विनोद राऊत
साध्यासुध्या अन् वारकरी असलेल्या डबेवाल्यांच्या व्यावसायिकतेला, नियोजनाला एक मर्यादा होती. वेगाने बदलत असलेल्या जगात १३५ वर्षे जुन्या या व्यवसायापुढे आज अनेक आव्हाने उभी आहेत. यामधील सर्वात मोठे संकट कोविड महासाथीचे होते.
‘मुंबईचा डबेवाला’ हा मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीचा एक अविभाज्य घटक आहे. १८९०मध्ये सुरुवात झालेली मुंबई डबेवाल्यांची सेवा आज सचोटी, प्रामाणिकता व विश्वासाहर्तेचे दुसरे नाव ठरले आहे. १९५५मध्ये डबेवाल्यांची रितसर नोंदणी झाली, तर १९७०मध्ये मुंबईच्या डबेवाल्यांची मध्यवर्ती संघटना तयार झाली. डबेवाला संघटनेच्या व्यवस्थापनाची दखल हावर्डपासून जगभरातील अनेक संस्था व व्यक्तींनी घेतली आहे.
तब्बल १३५ वर्षांची परंपरा असलेले मुंबईचे डबेवाले बदलत्या फूड इंडस्ट्रीचा एक अविभाज्य भाग आहेत. काळ बदलला तशी डबेवाल्यांपुढे नवी आव्हाने उभी राहिली आहेत. कोविड महासाथीनंतर तर सगळी गणितेच बदलली. साथीच्या काळात व्यवसाय ठप्प झाला होता. त्यामुळे डबेवाल्यांची ग्राहकसंख्या दोन लाखांवरून आता ८० हजारांवर आली आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे डबेवाल्यांची दुसरी पिढी हा व्यवसाय करण्यासाठी उत्सुक नाही. अशा या संकटांना तोंड देत या पारंपरिक व्यवसायाला व्यावसायिक स्वरूप देऊन भविष्यात कशी वाटचाल करावी, याचा क्लिअर कट रोडमॅप अजूनही डबेवाल्यांना तयार करता आलेला नाही.
कोविड महासाथीच्या काळात लोकल बंद झाल्यामुळे डबेवाल्यांचा व्यवसाय शंभर टक्के बंद झाला. त्याच काळात लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलल्या.