ओंकार धर्माधिकारी
जागतिक वारसा लाभलेल्या पश्चिम घाटामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होतो. सात तालुके प्रत्यक्ष पश्चिम घाटामध्ये येत असल्यामुळे जैवविविधतेचा समृद्ध वारसा जिल्ह्याला लाभला आहे. शहरीकरणाच्या रेट्यामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागात आपल्या आस्था, श्रद्धा आणि परंपरा घेऊन जगणारा माणूसदेखील विलक्षण आहे. पर्यावरणीय प्रश्नांना गांभीर्याने घेऊन इथे लोकचळवळी उभारल्या असून, त्यातूनही समाजात अनेक सकारात्मक बदल घडले आहेत. आपल्याला मिळालेला समृद्ध पर्यावरणीय वारसा टिकवण्यासाठी असणारी इथल्या माणसांची कटिबद्धता इतरांसाठी अनुकरणीय ठरेल अशी आहे.
कोल्हापूर शहराच्या मध्यावर असणाऱ्या अंबाबाईच्या मंदिरासमोर उभे राहिले, की पश्चिम, उत्तर आणि दक्षिण यांपैकी कोणत्याही दिशेला गेल्यावर अवघ्या चार किलोमीटरवर आपल्याला एका वेगळ्याच वातावरणाची जाणीव व्हायला लागते. महामार्गाच्या दुतर्फा असणारी झाडी, त्याच्या मागे असणारी शेती, मधूनच आडवी येणारी एखादी नदी, नजरेच्या टप्प्यात येणारे डोंगर असा सर्व माहोल मन प्रसन्न करतो. जसजसे पुढे जाल तसे निसर्गातील हिरवाई अधिक गडद होते. मग तुम्ही घाटमाथ्यावर पोहोचता. खोल दऱ्या, त्यातून जाणारे घाट रस्ते, थंड हवा, किंचित लाल असणारी माती, बोलीभाषेचा लहेजा हे सर्व एका वेगळ्याच वातावरणात घेऊन जाते. एका अर्थाने तुम्ही निसर्गाच्या अस्सलतेपर्यंत पोहोचलेले असता.