Mansoon Day
Mansoon Daysakal

Mansoon Day : सृष्टीचा सोहळा पावसाळा

चराचरातील प्रत्येक सजीवाला आतुरतेने वाट पाहायला लावणारा काळ म्हणजे पाऊसकाळ, अर्थात पावसाळा!

अलोट सुखांचीच असते वृष्टी...

ऋतू म्हणजे फिरता काळ असल्याने पाऊसकाळानंतर हिवाळ्याचा काळ येतो; त्यानंतर पुढे चराचराला आपल्या दाहाने भाजवणारा उन्हाळा सहन केल्याशिवाय अलोट सुख देणारी वृष्टी येणार नसते.

चराचरातील प्रत्येक सजीवाला आतुरतेने वाट पाहायला लावणारा काळ म्हणजे पाऊसकाळ, अर्थात पावसाळा!

या पावसाळ्याचे आणि आपल्या भारतीय जनमानसाचे एक अतूट असे नाते आहे. पावसाळ्याचे पहिले नक्षत्र असते ते मृग. दरवर्षीच्या सात जूनला सूर्याचा जेव्हा मृग नक्षत्रात प्रवेश होतो तेव्हा प्रत्येकजण त्या मुहूर्तावर नकळतपणे वैशाख महिन्याची काहिली विसरून जातो. भले त्या दिवशी जलधारा ओसंडोत अथवा रुसून राहोत, परंतु तिथून उन्हाळा विसरून जाणे सुरू होते. मृगाच्या सरी म्हणजे चैतन्य सरी. त्या निव्वळ थोड्या जरी बरसल्या तरी आठवणीतली उन्हे विसरायला लावतात. सर्व दिशांनी तेव्हा वारे वाहू लागले की प्रत्येकाच्या मनातही नकळत काही रुजू लागते.

सूर्यालाच मृग नक्षत्रात प्रवेश करायला लावणारा सृष्टीचा हा नियम अतिशय आनंददायी आहे. साऱ्या सृष्टीला आपल्या दाहक उन्हाने भाजून काढणाऱ्या सूर्याला पावसाळ्याचे आरंभ नक्षत्र असलेल्या मृग नक्षत्रात पाठवून देणे म्हणजे एका अर्थाने त्याला हा सांगावा देणे असते, की बाबा तू आधी सचैल चिंब भिजून घे!

इथून जो पावसाळा सुरू होतो तो सलग चार महिने चालू असतो. तसे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यांना पावसाळी महिने मानले जाते. या चार महिन्यांतील नऊ नक्षत्रे म्हणजे जणू अमृतवाही नक्षत्रे. आपल्या संस्कृतीनुसार नक्षत्रांना देवांची निवासस्थाने मानले गेलेले आहे. एकदा का नक्षत्रांना देवांचे निवासस्थान मानले की नक्षत्रांमधील शुभत्व आपोआपच मान्य होऊन जाते. संपूर्ण उन्हाळ्यात साऱ्या सजीवांना आपल्या दाहक किरणांनी भाजवणाऱ्या सूर्यालाच अशा देवाच्या घरी शांत बसवल्यानंतर वरुणदेवता पृथ्वीवरचे आपले आगमन वाजतगाजत करत असते.

Mansoon Day
Mansoon Day : पावसा तू येत राहा. उडत्या पाखरांच्या गाण्यांना साथ द्यायला तू येत राहा...

विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वाऱ्यांचा सोसाट ही आपली तीन आयुधे घेऊन जेव्हा वरुणदेव पर्जन्यवृष्टीचा आरंभ करतात तेव्हा प्रत्येक सजीव भयभीत झालेला असतो. कदाचित अशा भयकारक आरंभातून ते जाणीव करून देत असावेत, की दरवर्षी मी हे अलोट सुख वाटून जातो तरी तुम्ही ते जपून ठेवत नसता.

पण प्रत्येक सजीव म्हणजे सृष्टीचेच लेकरू असल्याने त्यांची काळजी वरुणराजालाही असते.

वरुणाचे आवडते अस्त्र म्हणजे सुसाट सुटलेल्या सरी!

चराचरातील जिवांना जीवन देण्यासाठी या सरी बरसवणे ते सुरू करतात आणि हे बरसणे पुढे चार महिने अविरत सुरू राहाते. तसे पाहिले तर आरंभीच्या महिन्यातील नभांगण हे फसव्या मेघांनी भरलेले असते. सूर्याला आपल्या मागे दडवून ऊनही नाही, सावलीही नाही, प्रकाशही नाही असे वातावरण उगीचच निर्माण करून टाकलेले असते. तशी ही बरसण्याआधीची तयारी म्हणायलाही हरकत नसते.

