light effect
light effectesakal

Cinematography: लाईट, साऊंड अँड अ‍ॅन्शन..!!

प्रकाश कमी ठेवावा की जास्त, प्रकाश कोणत्या रंगाचा असावा, दृश्यामध्ये कुठे अंधार असावा आणि कुठे प्रकाश असावा अशा अनेक बाबी चित्रपट दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर चित्रपटातील प्रसंगानुसार चर्चा करून ठरवतात..

सुहास किर्लोस्कर

सिनेमॅटोग्राफर रॉजर डिकन्स म्हणतात त्याप्रमाणे फ्रंट लाइट, की लाइट, बॅकलाइट, फिल लाइट, किकर लाइट याची माहिती असणे म्हणजे चित्रपटाची प्रकाश योजना नव्हे. दिग्दर्शक- सिनेमॅटोग्राफरच्या डोळ्यासमोर जे चित्र असते ते परिणामकारकरित्या उभे करणे म्हणजे सिनेमॅटोग्राफी.

तु म आ गये हो, नूर आ गया है, नहीं तो चरागोंसे लौ जा रही थी... गुलजार यांच्या कवितेचा अर्थ आणि चित्रपटाच्या संदर्भाने भावार्थ वेगळावेगळा आहे. ‘नूर’ म्हणजे प्रकाशकिरण – डोळ्यातला प्रकाश, ‘लौ’ म्हणजे दिव्याची ज्योत. तू आल्यामुळे माझे आयुष्य प्रकाशमान झाले आहे, अन्यथा माझे आयुष्य निरर्थकपणे चालले होते, हा काव्याचा शब्दार्थ.

आणि, तू आल्यामुळे माझ्या जगण्याला एक अर्थ प्राप्त झाला आहे, माझ्या आयुष्यामध्ये चैतन्य आले आहे, असा याचा भावार्थ. चित्रपट दृश्यामध्ये रोशनी म्हणजेच फक्त एक प्रकाशझोत टाकला जात नसतो, त्या दृश्याला वेगळा अर्थ लाभण्यासाठी, ‘नूर’ येण्यासाठी, प्रकाश योजनेमध्ये बरेच प्रयोग केले जातात.

प्रकाश कमी ठेवावा की जास्त, प्रकाश कोणत्या रंगाचा असावा, दृश्यामध्ये कुठे अंधार असावा आणि कुठे प्रकाश असावा अशा अनेक बाबी चित्रपट दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर चित्रपटातील प्रसंगानुसार चर्चा करून ठरवतात.

प्रकाशाचे प्रकार

शॉशंक रिडम्प्शन चित्रपटात कैदी तुरुंगातल्या खोलीला मोठे भगदाड पाडून त्यामधून निघून जातो. ते दृश्य त्या भगदाडाच्या अंधारामधून घेतले आहे आणि आपल्याला तुरुंगाधिकारी दिसतो त्याच्या तोंडावर अर्धा प्रकाश आणि अर्ध्या चेहऱ्यावर अंधार आहे.

सिनेमॅटोग्राफी म्हणजे प्रकाश आणि अंधार याचे संतुलन राखणे. प्रखर प्रकाश म्हणजे कमीत कमी काँट्रास्ट. भर दुपारी प्रखर प्रकाश असतो, त्यामध्ये सावल्या स्पष्ट दिसतात. द ट्रुमन शो चित्रपटामध्ये नायक जिम केरीच्या घरी किंवा ऑफिसला जाताना रस्त्यावर किंवा कोणत्याही दुकानात लख्ख प्रकाश दिसतो.

याचे कारण चित्रपटामधील नायक ज्या ठिकाणी राहतो तो एक भव्य सेट आहे आणि नायक त्या सेटवरील एक पात्र आहे, नायकाच्या आजूबाजूचे लोक मिळालेल्या आदेशानुसार काम करत असतात. असे शूटिंग करण्यासाठी थ्री पॉइंट लाइटींगचा वापर केला जातो. थ्री पॉइंट लाइटींगमुळे सावल्या कमीत कमी असतात.

‘की लाइट’ (Key Light), ‘बॅक लाइट’ (Backlight), ‘फिल लाइट’ (Fill Light) अशा तीन प्रकाशयोजनांचा वापर चित्रपटांमध्ये केला जातो. जो चेहरा दाखवायचा आहे, जे दृश्य दाखवायचे आहे त्यावर पूर्ण प्रकाश टाकून त्याविषयी पूर्ण माहिती देणे ‘की लाइट’मुळे शक्य होते.

चेहऱ्यावर एका बाजूने अंधार असल्यास वेगळा अर्थ सांगू पाहणारे चित्र निर्माण होते. असा अंधार नको असल्यास ‘फिल लाइट’चा वापर केला जातो. पोर्ट्रेट फोटोग्राफीमध्ये, लग्नाच्या स्वागत समारंभामध्ये वधू-वरांच्या चेहऱ्यावर ‘की लाइट’ आणि ‘फिल लाइट’ वापरला जातो.

