प्रवीण देसाई
राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणात कोल्हापूरने नेहमीच आपला स्वतंत्र, वेगळा ठसा उमटवल्याचे दिसते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारधारेला सातत्याने जागते ठेवत ती विचारधारा अधिक जोरकसपणे पुढे नेण्याचे कार्य येथील नेतृत्वाने सातत्याने केले आहे. ज्येष्ठ नेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवत तरुण नेतृत्वही राजकारणावर आपली छाप पाडत आहेत. ते कोल्हापूरचा खणखणीत आवाज घुमवतात आणि इतरांना आपल्या भूमिकेची दखल घेण्यास भाग पाडत असतात. असा एक आगळावेगळा दबदबा येथील राजकीय नेतृत्वाने निर्माण केला आहे.
कोल्हापूर जिल्हा हा केवळ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशासाठीच प्रसिद्ध नाही, तर राजकीयदृष्ट्याही या भागाने संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात वेगळी छाप पाडली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांनी कोल्हापूरच्या राजकीय भूमिकेची पायाभरणी केली. आजपर्यंत कोल्हापुरातून अनेक असे नेते घडले, जे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर निर्णायक भूमिका बजावत आहेत.
विशेष म्हणजे, या नेतृत्वात आता तरुण चेहऱ्यांचा प्रभावही प्रकर्षाने जाणवतो आहे. यामध्ये भाजपचे खासदार धनंजय महाडीक, शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे हे देशपातळीवर, तर काँग्रेसचे नेते माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार डॉ. विनय कोरे, विद्यमान पालकमंत्री आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर हे कोल्हापुरात तयार झालेले युवा नेतृत्व राज्य पातळीवर कार्यरत आहे. त्यांनी आपापल्या पक्षाच्या माध्यमातून मजबूत संघटन बांधण्याबरोबरच जिल्ह्यातील विविध प्रश्न मांडून ते सोडविण्यावर भर देत आपला दबदबा निर्माण केला आहे.