उदय कुलकर्णी
कोल्हापूरच्या बाबतीत सगळेच विषय ‘हार्ड’ असतात. ‘हार्ड’ म्हणजे कठीण नव्हे, तर कडक. देशाची स्वातंत्र्य चळवळ असो किंवा स्वातंत्र्यानंतरच्या सामाजिक चळवळी, सगळ्या चळवळींमध्ये कोल्हापूर अग्रस्थानी. नांदणीमधील महादेवी (माधुरी) नावाची हत्तीण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं अंबानींच्या मालकीच्या ‘वनतारा’मध्ये स्थलांतरित करण्यात आली आणि हा निर्णय पटला नाही म्हणून कोल्हापूर आणि परिसरातले लोक रस्त्यावर उतरले. नांदणी ते कोल्हापूर पदयात्रा निघाली. थेट मुख्यमंत्र्यांना या प्रश्नात लक्ष घालावं लागलं. अखेरीस नांदणी परिसरातच वनताराचं पुनर्वसन उपकेंद्र स्थापन करून तेथे महादेवीला परत पाठवण्याची तयारी वनतारा व्यवस्थापनाला दाखवावी लागली. लोकलढ्याला यश येऊन नांदणी परिसरात महादेवी परतण्याचा मार्ग दृष्टिपथात आला.
कोल्हापूरला लोकलढ्याची खूप मोठी परंपरा आहे. ब्रिटिशांच्या राजवटीत इसवी सन १८४४मध्ये भुदरगड, सामानगड, विशाळगड, पन्हाळा येथील गडकर यांनी ब्रिटिशांविरोधात बंड केलं होतं. ताकद अपुरी पडली आणि हे बंड ब्रिटिशांनी मोडून काढलं, पण हे बंड राष्ट्रीय पातळीवर स्वातंत्र्यलढा सुरू होण्यापूर्वी तीन वर्षे आधी करण्यात आलं होतं, हे विसरून चालणार नाही.
बुवासाहेब महाराज व नर्मदाबाई यांचा दुसरा मुलगा म्हणजे चिमासाहेब ऊर्फ शाहू महाराज यांचा जन्म ८ जानेवारी १८३१चा. म्हणजे गडकर यांचं बंड झालं तेव्हा ते अवघे १३ वर्षांचे होते. परकीयांच्या अन्यायाविरुद्ध गडकर यांनी सुरू केलेलं बंड मोडून काढण्यात आलं, याचं शल्य चिमासाहेबांच्या मनात त्या लहान वयापासूनच निर्माण झालं.