रोजा चित्रपटातील ये हसीं वादियां या गाण्याच्या पहिल्या कडव्यापूर्वीचे संगीत (इंटरल्युड) सुरू होताच रात्र होते. ऋषिकुमार (अरविंद स्वामी) आणि रोजा (मधु) यांच्या चेहऱ्यावर कमी प्रकाश आहे. परंतु त्यांच्यामागे प्रकाशाचा असा झोत सोडला आहे, की त्यांच्या चेहऱ्याच्या कडा प्रकाशमान दिसतात.

चेहऱ्यामागे बॅक लाइट आणि हेअर लाइट वापरल्यामुळे जे वलय (ऑरा) दिसते ते विलक्षण परिणाम साधणारे आहे. रोजा चित्रपटाने संगीत, सिनेमॅटोग्राफीप्रमाणेच प्रकाश योजनेमध्येही नवीन ट्रेंड आणले. ये बंधन है प्यार का... हे कडवे सुरू असताना दिवसाच्या प्रकाशात त्या दोघांच्या शरीराच्या बाजूला एक प्रकाशाची रेखा दिसते (हेअर लाइट) त्यामुळे प्रसंग प्रभावी वाटतो.

याच चित्रपटातील दिल है छोटासा या गाण्यामध्ये मधु बऱ्याच दृश्यांमध्ये बॅक लाइट व हेअर लाइटमध्ये दिसते. शटर आयलंड चित्रपटात नायक लिओनार्दोला त्याची मृत पत्नी भ्रम स्वरूपात दिसते त्यावेळी हेअर लाइटचा वापर योग्य परिणाम साधतो.

हा चित्रपट सत्य आणि भ्रम यांचा खेळ आहे, त्यामुळे काही दृश्यामध्ये नायकाला भास होतात त्यावेळी मागच्या बाजूला प्रकाशमान झालेला धूर (Backlight) दिसतो.

हार्ड लाइट - सॉफ्ट लाइट

हार्ड लाइटमध्ये सावल्या स्पष्टपणे दिसतात परंतु रोमँटिक सीन अधिक खुलून दिसण्यासाठी सॉफ्ट लाइटचा वापर केला जातो. सॉफ्ट लाइटचा वापर करताना प्रकाशकिरण परावर्तित केले जातात. त्यासाठी पांढऱ्या रंगाची छत्री, पांढरा थर्मोकोल, प्रकाश परावर्तित करणारे पांढरे/ काळे पडदे लावले जातात.

टेबल लॅम्पचा प्रकाश हा इंडायरेक्ट लाइटचा प्रकार आहे. टेबल लॅम्पचा प्रकाशझोत पुस्तकावर पडलेला असतो, परंतु ते पुस्तक वाचणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर भिंतीवरून परावर्तित झालेला सॉफ्ट लाइट असतो. इतरत्र असलेल्या अंधारात त्या व्यक्तीचा चेहरा अशा पद्धतीने दाखविल्यास वातावरण गंभीर किंवा दुःखी किंवा निराशाजनक असल्याचा भास होतो.

इनग्लोरियस बास्टर्ड्सच्या ओपनिंग सीनमध्ये ज्यूंना मारण्यासाठी कुप्रसिद्ध हॅन्स लांडा (ख्रिस्तोफ वॉल्ट्झ) पेरीयरच्या (डेनिस मेनोचेट) घरी येऊन काही प्रश्न विचारतो त्यावेळी सूर्यकिरणाचा प्रकाशझोत छतावरून टेबलावर पडलेला आहे. त्या प्रकाशामध्ये त्या दोघांचे चेहरे दिसतात.

सागर चित्रपटातील जाने दो ना, पास आओ ना या गाण्यामध्ये स्वीमिंग टँकमधील पाण्याचे भिंतीवर पडलेले प्रतिबिंब विलोभनीय आहे. सॉफ्ट लाइटचा असा वापर पडद्यावरील प्रसंगात अनुरूप परिणाम साधतो. जोगन बन के (मुग़ल-ए-आझम), पोर्ट्रेट सीन (टायटॅनिक), काटे नही कटते ये दिन ये रात (मिस्टर इंडिया) अशा प्रसंगांमध्ये सॉफ्ट लाइटमुळे रोमँटिक वातावरण निर्मिती झाली आहे.

परंतु हार्ड लाइटमध्ये सावल्या ठळकपणे दिसतात. त्यामुळे कॅसिनो रॉयलमधील क्रेनवरचा हाणामारीचा प्रसंग आणि त्यानंतरचा पाठलाग असे प्रसंग प्रखर प्रकाशामध्ये चित्रित केले आहेत.

