
सुहास राजदेरकर
सतत नऊ वर्षे सकारात्मक परतावा दिल्यानंतर प्रथमच अशी शंका निर्माण झाली आहे, की यावर्षी शेअर बाजार नकारात्मक परतावा देईल का? सप्टेंबर २०२४नंतर बाजारात ज्याप्रकारे घसरण सुरू आहे, ती पाहता अशी शंका येणे साहजिकच आहे. २०२५ या कॅलेंडर वर्षात प्रवेश केल्यावर शेअर बाजार आधीच्या चार वर्षांपेक्षा अधिक किचकट आणि गुंतागुंतीचा दिसतो आहे. बाजार याआधीसुद्धा यापेक्षा अधिक घसरला होता, परंतु यावेळच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये जास्त घबराट पसरली आहे. कारण दोन कोटींहून अधिक गुंतवणूकदार बाजारात नवे असून, त्यांनी मागील तीन वर्षांमध्ये इतकी घसरण पाहिलीच नव्हती.