

The Art of Meenakari
esakal
वर्षा गजेंद्रगडकर
हस्तकला कुठलीही असो, सौंदर्य हा तिचा अंगभूत गुणधर्म आहे. कधी हे सौंदर्य कलेच्या साधेपणात असतं, तर कधी ते नाजूकपणात असतं. शिवाय या सौंदर्याचे मापदंडही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात. कुठं रंग वैशिष्ट्यपूर्ण, कुठं आकार वेगळे, कुठं कसब विलक्षण, कुठं चकित करणाऱ्या प्रक्रिया, तर कुठं साधनं अपूर्व! सौंदर्यातल्या या विविधतेमुळे प्रत्येक भारतीय हस्तकला वेगळी उठून दिसते. मीनाकारी ही धातूला मनोहारी सौंदर्य देणारी अतिशय नजाकतीची हस्तकला आहे.
मीनाकारी म्हणजे वेगवेगळ्या धातूंवर केलं जाणारं रंगकाम किंवा एनॅमलिंग. ही हस्तकला मुख्यतः दिसते ती दागिन्यांवर किंवा सजावटीच्या आणि शोभेच्या वस्तूंवर. पूर्वी शाही राजवाड्यांच्या भिंती, खुर्च्या, टेबलं यांवरही मीनाकारी केली जात असे. हळूहळू ती दागिने किंवा छोट्या वस्तूंपुरती मर्यादित झाली. खरेदीदारांच्या आवडीनिवडीत जसे बदल होत गेले, तशा गरजा आणि मागण्याही बदलत गेल्या आणि पर्यायानं उत्पादनंही बदलली.