राजकुमार चौगुले
शेती तोट्यात येत असल्याची ओरड होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील पारंपरिक शेतीत होणारे बदल उत्साहवर्धक आहेत. जिल्ह्याचे महत्त्वाचे पीक असणाऱ्या ऊस, भात शेतीत होणाऱ्या तंत्रज्ञानाविषयक बदलांबरोबरच एकत्रितपणे होणारे प्रयोग, बाजारपेठेच्या पारंपरिक मागणीनुसार बदलते व्यवस्थापन, याबरोबरच मोत्यांची शेती, मधुमक्षिकापालन इत्यादी नावीन्यपूर्ण बाबींकडे युवा शेतकऱ्यांचा वाढत असणारा ओढा जिल्ह्यातील शेतीसाठी दिलासादायक ठरत आहे.
कोल्हापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर आधारित आहे. जिल्ह्याची सुपीक जमीन आणि पंचगंगा, कृष्णा, वारणा, दूधगंगा, वेदगंगा, कुंभी, कासारी इत्यादी नद्यांमुळे शेतीसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे. पारंपरिकरित्या भात, ज्वारी, नाचणी, कडधान्ये आणि तेलबिया ही खरीप पिके घेतली जातात, तर ज्वारी, गहू आणि कडधान्ये ही रब्बी पिके महत्त्वाची आहेत. याव्यतिरिक्त ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग आणि विविध प्रकारचा भाजीपाला ही जिल्ह्यातील प्रमुख पिके आहेत. कोल्हापूरला ‘भारताची साखरेची वाटी’ म्हणून ओळखले जाते. येथील गूळ देशभर प्रसिद्ध आहे आणि त्याची आशिया, आफ्रिका आणि इतर खंडांमध्येही मोठ्या प्रमाणावर निर्यात होते.