संतोष मिठारी
बदल ही काळाची गरज आहे. कोल्हापूरसारखे शहर त्या बदलांशी सहज समरस होते आहे; नव्या पिढीला आधुनिक आणि समृद्ध आयुष्य देत आहे. जुने आणि नवे यांमधील हा समतोलच कोल्हापूरच्या वैभवाची खरी ओळख ठरतो. हे शहर बदलाचा आदर्श नमुना आहे, जिथे काल, आज आणि उद्या एकत्र नांदत आहेत. इथे घरे फक्त विटा आणि सिमेंटची नाहीत, तर अनुभवांची, आठवणींची आणि परंपरा-आधुनिकतेचा सुरेख ताळमेळ साधणारी आहेत.
कोल्हापूर म्हणजे करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिर, रंकाळा तलाव, कोल्हापुरी चप्पल, येथील खास खाद्यसंस्कृती आणि हक्काने माणसे जोडणारी वाडा संस्कृती. इथल्या रस्त्यांवर चालताना, जुन्या घरांच्या भिंती, अंगण, लाकडी खांब आपल्याला एक वेगळीच उबदार आठवण करून देतात. आजही शहराच्या अनेक भागांमध्ये वाडा पद्धतीच्या घरांचे अस्तित्व दिसून येते... संपूर्ण दगडी बांधकाम, कौलारू छत, लाकडी चौकटी आणि अंगणातली शांतता.
या घरांची रचना सुसंगत आणि विचारपूर्वक असे. घरांची रचना एका रेषेत असायची, म्हणजेच पुढे बैठकीची खोली, त्यानंतर मधली खोली, नंतर स्वयंपाकघर आणि शेवटी परसदार. प्रत्येक गोष्टीत एक शिस्त, पण त्याचबरोबर काठोकाठ भरून राहिलेली आपुलकीची भावना. काळानुसार गरजा आणि जीवनशैली बदलत गेली. कोल्हापूर शहराने परंपरा जपताना हे बदलही स्वीकारले. म्हणूनच या शहरातील बांधकाम क्षेत्राचे क्षितिज दिवसेंदिवस विस्तारतच आहे.