असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा हा गोड पदार्थ खऱ्या अर्थाने सणाचा गोडवा वाढवतो, नाही का?

पारंपरिक करंजी

साहित्य

पारीसाठी : दोन वाट्या मैदा, अर्धी वाटी बारीक रवा, ३ टेबलस्पून तुपाचे मोहन, चवीपुरते मीठ, तळणीसाठी तेल.

सारणासाठी : दोन वाट्या किसलेले सुके खोबरे, अर्धी वाटी रवा, १ टेबलस्पून खसखस, पाऊण वाटी पिठीसाखर किंवा आवडीनुसार गोड, १ टेबलस्पून बेदाणे, १ टेबलस्पून वेलची पूड.

कृती

करंजीच्या आवरणासाठी सर्वप्रथम एका भांड्यात मैदा आणि रवा एकत्र करून घ्यावा. त्यात मीठ घालावे आणि कोमट तुपाचे मोहन मिसळून पीठ चांगले कोरडेच एकजीव करावे. नंतर लागेल तसे पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यावे. हे पीठ अर्धा तास ओल्या फडक्यामध्ये झाकून ठेवावे. नंतर सारणासाठी किसलेले सुके खोबरे मंद आचेवर हलके भाजावे. खोबरे जास्त लालसर होऊ देऊ नये, हलके भाजले की ते गार करून बाजूला ठेवावे. त्यानंतर दोन चमचे तुपात रवा सोनेरी रंग येईपर्यंत भाजावा आणि गार झाल्यावर खोबऱ्यात मिसळावा. खसखस थोडीशी गरम करून गार झाल्यावर या मिश्रणात घालावी.

सर्व मिश्रण गार झाल्यावर त्यात पिठीसाखर, बेदाणे आणि वेलची पूड मिसळून सारण तयार करावे. आवरणासाठी भिजवलेल्या पिठाचा एक छोटा गोळा घेऊन पुरी लाटावी. पुरीच्या कडांना पाणी लावून मध्यभागी थोडेसे सारण ठेवावे, मात्र सारण कडेपर्यंत पोहोचू देऊ नये. पुरी दुमडून अर्धचंद्राचा आकार द्यावा आणि घट्ट दाबून कडा बंद कराव्यात. हवे असल्यास करंजी कटरने कडा कापाव्यात किंवा हाताने मुरड घालावी. तयार झालेल्या करंज्या कापडाखाली झाकून ठेवाव्यात, म्हणजे त्या सुकत नाहीत. सर्व करंज्या भरून झाल्यावर गरम तेलात मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळाव्यात. तेल निथळून करंज्या हवाबंद डब्यात ठेवाव्यात.

ड्रायफ्रुट करंजी

साहित्य

आवरणासाठी : एक वाटी मैदा, पाव वाटी बारीक रवा, २ टेबलस्पून तुपाचे मोहन, चवीपुरते मीठ, तळणीसाठी तेल किंवा गावरान तूप.

सारणासाठी : अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी पिस्ते (खारे पिस्ते घेऊ नयेत), अर्धी वाटी अक्रोड, अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस, १ टेबलस्पून बेदाणे, १ टीस्पून खसखस, १ टीस्पून वेलची पूड, पाऊण वाटी पिठीसाखर.

कृती

करंजीच्या पारीसाठी एका भांड्यात मैदा आणि रवा एकत्र करून त्यात मीठ घालावे. कोमट तुपाचे मोहन घालून पीठ कोरडेच व्यवस्थित मिक्स करावे. नंतर लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ मळावे आणि ओल्या फडक्याने झाकून अर्धा तास ठेवावे. सारण तयार करण्यासाठी ड्रायफ्रुट्स मिक्सरमध्ये जाडसर बारीक करावेत. त्यात बेदाणे मिक्स करू नयेत. कढईत सुके खोबरे मंद आचेवर हलके भाजावे, खोबऱ्याचा रंग बदलणार नाही याची काळजी घ्यावी. खसखसही मंद आचेवर भाजावी.

खोबरे आणि खसखस गार झाल्यावर ड्रायफ्रुट्सच्या मिश्रणात मिसळावे. त्यात पिठीसाखर, वेलची पूड आणि बेदाणे घालून नीट एकत्र करावे. हे ड्रायफ्रुट करंजीचे सारण तयार झाले. नंतर आवरणाच्या पिठाचा एक छोटा गोळा घेऊन पोळपाटावर पुरी लाटावी. पुरीच्या कडांना पाणी लावून मध्यभागी चमचाभर सारण ठेवावे आणि कडा घट्ट दाबून बंद कराव्यात. कटरने कडा कापाव्यात किंवा हाताने मुरड घालावी. भरलेल्या करंज्या कापडाखाली झाकून ठेवाव्यात, म्हणजे त्या सुकणार नाहीत. करंज्या गरम तेलात मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळाव्यात. तेल निथळून झाल्यावर त्या हवाबंद डब्यात ठेवाव्यात.

मटार करंजी

साहित्य

आवरणासाठी : एक वाटी मैदा, १ टेबलस्पून रवा, २ टेबलस्पून मोहनासाठी तेल, चवीनुसार मीठ.

