मोमोंव्यतिरिक्त ईशान्येकडील कोणते खाद्यपदार्थ तुम्ही खाल्लेत? जाणून घ्या ईशान्येकडील खाद्यसंस्कृती!

आपल्याकडच्या खाद्यपदार्थांचं सौंदर्य सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपलीच आहे, असंही तिचं म्हणणं आहे...
 Nambie Jessica Marak
Nambie Jessica MarakEsakal

जेसिका स्वतःला तिच्या प्रदेशाच्या खाद्यसंस्कृतीची राजदूत मानते. त्यामुळे आपल्याकडच्या खाद्यपदार्थांचं सौंदर्य सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपलीच आहे, असंही तिचं म्हणणं आहे.

केतकी जोशी

माचु बांदल कप्पा, कोरडोई, डुओ ब्रेंगा, वाटेपा जॅडॉ, ठुपका... ही नावं ऐकली आहेत? हेसुद्धा भारतीय खाद्यपरंपरांचेच प्रतिनिधी, तरीही आपण ही नावं फारशी ऐकलेलीही नाहीत. तुमच्या–माझ्या स्वयंपाकघरात महाराष्ट्रीय पदार्थांबरोबरच कदाचित गुजराती, उत्तर भारतीय, पंजाबी, बिहारी पाककृती केल्या जात असतील.

पण ईशान्येकडील पदार्थ आपण कधी घरी करणं सोडाच, ऐकलेलेही नसतात. कदाचित मोमोंचा फक्त अपवाद. पण ईशान्येकडच्या ‘सात बहिणी आणि एका भावाची’ खाद्यसंस्कृती म्हणजे फक्त मोमो नव्हेत, हे ईशान्येबाहेरच्या जगातल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा विडा उचलला आहे नंबी जेसिका मराक हिनं.

मूळची मेघालयाची असलेली नंबी जेसिका मास्टरशेफ इंडिया २०२३ स्पर्धेतील अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेली स्पर्धकही आहे.

मेघालयातल्या पश्चिमी खासी पर्वतरांगांमधील अप्पर रंगसा या गावची नंबी जेसिका एक यूट्यूबरही आहे. खरंतर ती मूळची शिक्षिका. पण तिचं ‘इट युवर कप्पा’ (Eat your Kappa) हे यूट्यूब चॅनेल प्रचंड लोकप्रिय आहे.

जेसिकाच्या या खाद्ययात्रेची सुरुवात झाली ती तिच्या उच्च शिक्षणामुळे. पर्वतरांगांमध्येच आयुष्य गेलेली जेसिका उच्च शिक्षणासाठी तमिळनाडूला गेली. तिथले इडली, डोसा,सांबरबरोबरच बिर्याणीही तिला भरपूर आवडत असल्यानं तशी खाण्याची काही गैरसोय होण्याचा प्रश्न नव्हता.

पण तरीही आपल्याला कधीतरी आपल्या कम्फर्ट फूडची आठवण येतेच. तसंच जेसिकाचं झालं. तिला तिच्या घराची आठवण करून देणारं साधं चिकन सूप आणि फिडेलहेड फर्न (डोंगराळ भागात मिळणारी एक प्रकारची भाजी) हवे होते.

पण तिला प्रत्यक्षात मिळाले फक्त मोमो. शेवटी तिनं घरीच आपले पारंपरिक पदार्थ करायला सुरुवात केली. तिच्या लक्षात आलं, की यूट्यूबवरही ईशान्येकडच्या पारंपरिक रेसिपी अगदीच कमी आहेत. त्यामुळे तिनं २०१५मध्ये तिचं ‘इट युवर कप्पा’ हे तिचं यूट्यूब चॅनेल सुरू केलं.

जेसिकाला आपल्या गारो असण्याचा सार्थ अभिमान आहे. तिच्या चॅनेलवर ती गारो पाककृती तर सादर करतेच, पण त्याबरोबर त्रिपुरा, आसाम, नागालँडच्या, निसर्गाशी अधिक जवळीक साधणाऱ्या, पारंपरिक पाककृतीही सादर करते.