एखाद्या वर्षी पहिला पाऊस मात्र जून महिन्यातच दणदणत येतो. असा पाऊस सर्वदूर न बरसता इकडे तिकडे उगीच आपली हजेरी लावून साऱ्या सजीवांना पावसाळी मूडमध्ये घेऊन जाणारा असतो. अशावेळी अचानक वारा सुटतो. आकस्मिक मेघ दाटतात. अकस्मात वीज कडाडते. आकाशातील तिचे अस्तित्व क्षणार्धात डोळे दिपवून जाते. अशा एखाद्यावेळी एखाद्याच्या बाजूला त्याची अर्धांगिनी असेल किंवा प्रेयसी असेल तर ती तिच्याही नकळत जवळ येते. टपोरेसे थेंब पडण्याआधी कुठूनतरी दूरवरून हवाहवासा मृद्‍गंध येतो आणि परस्परांचा देहगंध त्यात मिसळतो. खर्वनिखर्व मूल्याचा हा आनंद प्रत्येकाला तेव्हा अनुभवायला मिळतो. हे सगळे मृगवैभव असते म्हणून तर जगायची, असे क्षण पुनःपुन्हा जगायची ओढ प्रत्येकाला असते.

Mansoon Day
Mansoon Day : ‘कैसे जाऊ मिलन पिया से सखी, बैरन भई बरखा’

जगण्याची ही ओढ संपन्न करणारे नक्षत्र म्हणजे मृग नक्षत्र. ‘मृग बरसणे’ ही पेरण्या होण्याची आणि भावी समृद्धीची चाहूल असते. हे असे शाश्वत घटित वैभवसूचक असून या निसर्गदानाला मृगवैभव म्हणायला हरकत नसावी. दरवर्षी या मृगवैभवाची चाहूल लागली की चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात. केवळ एक दोन पावसाने रखरखीत झालेला आसमंत आपल्या अंतर्भागात दडलेल्या सर्व सुकलेल्या बीजांना पुन्हा अंकुरायला लावतो. तृणपात्यांना कडेकपारीतून बाहेर डोकवायला लावतो. छोट्या मोठ्या प्रपातांना प्रवाहित करतो आणि सर्वप्रिय अशा हिरव्या रंगाची उधळण करणे सुरू करतो.

पावसाळा खरा रंगात येतो तो आषाढ महिन्यात. हा साधारणतः दरवर्षी जुलै महिन्याच्या काळ म्हणता येतो. या काळात एकतर सूर्य आर्द्रा नक्षत्रातला प्रवेश पूर्ण करून आलेला असतो आणि पुनर्वसू नक्षत्रात प्रवेशलेला असतो. या महिन्याच्या आरंभी मृग आणि आर्द्रा ही दोन पावसाळी नक्षत्रे पूर्ण झालेली असतात. तिसरे पुनर्वसू चालू असते.

आर्द्रा नक्षत्राच्या बाबतीत आदिवासींची फार सुंदर कल्पना आहे. आदिवासी भागांत या आर्द्राला ‘आडदरा’ म्हणतात. उन्हाळ्यात उघडे पडलेले डोंगर या नक्षत्रामुळे हिरव्यागार गवताने झाकले जातात म्हणून तर या डोंगरांना नजरेआड करते ती ‘आडदरा’ अर्थात आर्द्रा!

आर्द्रा या नावातही नाहीतरी ओलेपणा दिसून येतो. आर्द्रा नक्षत्रातला पाऊस सर्वदूर पडत असतो. या काळात आसमंत ओला चिंब होऊन सुस्नात होतो. संपूर्ण आकाश सदैव ढगांनी भरलेले असते. सुखांची आटोकाट उधळण करणारे आर्द्रा नक्षत्र हे संथ, सतत धारेसाठीही प्रसिद्ध आहे.आर्द्रा नक्षत्रात नदीला जो पूर येतो त्या पाण्यामुळे सगळी घाण वाहून जात असल्यामुळे नदीचे विटाळलेपण जाते, असं सांगणारीही एक आख्यायिका आहे.