लाइट मीटरचा वापर प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो. एका खोलीमध्ये सलग तीन शॉटचे शूटिंग करायचे असल्यास एकसारखे टेंपरेचर राखण्यासाठी या लाइट मीटरचा वापर करतात. प्रकाशाची तीव्रता कमी करणे, प्रकाशाचा रंग बदलणे यासाठी लाइटवर जिलेटीन पेपर, पांढरा/ काळा/ निळा कागद, रिफ्लेक्टर–फ्लॅगसारखे अनेक प्रकार वापरले जातात.

चित्रपट शूटिंग हा चित्रपटाच्या कथेचा भाग असलेल्या भूमिकासारख्या चित्रपटामधून चित्रपटाची काही तंत्रे समजू शकतात. मृणाल सेन यांच्या अकालेर संधाने चित्रपटामध्ये शूटिंग करताना प्रकाशाचे सातत्य राखण्यासाठी लाइट मीटरचा वापर कसा केला जातो हे दाखवले आहे.

त्या काळात नैसर्गिक प्रकाशात शूटिंग सुरू असेल आणि एखाद्या ढगामुळे प्रकाशाची तीव्रता बदलली तर शूटिंग थांबवले जायचे. आता तंत्रज्ञान उपलब्ध असल्यामुळे शूटिंग झाल्यानंतर पोस्ट-प्रॉडक्शन प्रोसेसिंगमध्ये प्रकाशाची तीव्रता बदलता येते. पथेर पांचाली (१९५५) या सत्यजित राय यांच्या चित्रपटामध्ये सुब्रता मित्र यांनी दिग्दर्शकाच्या मनातील दृश्य त्या काळी कमालीच्या कौशल्याने शूट केले आहे.

खेडेगावातील सकाळ-दुपार-संध्याकाळ-रात्र, ऊन-पाऊस त्या त्या प्रसंगाच्या गांभीर्यानुसार चित्रित केले आहेत. त्याकाळी उपलब्ध असलेल्या संसाधनांचा विचार केल्यास हे चित्रीकरण अधिकच भावते. उत्तम दिग्दर्शन, अभिनयाबरोबरच उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी असल्यामुळेच हा चित्रपट आजही जागतिक दर्जाचा मास्टर पीस समजला जातो.

ऑर्सन वेल्स दिग्दर्शित सिटीझन केन चित्रपटाची परिभाषा बदलणारा, काळाच्या पुढचा चित्रपट होता. हॉलिवूडमध्ये ज्या पद्धतीने प्रकाश योजना केली जाते त्याला छेद देऊन नवीन परिभाषा निर्माण करणारी दृश्ये चित्रित करण्याची अपेक्षा दिग्दर्शक ऑर्सन वेल्स यांनी ग्रेग टोलँड यांना सांगितली. त्यामधून ‘डीप फोकस’चे तंत्र उदयास आले.

light effect
National Cinema Day: या तारखेला कोणताही सिनेमा पाहा १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत

दृश्याचे तीन भाग असतात – अग्रभाग (Foreground), मध्यभाग (Middle Ground) आणि पार्श्वभूमी (Background). या तीनही पटलांचा विचार करून शूटिंग करण्यात आले. यामध्ये प्रकाश योजनेचा विशेष विचार प्रत्येक फ्रेममध्ये केलेला दिसतो. नायक ऑर्सन वेल्स टाईपरायटरवर टाइप करतो आहे, तो पडद्याच्या डाव्या कोपऱ्यात अग्रभागी दिसतो आणि त्याच्या मागे दूरवर असलेल्या दरवाज्यामध्ये एक व्यक्ती पार्श्वभूमीवर उभी आहे, त्याचवेळी तिसरी व्यक्ती चालता चालता मध्यभागी येते.

आपल्याला तीनही व्यक्ती वेगवेगळ्या अंतरावर दिसतात. त्यामुळे त्या जागेची खोली (व्याप्ती) जाणवते. या शॉटला डीप फोकस शॉट म्हणणे सयुक्तिक ठरेल. या जागेची खोली प्रकाशाच्या वैविध्याशिवाय दाखवता येणार नाही. म्हणूनच त्या दृष्टीने या चित्रपटातील अनेक फ्रेम बघितल्यावर १९४१ साली दिग्दर्शकाने काय विचार केला असेल, अभिनव प्रयोग कसे केले असतील याचा आपण विचार करू शकतो.

त्यावेळच्या चित्रपटांमध्ये नायक-नायिकेचे क्लोज-अप शॉट दाखवण्याच्या ट्रेंडला फाटा देऊन दिग्दर्शक ऑर्सन वेल्सने ‘नायक ऑर्सन वेल्स’च्या पायाजवळ कॅमेरा ठेवून त्याच्या डोक्यावरच्या काचेच्या छतावरून येणारा प्रकाश दाखवला आणि त्या जागेची व्याप्ती समजली. असा शॉट त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये वापरला गेला.

