संतोष मिठारी
नवतंत्रज्ञान आत्मसात करण्यात कोल्हापूरकर नेहमीच सकारात्मक राहिले आहेत. चहाचे पैसे देण्यापासून ते भाजी, फळे, सोने खरेदीची रक्कम देताना कोल्हापूरकरही ऑनलाइन, डिजिटल पेमेंट पद्धत वापरत आहेत. त्यातून रोख रक्कम बाळगण्याचे प्रमाण कमी होत असून, एटीएमच्या माध्यमातून होणारे व्यवहारही घटले आहेत. कोल्हापुरात जिल्हा अग्रणी बँकेकडील विविध ३८ बँकांच्या ६५० शाखांतून मार्च २०२२ ते मार्च २०२५ या कालावधीत झालेल्या व्यवहारांची नोंद पाहता, चार वर्षांत डिजिटल व्यवहारांचे प्रमाण तिपटीने वाढले आहे.
डिजिटल व्यवहारांचा प्रारंभ झाला, तेव्हा ते कसे होणार, अनेक अडचणी येणार, त्यातून फसवणूक वाढणार इत्यादी वदंता मोठ्या प्रमाणात पसरल्या होत्या; मात्र हळूहळू त्यामध्ये फरक पडून डिजिटल व्यवहार आपल्या जीवनातील अविभाज्य भाग झाले आहेत. कोणतेही शुल्क भरणे असो अथवा खरेदी करणे, यांसाठी आपण भारतीय अग्रेसर आहोत, अर्थातच कोल्हापूरकरही त्यात मागे नाहीत आणि डिजिटल अथवा ऑनलाइन व्यवहार करत आहेत.
त्यातही त्यांच्याकडून भीम-यूपीआयला (भारत इंटरफेस फॉर मनी युनिफाईड पेमेंट इंटरफेस) अधिक प्राधान्य दिले जात आहे. भीम-यूपीआयच्या माध्यमातून मागील तीन वर्षांत ४२ कोटी ९८ लाख ७ हजार ९५९ व्यवहार झाले असून, त्यांतील एकूण रक्कम २ लाख ८७ हजार १३१ कोटी रुपये इतकी आहे. डिजिटल बँकिंगची प्रक्रिया सोपी झाल्याने आणि त्याबाबत लोकांमध्ये जागृती वाढल्याने कोल्हापूर जिल्ह्यात डिजिटल व्यवहारांकडे नागरिकांचा कल वाढला आहे.