

Emotional Human Bonds
esakal
मानसी होळेहोन्नूर
निघताना त्या दोघींचं काय चाललंय म्हणून तिनं वळून बघितलं, तर खरंच त्या दोघी एकमेकींचा हात धरून रस्ता ओलांडत होत्या. दोघींनी आयुष्यात एकच पुरुष नवरा म्हणून स्वीकारला, भांडत आयुष्य काढतात, पण ते भांडण मिटवून पुढचा क्षण लगेच जगतात, या जगण्याचं नाव काय? पाठमोऱ्या दोघींचा पटकन फोटो काढत ऋत्विकला पाठवून मयूरीनं त्याखाली लिहिलं, ‘सावलीनं धरलेला हात! बाकी गंमत फोनवर सांगेन.’
‘‘तू विश्वास नाही ठेवणार, काल काय सॉलिड धमाल झाली!’’ मयूरी फोनमध्ये ऋत्विककडे बघत
म्हणाली. त्याच्या न आवरणाऱ्या जांभया बघून ती वैतागली, ‘‘कसला अनरोमॅंटिक नवरा आहेस तू. तिथं पॅरिसमध्ये असूनपण बायकोशी बोलताना जांभया देतोयस. सकाळी सकाळी तरी जरा प्रेमानं, प्रेमाचं बोल की रे...’’
‘‘बायको, तिकडं सकाळ आहे, पण इकडं अजून भली पहाट आहे. बाथरूमला जायला म्हणून उठलो. तू ऑनलाइन दिसलीस म्हणून गुड मॉर्निंग केलं, तर तू थेट फोनच लावलास. आता प्लीज झोपू दे ना मला.’’ अगदी पेंगत पेंगत तो म्हणाला. तसंही मयूरी कायम म्हणायची, ऋत्विकचं पहिलं प्रेम झोप आहे, मी त्याचं दुसरं प्रेम आहे. त्यावर तिला चिडवण्यासाठी तो म्हणायचा, छे छे तू तिसऱ्या किंवा चौथ्या नंबरवर असशील बहुतेक. त्यामुळे आता त्याला अजून डिवचण्यात अर्थ नव्हता.
‘‘बरं जा झोप आणि तुझी सकाळ झाली की मला फोन कर. मला कालची धमाल सांगायची आहे.’’