सारणासाठी : एक वाटी ओले मटार, २ टीस्पून आले-लसूण पेस्ट, २ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट, अर्धा टीस्पून गरम मसाला, १ टीस्पून धने पूड, चवीनुसार मीठ, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद, १ टीस्पून जिरे पूड,

१ टेबलस्पून तेल, तळण्यासाठी तेल.

कृती

एका भांड्यात मैदा आणि रवा एकत्र करून त्यात मीठ घालावे. कोमट तेलाचे मोहन घालून पीठ व्यवस्थित मिक्स करावे. लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ मळावे आणि ते अर्धा तास ओल्या फडक्याखाली झाकून ठेवावे. सारणासाठी कढईत एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात आले-लसूण-मिरची पेस्ट घालून परतावे. त्यानंतर जिरे पूड, धने पूड, हिंग, हळद, गरम मसाला आणि मीठ घालावे.

हे मिश्रण छान परतून झाल्यावर त्यात मटार घालून थोडावेळ वाफेवर शिजवावेत. करंजी लाटण्यासाठी तयार पिठाचा एक छोटा गोळा घेऊन पोळपाटावर पुरी लाटावी. पुरीच्या कडांना पाणी लावून मध्यभागी सारण भरावे आणि कडा नीट बंद कराव्यात. कटरने कडा कापाव्यात किंवा हाताने मुरड घालावी. भरलेल्या करंज्या कापडाखाली झाकून ठेवाव्यात म्हणजे त्या सुकणार नाहीत. करंज्या गरम तेलात मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळाव्यात. गरमागरम मटार करंज्या सॉस किंवा चिंचेच्या चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात.

खव्याची करंजी

साहित्य

पारीसाठी : एक वाटी मैदा, पाव वाटी रवा, २ टेबलस्पून तुपाचे मोहन, चवीनुसार मीठ, तळणीसाठी तेल.

सारणासाठी : एक वाटी खवा, १ वाटी खोबरे कीस, पाऊण वाटी पिठीसाखर, अर्धी वाटी ड्रायफ्रुट पावडर (बदाम-काजू), १ टीस्पून वेलची पूड, २ टीस्पून खसखस, १ टेबलस्पून तूप.

कृती

सर्वप्रथम एका भांड्यात मैदा आणि रवा एकत्र करून त्यात मीठ घालावे. त्यानंतर कोमट तुपाचे मोहन घालून पीठ व्यवस्थित मिक्स करावे. लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यावे आणि ओल्या फडक्याखाली अर्धा तास झाकून ठेवावे. मग सारण तयार करण्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम करून अर्धी वाटी रवा मंद आचेवर भाजावा. भाजलेला रवा एका भांड्यात काढून ठेवावा. त्यानंतर पॅनमध्ये एक वाटी सुके खोबरे मंद आचेवर हलके भाजावे. गॅस बंद करून त्यातच एक चमचा खसखस घालून दोन मिनिटे परतावे. हे मिश्रण थंड झाल्यावर रव्यामध्ये मिसळावे.

यानंतर खवा मंद आचेवर परतून पातळसर करावा आणि पूर्ण थंड होऊ द्यावा. थंड झालेला खवा रवा-खोबऱ्याच्या मिश्रणात मिसळावा. त्यात पिठीसाखर, ड्रायफ्रुट्स आणि वेलची पूड घालून, सर्व एकत्र करून करंजीचे सारण तयार करावे. मग आवरणासाठीच्या पिठाचा एक छोटा गोळा घेऊन पुरी लाटावी.

पुरीच्या कडांना पाणी लावून मध्यभागी चमचाभर सारण ठेवावे, मात्र सारण कडेपर्यंत भरू नये. नंतर पुरीला दुमडून अर्धचंद्राचा आकार द्यावा आणि कडा घट्ट बंद कराव्यात. हवे असल्यास करंजी कटरने कडा कापाव्यात किंवा हाताने मुरड घालावी. तयार करंज्या कापडाखाली झाकून ठेवाव्यात, म्हणजे त्या सुकणार नाहीत. सर्व करंज्या भरून झाल्यावर गरम तेलात मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळाव्यात. तेल निथळून झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवाव्यात.

टीप : करंज्यांमध्ये खवा असल्यामुळे या साधारण चार ते पाच दिवस टिकतात.

काही टिप्स

  • करंज्या खुसखुशीत होण्यासाठी पीठ मळण्याआधी तुपाचे मोहन घालावे.

  • करंजीच्या आवरणासाठी भिजवलेले पीठ कडक होऊ नये यासाठी पीठ भिजवल्यानंतर

  • सुती कापड ओले करून वरून झाकून ठेवावे, त्यामुळे पीठ मऊ राहते.

  • अनेकदा तेलात सोडल्यावर करंज्या फुटतात. त्यामुळे आतले सारण खराब होते. हे टाळण्यासाठी त्या कडांना थोडे पाणी लावून करंज्या घट्ट बंद कराव्यात.

  • करंज्या नेहमी मंद आचेवर तळाव्यात.

    (राजश्री बिनायकिया पिंपरी-चिंचवडस्थित फूड ब्लॉगर आहेत.)

---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com