आपल्या मुळाशी जोडलेले कोणतेही पदार्थ हे आपल्या फक्त खाद्य परंपरेचेच नाही तर सांस्कृतिक वारशाचेही प्रतिनिधित्व करतात, असं जेसिका मानते.

मास्टरशेफपर्यंतचा तिचा प्रवासही मोठा रंजक आहे. सहसा उत्तरेकडील राज्यांचा अशा स्पर्धांवर बऱ्यापैकी प्रभाव जाणवतो. त्यामुळे जेसिका मास्टरशेफमध्ये गेल्यावर तिचं गाव देशाच्या नकाशावर आलं.

ती अंतिम फेरीत गेल्यावर तिच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिचं विशेष कौतुकही केलं. पूर्वेकडच्या राज्यांमधल्या खाद्यपदार्थांबद्दल बऱ्याचदा संपूर्ण देशभरातच काही पूर्वग्रह आढळतात. जेसिका त्यामुळे सगळ्यात जास्त व्यथित झाली होती. हे पूर्वग्रह काढून आपल्या जन्मभूमीतल्या खाद्यसंस्कृतीची नव्याने ओळख करून देण्यासाठी ती अथक प्रयत्न करत आहे.

यात अडथळा होता तो उपलब्ध असलेल्या रेसिपींची अगदी अपुरी माहिती किंवा त्या स्थानिक भाषेत असण्याचा. ह्या अडथळ्यातच संधी शोधून हे पारंपरिक पदार्थ सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिनं इंग्रजी भाषा निवडली.

पदार्थ समजावून सांगताना अगदी भाज्या किंवा चिकन कसं निवडायचं इथपासून ती सगळं स्पष्ट करून सांगते. स्वयंपाक करायला मनापासून आवडत असल्याने आणि मुख्य म्हणजे तिच्या भागातल्या खाद्यपदार्थांवर तिचं प्रेम असल्याने ते पदार्थ सांगण्याचा तिचा दृष्टिकोनही वेगळा असतो.

तिच्या रेसिपींमधले काही घटक पदार्थ तिचाच प्रदेश वगळला तर अन्यत्र आढळत नाहीत, अशा अन्य कुठेही न मिळणाऱ्या घटक पदार्थांची वैशिष्ट्यंही ती सांगते. मास्टरशेफमधली तिची काळ्या तांदळाची रेसिपी अशी अगदी हीट झाली होती.

ती स्वतःला तिच्या खाद्यसंस्कृतीची राजदूत मानते. त्यामुळे आपल्याकडच्या खाद्यपदार्थांचं सौंदर्य सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपलीच आहे, असंही तिचं म्हणणं आहे.

ती तिच्या व्यासपीठाचा म्हणजे यूट्यूब चॅनेलचा उपयोग फक्त स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी करत नाही, तर पूर्वेकडील राज्यांमधील फारशा माहिती नसलेल्या स्वादिष्ट जगाची ओळखही करून देते.

त्यामागच्या कथा, किस्से सांगते. प्रत्यक्ष शेतावर, जंगलात जाऊन भाज्या, फळं तोडण्यापासून ते पदार्थ पूर्ण होईपर्यंत अत्यंत सहजपणे जेसिका लोकांपर्यंत रेसिपी पोहोचवते. त्यामुळेच तिचं हे यूट्यूब चॅनेल प्रचंड लोकप्रिय आहे.

मास्टरशेफमधला तिचा अनुभव अगदीच वेगळा होता, असं ती सांगते. तो तिच्या आयुष्यातला एक मोठा आणि महत्त्वाचा टप्पा होता. तिच्या गावातून पहिल्यांदा कुणीतरी या ठिकाणी पोहोचलं होतं.

आपल्या राज्याची संस्कृती आणि आदिवासी खाद्यपदार्थांचा प्रचार केल्याबद्दल तिचा मेघालय सरकारच्यावतीने खास सन्मानही करण्यात आला. तिला खाद्यपदार्थ किंवा सांस्कृतिक राजदूत अशी पदवीही देण्यात आली.

बटर चिकन आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण जेसिकाच्या राज्यात काळे तीळ घालून केल्या जाणाऱ्या चिकनबद्दल मात्र फारसं कुणाला माहिती नाही.