प्रकाश – केव्हा, कुठे, किती...

एकूणच चित्रपट बघताना एखाद्या पात्राच्या मूक-अभिनयाचा प्रेक्षकांवर प्रभाव पडण्याचे कारण कॅमेरा कसा फिरतो आणि अंधार-प्रकाश याचा मेळ कसा घातला आहे, यावर ठरते. त्यामुळे प्रकाश कोणत्या बाजूने येत आहे, तो प्रकाश कोणत्या कोनातून येत आहे?

चेहऱ्यावर लख्ख प्रकाश दिसतो आहे की कमी प्रकाश दिसतो आहे, प्रकाशाची तीव्रता कशी आहे, कोणते रंग प्रभावीपणे दाखवले आहेत, प्रकाश नैसर्गिक आहे की कृत्रिम आहे, पूर्ण चेहरा प्रकाशमान दिसतो आहे की अर्ध्या चेहऱ्यावर अंधार आहे याचा विचार करून चित्रपट बनवला जातो आणि त्यामुळे दृश्यामधील भावना आपल्यापर्यंत पोहोचतात.

न्यायालयातील एखाद्या प्रसंगात न्यायाधीशांच्या चेहऱ्यावर पूर्ण प्रकाश टाकता येतो आणि आरोपीच्या अर्ध्या चेहऱ्यावर अंधार दाखवता येतो. सत्या चित्रपटात नायकाला तुरुंगात टाकल्यानंतर तो अंधारात विचार करत बसला आहे म्हणूनच त्याच्या मनातील भावनांचे कल्लोळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात.

light effect
Haddi Film: 'हड्डी' रिलिज होणार! नवाजुद्दीन सिद्दीकीला कोर्टाचा दिलासा; न्यायालयाने विवेक ओबेरॉयची याचिका फेटाळली..

मार्टिन स्कॉर्सेसी दिग्दर्शित रेजिंग बुल या चित्रपटामधील अंधार-प्रकाशाचा वापर हा असाच अभ्यासाचा विषय आहे. सिनेमॅटोग्राफर मायकेल चॅपमन यांनी बॉक्सरच्या आयुष्यातील मानसिक द्वंद्व दाखवताना रॉबर्ट डी निरो काही प्रसंगामध्ये अंधारामध्ये बसलेला दाखवला आहे. बॉक्सिंग सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूच्या मागे बॉक्सिंग रींगबाहेरील फोकस लाइटचा वापर बॅक लाइट स्वरूपात सहेतुक केला आहे.

मार्टिन स्कॉर्सेसी दिग्दर्शित शटर आयलंड चित्रपटामध्येही वेगवेगळ्या लाइटचा वापर करताना सिनेमॅटोग्राफर रॉबर्ट रिचर्डसन यांनी कमालीच्या बारकाईने विचार केला आहे. काडेपेटीमधील काडी पेटवून त्या प्रकाशात बघणाऱ्या लिओनार्दो डीकॅप्रिओचा घाबरलेला चेहरा दाखवताना त्याच्या डोक्यावर प्रकाश पडलेला दाखवला आहे.

परंतु प्रत्यक्षात तो परिणाम साधण्यासाठी आजूबाजूला ज्वाळा पेटविल्या होत्या आणि त्या धरून काही माणसे उभी राहिली होती. त्यामुळे दृश्य विलक्षण परिणामकारक झाल्याचे जाणवते.

प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर रॉजर डिकन्स म्हणतात त्याप्रमाणे फ्रंट लाइट, की लाइट, बॅक लाइट, फिल लाइट, किकर लाइट याची माहिती असणे म्हणजे चित्रपटाची प्रकाश योजना नव्हे. दिग्दर्शक- सिनेमॅटोग्राफरच्या डोळ्यासमोर जे चित्र असते ते परिणामकारकरित्या उभे करणे म्हणजे सिनेमॅटोग्राफी.

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा वेगवेगळ्या ऋतूंमध्ये, दिवसाच्या विविध प्रहरांमध्ये वेगवेगळी दृश्ये दिसतात. त्यातील प्रकाश आणि अंधाराचा परिणाम बघितल्यावर आपली दृश्यांकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी विकसित होते आणि चित्रपटांमधील दृश्ये अधिक परिणामकारक होण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण समजते.

जीने की तुमसे वजह मिल गई है

बड़ी बेवजह ज़िन्दगी जा रही थी,

तुम आ गए हो, नूर आ गया है!

--

light effect
Prajakta Mali: 'यंदाचं नवं वर्ष shooting set वर असताना देखील...', प्राजक्ताची गुढीपाडवा स्पेशल पोस्ट चर्चेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com