Leap Year: जेव्हा २९ फेब्रुवारी नव्हता तेव्हा होत्या दोन २८ फेब्रुवाऱ्या.! काय आहे २९ फेब्रुवारीचा इतिहास जाणून घ्या

अठराव्या शतकाच्या सुरुवातीच्या स्वीडनमधल्या कॅलेंडरांमध्ये तर अगदी थोड्या काळाकरता ३० फेब्रुवारीही..
Leap Year 2024
Leap Year 2024Esakal

संपादकीय

आजपासून पाच दिवसांनी येणारा गुरुवार विशेष असणार आहे. कारण असा दिवस आता पुन्हा उजाडेल तो थेट २०२८ मध्ये. तोपर्यंत कितीतरी पुलांखालून कितीतरी पाणी वाहून गेलेलं असेल.

आपण वापरत असलेल्या ग्रेगरियन दिनदर्शिकेनुसार हा दिवस -२९ फेब्रुवारी -लीप इयर डे आहे, म्हणजे वर्षातला अतिरिक्त दिवस आहे.

मराठी विश्वकोशात ‘वर्ष’ अशी एक नोंद आहे. तिथे आपल्याला या जादा दिवसाचे कारण सापडते.

तसेही शाळेत केव्हातरी आपण हे शिकलेलोही असतो, चांगले पाठबिठ करून टीप लिहून एखाद-दोन मार्कही मिळवलेले असतात, पण आता एकदम थांबवून विचारले तर नाही सांगता येत. पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा काळ आणि ३६५ दिवसांचे वर्ष यांच्यातल्या फरकाचे गणित बिघडू नये म्हणून धरलेला हा जास्तीचा दिवस.

आपल्या पंचागांनुसार होणाऱ्या कालगणनेप्रमाणेही दर तीन वर्षांनी एक जास्तीचा म्हणजे अधिकाचा महिना येतो.

ह्या पुरुषोत्तममासाचे प्रयोजनही पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याचा काळ आणि कालगणनेच्या गणिताची सांगड घालणे हाच. २९ फेब्रुवारीची कल्पना सुचण्याआधी एकाच तारखेचे दोन दिवस असायचे. म्हणजे दोन २८ फेब्रुवाऱ्या.

त्याकाळात माणसे बहुधा निवांत असावीत नाहीतर एकाच तारखेच्या दोन दिवसांनी किती घोळ घातले असते...! आणि अठराव्या शतकाच्या सुरुवातीच्या स्वीडनमधल्या कॅलेंडरांमध्ये तर अगदी थोड्या काळाकरता ३० फेब्रुवारीही होती.

विख्यात भरतनाट्यम नृत्यांगना रुक्मिणीदेवी अरुंडेल, आपले माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, गणितज्ञ सी.एस. शेषाद्री, १७व्या शतकातला इंग्रजी कवी आणि एकेकाळी खासगी सचिव वगैरे मंडळींसाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या शॉर्टहँड या कौशल्याचा जनक जॉन बायरम, १५व्या शतकातील पोप पॉल तिसरे, छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जान्हवी छेडा, हॉकीपटू अॅडम सिन्क्लेअर, क्रिकेटपटू कर्श कोठारी.

या सगळ्यांमध्ये काय साम्य आहे? तुम्ही इथंपर्यंत वाचत आला असाल तर उत्तर सोपं आहे –या सगळ्यांचा जन्म लीप इयर डेचा, २९ फेब्रुवारीचा.

वर उल्लेख केलेली नावं फक्त वानगीदाखल. तरीही अशी किती लोकं असतील आख्ख्या जगात, ज्यांचा वाढदिवस अशा एका खास दिवशी असतो.

एका अंदाजानुसार जगाच्या लोकसंख्येच्या फक्त ०.०७ टक्के. आता ही संख्या इतकी कमी असली तरी या मंडळींना एक रुखरुख असते.

