आरोग्य। डॉ. प्रशांत मुंडे
गुडघा आणि घोटा या सांध्यांमध्ये लिगामेंट्स, मेनिस्कस यांसारख्या घटकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. खेळताना होणाऱ्या दुखापती, निदानाच्या चाचण्या, अर्थ्रोस्कोपीसारख्या उपचारपद्धती आणि फिजिओथेरपीच्या मदतीने पुनर्वसनाची प्रक्रिया प्रभावीपणे पार पाडता येते.
पायाच्या हालचालींमध्ये गुडघा आणि घोट्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुडघा (Knee Joint) हा मानवी शरीरातील सर्वात मोठा आणि गुंतागुंतीचा सांधा आहे. या सांध्यामध्ये तीन प्रमुख हाडांचा समावेश होतो. जांघेचे हाड (Femur), पिंडरीचे हाड (Tibia) आणि गुडघ्याची कॅप (Patella). ही तीन हाडे एकत्र येऊन गुडघ्याचा सांधा तयार करतात. या सांध्यामुळे गुडघा वाकवणे, सरळ करणे आणि काही प्रमाणात फिरवणे शक्य होते.
या हाडांना जोडणारे चार महत्त्वाचे लिगामेंट्स असतात. या लिगामेंट्समुळे गुडघ्याला स्थैर्य येते आणि सहजतेने योग्य हालचाल करता येते. अँटेरिअर क्रुशिएट लिगामेंटमुळे (ACL) गुडघा पुढे सरकण्यापासून प्रतिबंध निर्माण होतो. पोस्टेरिअर क्रुशिएट लिगामेंटमुळे (PCL) चालताना गुडघा मागे सरकत नाही. मीडियल कोलॅटरल लिगामेंट (MCL) गुडघ्याची अंतर्गत बाजू भक्कम ठेवण्याचे काम करते. तर लॅटरल कोलॅटरल लिगामेंट (LCL) हे बाह्य बाजू स्थिर ठेवण्यास मदत करते. या लिगामेंट्समुळे गुडघ्याची रचना एकसंध राहते आणि हालचाली सुरळीतपणे होतात.