Mansoon Day
Mansoon Mission: 'अतिवृष्टी असो की उन्हाची लाट' आधीच मिळणार पूर्वसूचना ! पुण्यात बनलं मॉन्सून मिशन

आपण सारेजण याच काळात पावसाळी पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी बाहेर पडत असतो. समस्तांना या काळातच भिजायला आवडत असते. सर्दी, खोकला आणि थंडीची, हे असं भिजताना तमा नसते. स्वच्छता, अस्वच्छता असल्या गोष्टींना झुगारून दिसेल त्या छोटेखानी टपरीवर भजी खायचा मोह आवरता येत नसतो. भाजलेल्या मक्याच्या कणसांवर जीव जडतो. पावसावर प्रेम करायला लावणारा आषाढ सुरू आहे याकडे आपले लक्षच नसते.

हीच ती आषाढ-असोशी असते. या काळात प्रत्येकाला अनामिक अशी अनिवार ओढ लागलेली असते. थंड वाऱ्याच्या लहरींमुळे अंग आक्रसलेले असते. नभाचे दाटलेपण अनुभवत थबकलेले ओले पक्षी दिसून जातात. सारा परिसर ताजेपण ल्यालेला आढळतो. प्रत्येक स्पर्श अवखळ वागायला लावतो. उत्फुल्ल, टवटवीत असे अनंत क्षण उत्साहाची उधळण करत असतात.

या उत्सवाला आषाढाच्या उत्तरार्धातली दमदार वृष्टी घरीच थांबवायला कारणीभूत ठरते. एकदा का पंढरपूरची वारी परतली की आषाढधार -संततधार हा अनुभव प्रत्येक जण घेत असतो. या संततधारेमुळे निवांतपणा लाभतो. हा निवांतपणा कधी कधी इतका असह्य करतो की पाऊस कधी थांबेल याचीही चिंता लागून जाते. एकीकडे अशी चिंता लागली तरी नद्या, नाले, ओढे भरभरून वाहायला लावणारा आषाढाचा पाऊस भूगर्भातील पाण्याची पातळी हमखास वाढवणारा ठरून जातो. इथूनच सगळीकडे तृप्त आसमंत दिसायला सुरुवात होते.

आषाढातली अर्थात जुलै महिन्यातली पुनर्वसूनंतरची पुष्य आणि आश्लेषा ही नक्षत्रे समृद्धिसातत्य देणारी असल्याने सुखकारक वृष्टीतला बहुतांश वाटा त्यांच्या काळातच दिला जातो. पारंपरिक चालीनुसार आषाढी एकादशीपासून सृष्टीच्या सुस्थितीला कारक असणारे विष्णुदेव पुढे चार महिने योगनिद्रा घेणार असतात. ह्या चातुर्मासाच्या कालखंडाच्या समाप्तीनंतर घराघरात सुगी यावी अशी त्यांची इच्छा असते. एखाद्या वर्षीचा अपवाद वगळता ही ईश्वरेच्छा पूर्ण करण्याची खबरदारी वरुणराज घेत असतातच.

अलीकडच्या काही वर्षांत मात्र पावसाळ्याबाबतच्या पारंपरिक गृहीतकांना छेद देणाऱ्या गोष्टी घडत आहेत. याला कारणीभूत म्हणे हवामानातील बदल आहे. हा बदल प्रगतीच्या मागे धावणाऱ्या मानवांच्या हव्यासापायी घडला असून नियमित ऋतुचक्रामध्येसुद्धा अधून मधून अनियमितता येत आहे. पावसाळी महिन्यांमध्ये पडणारा पाऊस भलत्याच ऋतूत पडत असून त्यामुळे प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे, अशी परिस्थिती आपण अनुभवतो आहोतच.

असे अनुभव येत असले तरीही नियमित ऋतुचक्रावरचा आपला विश्वास अजूनही टिकून आहे, कारण निसर्ग आपली नियमितता कटाक्षाने पाळताना आपण अनुभवतो. हे निर्विवाद सत्य आहे आणि ते नाकारता येत नाही. आपण अनुभवलेल्या अशा सत्य परिस्थिती बाबत बोलायचे झाले, तर दरवर्षीच्या श्रावण महिन्याला अर्थात ऑगस्ट महिन्याला आपण आठवत गेलो तर या महिन्यातला ऊन-पावसाचा खेळ आपण आठवू शकतो.

तसे पाहिले तर वर्षा ऋतूचे जे दोन हक्काचे महिने मानले गेले आहेत त्यात श्रावण आणि भाद्रपद हे महिने येतात. आषाढ महिन्याला जरी ग्रीष्म ऋतूत घेतलेले असले तरी हक्काची, खात्रीची वृष्टी त्या महिन्यात कशी काय होते? याचे गूढ उलगडण्याच्या प्रयत्नात कोणी का पडले नाही? याचे आश्चर्य वाटते. या महिन्यातील नक्षत्रे म्हणजे मघा आणि पूर्वा फाल्गुनी. मघा नक्षत्राचा पाऊस अविश्वसनीय मानला जातो. पडला तर तो इतका पडतो की घराबाहेर निघता येत नाही किंवा मग हे नक्षत्र पूर्णपणे कोरडेही जाते.