लीप इयर डे व्यक्तींना आपला वाढदिवस साजरा करण्याची संधी चार वर्षांनी एकदा(च) मिळते. आपल्या मित्रांचे वाढदिवस दरवर्षी होतात आणि आपला मात्र एकदम चार वर्षांनी; हे एखाद्या लहानग्याला समजावून देणं त्याच्या आईबाबांसाठी किती अवघड असेल.

विचार करा, का नाही दरवर्षी येत त्याचा वाढदिवस, हे कसं समजावून द्याल त्याला? आणि जेव्हा वाढदिवस येईल तेव्हा तो नेमका कितवा असेल? मिशेल व्हिटेकर विनफ्रे या प्रश्नांची उत्तरं देतात त्यांच्या इटस् माय बर्थ डे... फायनली! ह्या पुस्तकात.

मिशेल स्वतः एका लीप इयर मुलाच्या आई आहेत. तैवानने मात्र हा प्रश्न सोडवला आहे. त्यांच्या कायद्यानुसार २९ फेब्रुवारीला जन्माला आलेल्या मंडळींची जन्मतारीख २८च धरली जाते. जगभरात विशेषतः युरोपात २९ फेब्रुवारीशी जोडलेल्या अनेक लोकपरंपरा आहेत.

आयर्लंडमध्ये २९ फेब्रुवारी ‘बॅचलर्स डे’ असतो. त्या दिवशी तरुण मुलींना त्यांचा जोडीदार निवडून त्या तरुणाला विवाहाचा प्रस्ताव देण्याची मुभा मिळते. त्या तरुणाचंही जर त्या मुलीवर प्रेम असेल तर या दिवशी आलेला प्रस्ताव तो नाकारू शकत नाही.

या परंपरेभोवती गुंफलेली ‘लीप इयर ब्राईड’ नावाची एक कादंबरीही आहे. लॉरा लौ ब्रुकमन यांच्या या कादंबरीची नायिका चेरी वर्तमानपत्राचा बातमीदार असलेल्या तिच्या मित्रासमोर, डॅनसमोर, विवाहाचा प्रस्ताव ठेवते आणि ते लगेच पळून जाऊन लग्न करतात, असा काहीसा विषय आहे.

याच कल्पनेवर रचलेला लीप इयर नावाचा एक चित्रपटही आहे. वेळ ही दुनियेतली सगळ्यात महाग (आणि आताच्या काळात दुर्मीळही) वस्तू आहे, असं म्हणतात.

एका कवितेत केशवसुत म्हणतात – लवाजम्याचे हत्ती झुलती, लक्ष त्यांकडे देतो कोण! मित रव जर हे सावध करिती – ‘आला क्षण –गेला क्षण’. खरंतर आपल्याला मिळणारा प्रत्येक क्षण आपल्याला न मागता मिळालेला असतो, आणि तो न सांगताच निघूनही जात असतो.

त्या क्षणाचं नेमकं करायचं काय हे ज्यांना ज्यांना कळलं त्यांनी त्यांनी, केशवसुतांचेच शब्द घेऊन सांगायचे तर, प्राप्तकालाच्या विशाल भूधरावर सुंदर लेणी खोदून त्यावर आपली नावे नोंदवलेली दिसतात.

लीप इयर डेकडे वेळेच्या नजरेतून पाहा, मग लक्षात येईल –पृथ्वी आणि सूर्याच्या गतीमुळे निर्माण होणारा फरक भरून काढताना चार वर्षांनी का होईना आपल्याला एक आख्खा जास्तीचा दिवस मिळत असतो- पूर्ण चोवीस तासांचा.

आणि जास्तीचा वेळ मिळणं याचा अर्थ असंख्य शक्यता प्रत्यक्षात आणण्याची आणखी एक संधी असं नाही वाटत तुम्हाला?

Leap Year 2024
Marathi Bhasha Gaurav Din: "शिकत राहावी, समजत राहावी अशी ही आपली माय मराठी"; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी कलाकारांच्या खास पोस्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com