जेसिका तिच्या गावी परत जाण्यापूर्वी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करायची. त्यांना ती इंग्रजी भाषा आणि सॉफ्ट स्कील्स शिकवायची.

 Nambie Jessica Marak
Healthy Food for Healthy Mind :'हेल्दी माईंड' हवं असेल तर हेल्दी खा !

जेसिका मातृसत्ताक परंपरेतील आहे. त्यामुळे घराची कर्ती स्त्री या नात्याने तिला घराची सगळी जबाबदारी उचलावी लागते. ती मेघालयात परत जाण्यापूर्वी तिच्या आईला अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे जेसिका आणि तिची लहान मुलगी मेघालयातच राहिले.

काही वर्षांनी तिच्या नवऱ्यानंही तमिळनाडू विद्यापीठातील त्याची प्राध्यापकाची नोकरी सोडली आणि तोही त्यांच्याबरोबर मेघालयातच स्थायिक झाला. त्यानंतर दोघांनी मिळून शेती करायचं ठरवलं. हे अर्थातच सोपं नव्हतं. पण तिच्या जोडीदारानंही तिला तिच्या या खाद्यप्रवासात साथ दिली.

त्यांचं सगळं आयुष्य आता शेतीभोवती गुंतलेलं आहे. पर्वतरांगांनी वेढलेल्या या गावात अनेक अनोखी पिकं घेतली जातात. पण तिच्या गावातील शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने कशी विकायची, हे माहिती नव्हतं.

त्यामुळे जिवापाड मेहनतीने वाढवलेली फळे, धान्य वाया जाताना; त्यांचं नुकसान होताना तिनं पाहिलं. खरंतर शेतात जाऊन भाज्या तोडायला तिला फार आवडतं. तीही एक कला आहे असं जेसिकाला वाटतं आणि ही कला तिला तिच्या आईकडून मिळाली आहे.

तिच्या कामासाठी तिला विविध प्रकारच्या स्थानिक भाज्या, फळं, धान्य लागतातच. त्यामुळे तिनं या शेतकऱ्यांना खास तिच्यासाठी भाज्या, फळं पिकवायची विनंती केली. त्यांनाही रोजगार मिळाला आणि तिलाही खास स्थानिक चवीच्या भाज्या, फळं मिळायला लागली.

ती करत असलेली विविध प्रकारची लोणची आता जगभरात प्रसिद्ध आहेत. स्थानिक पदार्थ वापरून केलेल्या या लोणच्यांना आता मुंबई-पुण्यासह गुजरातमधून आणि अगदी टेक्सास, सिंगापूर, पॅरिस अशा जगभरातून ऑर्डर येतात.

अर्थात तिचा व्यवसाय अजून अगदी लहान स्तरावर आहे, पण तो वाढावा यासाठी तिची अथक मेहनत सुरूच असते.

व्यवसाय वाढवताना तिचं पारंपरिक कौशल्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तिच्या गावातली शाळाही तिनं दत्तक घेतली. शाळेतल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी तर तिनं उचलली आहेच पण त्याचबरोबर शाळेतल्या मुलामुलींना आठवड्यातून एकदा स्वयंपाकही शिकवला जातो.

पाणीपुरी, समोसा, इडली, बटर चिकनपासून ते मिसळ पाव, लिट्टी चोखापर्यंतचे असंख्य भारतीय पदार्थ आता आंतरराष्ट्रीय मेन्यूकार्डांपर्यंत पोहोचले आहेत. एरवी प्राधान्ययादीत नसलेले ईशान्य भारतातील खाद्यपदार्थही आता हळूहळू माहिती होऊ लागले आहेत.

पण ईशान्य भारतात मोमोंशिवाय अन्य असंख्य चविष्ट पदार्थ केले जातात हे जगासमोर आणण्याचं महत्त्वाचं काम नंबी जेसिकानं केलं आहे. त्यामुळेच ती खऱ्या अर्थानं मेघालयाच्याच नाही ईशान्य भारताच्या खाद्यसंस्कृतीची राजदूत आहे.

------------

 Nambie Jessica Marak
Healthy Breakfast Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हिरव्या हरभऱ्याचे स्पेशल चाट, एकदम सोपी आहे रेसिपी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com