तसे पाहिले तर या काळातच पिकांना पाण्याची गरज असते. या काळात आकाशात ढग असतात पण पावसावर विश्वास नसतो. म्हणून तर खेडोपाडी पूर्वी म्हटले जायचे, ‘पडल्या तर मघा नाहीतर ढगाकडे बघा!’

वास्तविक पाहता ऑगस्ट महिना म्हणजे पावसाळ्याच्या उत्तरार्धातील दोन महिन्यांपैकी पहिला महिना. या काळापूर्वीच दरवर्षीचा पाऊस सर्वदूर पोहोचलेला असतो. जमिनीवरील पाणवठे, तलाव, नद्या, नाल्या ओढ्यांचे प्रवाह स्तब्ध होणे सुरू होते. मातीचा गाळ खाली बसून त्यांचे पाणी स्वच्छ होणे सुरू झालेले असते. सर्वत्र हवीहवीशी स्तब्धता आलेली असते. जोमाने वाढणाऱ्या झाडांचा, वेलींचा, पिकांचा एक आगळाच असा हवाहवासा गंध अनुभवता येतो. याचवेळी गावोगावी श्रावण मासानिमित्ताने सण वैकल्ये आणि उपवास सुरू झालेले असतात. गावोगावची भाविक मंडळी धार्मिक पर्यटनासाठी निघालेली बघायला मिळतात.

श्रावणातल्या उत्तरा नक्षत्रात जो पाऊस पडतो तो भात शेतीला खूपच अनुकूल असतो. पूर्वी शेतकरी म्हणायचे म्हणे, ‘न पडल्या उत्तरा तर भात मिळणार पितरा!’ ही अशी त्यांची धारणा होण्याचे कारण म्हणजे सूर्य उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात पावसाळा संपताना येतो. याच काळात ऋतूंचे संक्रमण होत असते आणि यादरम्यान पडणारे ऊन अतिशय कडक असते. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशा आजारांना ते निमित्त ठरते. श्रावण महिन्यात असे चांगले वाईट अनुभव प्रत्येक जण अनुभवत असला तरी चित्तवृत्ती उत्फुल्लित करणारा महिना म्हणून पाऊस काळातील हा महिना खरोखरच मानसी हर्ष फुलवणारा आहे हे तर निर्विवाद सत्य आहे.

अलोट सुख देणारी वृष्टी ज्या चार पावसाळी महिन्यात येते त्यातला भाद्रपदाचा उत्तरार्ध किंवा सप्टेंबर महिना हा शेवटचा महिना. पावसाळी नक्षत्रातील उत्तराफाल्गुनी नक्षत्रानंतर शेवटचे नववे पावसाळी नक्षत्र म्हणजे हस्त! हस्त नक्षत्राची पर्जन्यवृष्टी म्हणजे शेतकऱ्यांना नवजीवन देणारी असते. या मागचे कारण म्हणजे आपल्या भारताचे पाऊसमान हे मोसमी वाऱ्यावर अवलंबून असल्यामुळे आपले मुख्य पीक खरिपाचे आहे. जर खरीप हंगामात पाऊस मनासारखा झाला नाही तर सारे शेतकरी रब्बी हंगामावर विश्वास ठेवतात. ऑक्टोबरच्या सुरुवातीला लागणाऱ्या हस्त नक्षत्रात जर जोरदार पाऊस पडला तर तो शेतकऱ्याला दैवी वरदान वाटतो. हस्त मस्त बरसला तर शेतकरी प्रचंड आनंदित होतो.

या नक्षत्रानंतर पारंपरिकदृष्ट्या पाऊसकाळ संपला असे मानले जाते. ऋतू म्हणजे फिरता काळ असल्याने हिवाळ्याचा काळ या पाऊसकाळानंतर येतोच त्यानंतर पुढे चराचराला आपल्या दाहाने भाजवणारा उन्हाळा सहन केल्याशिवाय अलोट सुख देणारी वृष्टी नसते.

Mansoon Day
Monsoon Season : यंदाही मॉन्सूनचं वेळापत्रक बदललं; खरीप हंगामातील शेतीवर होणार परिणाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com